सुप्रियाची नजर वृत्तपत्राच्या अक्षरांवरून फिरत होती. मन मात्र अस्वस्थ होतं. खरं तर घरचा गणपती आणि गौरीचा कार्यक्रम यथासांग पार पडला होता. नेहमीपेक्षा जरा जास्तच मोठा असा सोहळा संपन्न झाला. कारण, या वर्षी सुप्रिया पूर्णवेळ घरीच होती. गेल्या जून महिन्यात ती सोशिओलोजी डिपार्टमेंटच्या एच.ओ.डी. पदावरून निवृत्त झाली होती. आता एका एन.जी.ओ.मध्ये पार्टटाइम ऑनररी काम तिने स्वीकारले होते. त्यामुळे यंदाचे सणवार सुट्टय़ांच्या हिशेबी मोजदादीत किंवा वेळात वेळ जमवून करावे लागले नव्हते. गौरीजेवणाला तर तिच्या सर्वच प्राध्यापक मैत्रिणींना आमंत्रण केले. स्वयंपाकासाठी आचारी लावला. गिफ्ट म्हणून, स्पेशल डेकोरेटिव्ह ‘गुडी बॅग्ज’ तयार केल्या. गणपतीसाठी तर खास जेजुरीहून वेगवेगळी फुले मागवून स्वत: डेकोरेशन केले. एकूण ‘उत्सव बहु थोर झाला’.. तरी पण, ‘झाले मनोहर तरी गमते उदास..’ अशी मन:स्थिती..

या विचार-खळबळीला कारण ठरला होता, आदल्या दिवशीच्या रात्रीचा फोन. हो! कारण त्यानंतरच ही हुरहुर लागली. अगदी झोपेतही जाणवावी अशी. तिचा मुलगा कुणाल आणि सून अर्पिता, दोघेही गेली पंधरा वर्षे अमेरिकेतील बॉस्टनमध्ये प्रसिद्ध कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती. दोघेही अत्यंत प्रगल्भ, विचारी आणि दोघांच्याही पालकांना पूर्णपणे समजून घेऊन प्रेमाने वागणारे होते. दूर राहूनही सुप्रिया-माधव, कुणाल-अर्पिता आणि त्यांची आठव्या इयत्तेत शिकणारी लाघवी, बुद्धिमान, कन्या सनया यांचे छान समंजस कुटुंब नांदते होते. दोन्हीकडूनही पैशांची चिंता नसल्याने, भेटीगाठीत फार अंतर पडत नव्हते. त्यामुळे सनयाची सुप्रियाशीही घट्ट जवळीक होती. अर्पिताही दोन्ही जगांचा उत्तम समतोल साधणारी होती. त्यामुळे ‘बॉस्टनच्या’ घरीसुद्धा दीड दिवसांचा गणपती ती फारच थाटामाटात साजरा करायची. त्यासाठी सनयालाही सर्व गोष्टी करण्यात सामावून घ्यायची. सजावट करण्यामध्ये सनया अतिशय रस घ्यायची. तिचा हातच कलाकौशल्याचा होता. गणपती बसायच्या दिवशी, तिच्याकडे त्यांच्या मराठी मित्र-मैत्रिणी, त्यांची मुले, कुणाचे कुणाचे अमेरिका भेटीवर आलेले आई-बाबा, सासू सासरे आणि उत्सुकता असणारे काही अमेरिकी सहकारी असे साठ ते सत्तर लोक आरती आणि महाप्रसादाच्या साग्रसंगीत भोजनासाठी जमत. अर्पिता आणि तिच्या दोघी-चौघी हौशी मैत्रिणी उकडीचे मोदकही करत. थोडे घरचे काही विकतचे असा ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’ मेनू.. दुसऱ्या दिवशी विसर्जन.. बॅकयार्डमध्येच.. परत दोन-पाच कुटुंबेही जमत. नंतर काही स्नॅक्स..

narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
ganesh naik thane lok sabha
ठाणे हवे आहे, पण धनुष्यबाण नको; गणेश नाईकांपुढे नवे सत्तासंकट
loksatta editorial income tax issue notice to congress
अग्रलेख: धनराशी जाता मूढापाशी..
lokmanas
लोकमानस: भाजपचा करवतीला विळखा..

..पण या वर्षी अर्पिताचा फोन आला की त्यांनी गणपती दीड दिवसांत विसर्जन न करता पुढचे पाच दिवस गणपती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याला कारण सनया.. त्यासंबंधीच अर्पिताने रात्री फोन केला होता. ‘‘ममा, आम्ही गणपती पाच दिवसांचा ठेवणार आहोत. आम्ही दोघेही ऑफिसला, सनयाचे स्कूल, स्पोर्ट्स, सगळे संध्याकाळी सहापर्यंत संपते. नंतर आम्ही तिघेही शांतपणे आरती करू. अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र म्हणू. आता, हा नवा पायंडा पडायची सूचना आलीय सनयाकडून.. खरंच, मलाही तिच्या प्रगल्भ विचारांची कल्पना नव्हती. ती म्हणाली, ‘ममा, गणपती स्थापनेच्या दिवशी तुझ्या मनात फक्त रात्रीच्या जेवणाचे, त्याच्या तयारीचेच विचार होते ना? बोलण्यातून तेच दिसत होते. तर त्या आधी काय? सजावटीचे सामान, इंडियन स्टोअर्समधून ग्रोसरीजच्या खेपा.. इन्व्हिटेशन्सच्या मेल्स.. इंडियात फोन.. यंदा तर तुम्ही आंटी लोकांनी नऊवारीचा ड्रेसकोड ठेवला त्याची डिसक्शन्स.. या सगळ्यात तू देवाशी कुठे तरी ‘कनेक्ट’ झालीस का? नाही ना? विचार कर.. दोन मिनिटेही गणपतीचे नाव नाही. आरतीसुद्धा एक इव्हेंट केला.. करावके काय.. सारखे सेल्फीज काय.. तुम्ही फक्तगणपतीच्या नावाने स्वत:चा इव्हेंट केलात. अ‍ॅम आय करेक्ट?’ सनया अमेरिकेत वाढली आहे. तिला तिची विचारशक्ती आहे. अर्थात तिचे विचार आपल्या दृष्टीने चुकीचेही असू शकतात. पण आपल्या पुण्याच्या आणि इथल्या घरात मोकळेपणी उच्चार स्वातंत्र्य आहे. कुणाल आणि मी, आम्हा दोघांनाही सनयाचे विचार खूप भावले आणि आता आम्हाला खरच असं वाटतं की या बुद्धिदायी देवाशी त्या श्रद्धेशी एकरूप व्हायला हवं ..’’

सुप्रिया अर्पिताचे फोनवरच विचारमंथन चालले, तेव्हाच सुप्रियाच्या मनात अस्वस्थतेचे बीज पडले.. ‘‘खरंच, मी तरी काय केले? मी स्वत: पुरोगामी विचारांचीच आहे. ‘त्वं ज्ञानमयी.. त्वं विज्ञानमयी!’ ज्ञान आणि विज्ञानाची आपण आपल्या परीने वर्षभर साधना करतोच. पण श्रीगणेश हे या दोन्ही संकल्पनांचे सगुणरूप म्हणून गणेशपूजन.. पण मी स्वत:ही हे मूळ तत्त्व मागेच टाकले. गणपतीच्या निमित्ताने नवा सोफासेट घेतला आणि गौरीच्या नैवेद्याला म्हणून नवे चांदीचे ताट. कोरलचा सेट गेस्टना प्रसाद द्यायला आणि गौरी दिवशी नेसायला नवी साडी.. मी तरी कुठे ‘एकरूप’ झाले त्या देवत्वाशी? घटकाभरसुद्धा शांतपणे देवाची प्रार्थना नाही म्हटली.. अथर्वशीर्षसुद्धा मोदक वळताना, पारीच्या चुण्यांवर नजर ठेवत.. ईश्वरी शक्तींशी तादात्म्यता शून्य..यंदाचं नाही. तर मागे जाऊनही तेच तसेच. यंदा जरा जास्तीचेच. सनयाच्या बुद्धीची झेप तिला एक अर्थ शिकवून गेली आणि तो अर्थ अर्पिताने तिच्यापरीने उचलला. आता मी विचार, कृती करायची होती.’’

सुप्रियाने मनाशी काही गोष्टी ठरवल्या आणि तिचे मन आश्वस्त झाले. यंदा आपण व्यवसायातून निवृत्त झालो. ती निवृत्ती आता या बा फापटपसाऱ्यातून घ्यायची, पूर्वीचे ते दिवस नव्या जाणकारीचे नव्हते, तरी उत्साही आनंदाचे होते. तेवढाच भाग मनात जपायचा. गणेशस्थापना करायची. फुलांनी देव सजवायचा. परंतु दहा दिवसांपैकी प्रत्येक दिवसाची संध्याकाळ एकाग्रतेने देवाशी तादात्म्य पावायचे. त्यासाठीचे रस्ते प्रत्येकाचे वेगळे.. आवडीचे..असतील आणि इतर ‘बोवाळांवर’ होणारी उधळण थांबवून, ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या सदराअंतर्गत माहिती आलेल्या, आपल्याला पटलेल्या संस्थेच्या निधीत आपली ओंजळ टाकायची. बदल सणांच्यात झाले, तसे मनातही व्हायला हवेतच..’ एक सजग नागरिक, समाजशास्त्रज्ञ यांच्यात कुठे तरी मानसशास्त्राचीही रेघ होतीच.  सुप्रिया मनात म्हणाली, ‘माझा हा निर्णय म्हणजेच गणेश विसर्जनानंतरची माझी ‘उत्तर पूजा’ आहे. रूढार्थाने आणि वाच्यार्थानेही.

सुप्रियाला आपल्या निर्णयाचे समाधान होतेच पण आपल्या विचार सजगतेचा वारसा कुणालकडून सनयाकडे, पुढच्या पिढीतही भौगोलिक सीमा पार करून झिरपत आला आहे, या नव्याने आणि अचानक जाणवलेल्या वास्तवाने समाधान अधिक उबदार, गडद झाले. आणि ऊँकाराचा अनाहत नाद प्रयासाविनाच सुप्रियाच्या हृदयात वस्तीला आला. गणेशाचे सगुण रूप विसर्जित झाले, पण तत्त्व रूप मात्र हृदयस्थ झाले..नेहमीसाठीच..

 

डॉ. सुवर्णा दिवेकर

drsuvarnadivekar@gmail.com