‘‘आला क्षण कसा वापरायचा.. संपर्कात येईल, त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा आणि नंतर नामानिराळं कसं राहायचं, हे काळाच्या ओघात सगळ्यांच्या अंगवळणी पडलंय! आजच्या पिढीचा हा गुणधर्म म्हणायचा की, पुढे चालत राहण्याचा निकष म्हणायचा? आपण मात्र प्रत्येक ठिकाणी भावनिक गुंतवणूक करू पाहतोय! की, आपण आपल्याच दृष्टिकोनातून सगळ्यांना तोलू पाहतोय! हा आपला दोषच म्हणायचा का?’’ अप्पासाहेब विचार करत राहिले.

सुदेश, अश्विनी, वरुण आणि अर्णव दोन दिवस सुदेशच्या ऑफिसच्या लोकांबरोबर सहलीला जाऊन आले. आल्यापासून चौघंही भलतेच खुशीत होते. सहलीला खूप धम्माल करून आली होती पोरं! तिथल्या गमतीजमती सांगण्यासाठी अहमहमिका लागली होती. वरुण आणि अर्णव तर बाबा-मम्मानी कसा तिथल्या खेळात भाग घेतला, बाबा नाही म्हणत होता, तरी त्याला त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कसा नाच-गाण्यात भाग घ्यायला लावला. ते रंगवून रंगवून सांगत होते. लंचला बिर्याणी, आईस्क्रीम तर डिनरला पाव-भाजी, फालुदा. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला थालीपीठ-बिर्डे आणि लंचला भरली वांगी, मिरचीचा खर्डा, भाकरी असा मराठमोळा मेनू! मधल्या वेळेत विविध प्रकारचे गेम्स, मनोरंजनाचे कार्यक्रम. पाहिजे त्याला बसमधून राइड अशी हवी ती मजेची पर्वणी लुटण्याची मुभा होती.

‘‘चला! रोजच्या घर, संसार, नोकरी आणि मुलांच्या शाळा-पाणी या चक्रातून दोन दिवस का होईना पण त्यांना सगळ्यांनाच चार मौज-मजेचे क्षण अनुभवता आले, म्हणून निमाताई हे सगळं ऐकून खूश झाल्या.

अप्पासाहेबांनी मात्र त्यांच्या व्यवहारी दृष्टिकोनानुसार सुदेशला प्रश्न विचारलाच, ‘‘का रे, पण एवढी दोन दिवस सहकुटुंब मौज-मजा म्हणजे..सहलीला खर्च तरी किती झाला म्हणायचा?’’

‘‘अहो, कशाला काही म्हणायला हवंय?’’ निमाताईंनी अप्पासाहेबांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

सुदेशने पटकन सांगितले, ‘‘अहो अप्पा खर्च रुपये शून्य! अहो, आमच्या ऑफिसने सगळ्या स्टाफसाठी दोन दिवस मौजमजेचा हा बेत आखला होता.’’

‘‘अरे वा. तुमचा मालक भलताच उदार दिसतोय रे!’’

‘‘काही विचारू नका!’’

‘‘मध्यंतरी तुमच्या कंपनीने असंच गेटटुगेदर ठेवलं होतं ना रे? मजा आहे!’’

‘‘त्याचं काय आहे अप्पा, आमच्या या कंपनीत कमीत कमी वर्षांतून दोनदा तरी असे कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसाठी काही ना काही सरप्राईजेस असतात! शिवाय कंपनीला फायदा झाला की, पुन्हा पार्टी असते ती वेगळीच!’’

‘‘अरे वा! सुदेश छानच आहे हो तुझी ही नवी कंपनी! मालक चांगला दिसतोय रे!’’ निमाताई म्हणाल्या.

‘‘अगदी! त्यामुळे सगळा स्टाफसुद्धा मालकावर खूश असतो!’’

‘‘त्या खुशीत मालक तुम्हाला एरवी कित्येक तास राबवून घेतो हे कुणाच्या लक्षात येत नाही वाटतं!’’ अप्पासाहेबांनी शेरा मारलाच.

‘‘असं काही नाही अप्पा! सगळे आपलेपणानं काम करत असतात इथे! आपलं-परकं असं काही नाहीच इथे! ऑफिसची वेळ झाली, आता आम्ही चाललो! असं नसतं इथे!’’ सुदेशने सारवासारव केली.

‘‘केलीय खरी जादू तुमच्या मालकाने! कितीही तास राबवा, ओव्हर-टाइम नाही, काही नाही. शिवाय सुट्टय़ा नाहीतच कधी! आठवडय़ाचे सहा दिवस राबतायत लोक!’’

‘‘अहो चांगले संबंध आहेत त्यांचे! तुम्ही का उगीच त्यांच्यातल्या देवघेवीचे हिशेब करता?’’ निमाताईंनी अप्पासाहेबांना पुन्हा अडवलं.

तो विषय तिथेच संपला. पण अप्पासाहेबांच्या मनात सुदेशच्या या नवीन नोकरीबाबत कर्मचारीवर्ग आणि मालक याविषयी काही विचार रुजलेच. एक दिवस सुदेश घरी सांगत आला, ‘‘आज आमच्या मालकाची ‘तरुण यशस्वी उद्योजक’ म्हणून खास मुलाखत आहे रात्री!’’

सगळे जण सुदेशच्या या तरुण उद्योजकाची मुलाखत ऐकायला उत्सुक होते. मुलाखत सुरू झाली. या तरुणाने फार थोडय़ा अवधित यशस्वी होऊन दाखवलं होतं. इतरांच्या दृष्टीने मंदी असूनही याने मात्र यशाचा झेंडा रोवला होता. त्याची हुशारी, सत्प्रवृत्त मन, बोलण्यातील लाघव हे तर त्याचे प्लस पॉइंट्स होतेच. पण त्याच्या भोवती असलेलं त्याचं सल्लागार मंडळ हेही त्यामागे ठामं उभं होतं. साहजिकच अल्पावधीतल्या घवघवीत यशामुळे त्याचा यशस्वी उद्योजक म्हणून डंका वाजत होता. शिवाय आपल्या कर्मचाऱ्यांना आपुलकीने स्वत: बरोबर घेऊन जाणारा, अशी स्तुतिसुमनं त्याच्यावर उधळली जात होती.

मुलाखत छानच झाली. सगळं ऐकून अप्पासाहेबांच्या मनात एक प्रश्न वारंवार उद्भवत होता, ‘कोटीच्या कोटी फायदा झाल्यावर कर्मचारीवर्गाला केवळ एखादी दणदणीत पार्टी दिली की, ‘कर्मचारीवर्गाला आपल्याबरोबर घेऊन जाणारा उद्योजक’ असं म्हणणं कितपत योग्य आहे? हा फायदा ज्यांच्यामुळे झाला, त्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फायदा मिळणं गरजेचं नाहीए? त्यांच्या पगारात भरघोस वाढ किंवा कौतुकाची थाप म्हणून काही आर्थिक बक्षिसी त्यांना नको मिळायला? कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचं, कंपनीसाठी केलेल्या कष्टांचं चीज नको व्हायला?’ अप्पासाहेब त्या वेळी काही बोलले नाहीत. पण टाटांसारखे उद्योजक का आणि कसे उदारहस्ते आपल्या कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत हे त्यांना माहीत होतं. त्यांनी गिरीश कुबेरांनी लिहिलेलं ‘टाटायन’ हे पुस्तक वाचलेलं होतं. ‘टाटायन’ मध्ये ‘टाटा’ प्रत्यक्ष नफ्यात आपल्या कर्मचाऱ्यांना कसे वाटेकरी करून घेत याविषयी वर्णन आहे. त्यावरून टाटांची ‘सर्वसमावेशक वृत्ती’ मनावर ठसते आणि मग ‘हे खरे कर्मचारीवर्गाला बरोबर घेऊन जाणारे उद्योजक’ असं उत्स्फूर्तपणे म्हणावंसं वाटतं, असं अप्पासाहेबांचं स्पष्ट मत होतं. या उलट कर्मचाऱ्यांना आठवडय़ाचे सहा दिवस, कितीही तास अणि वेळप्रसंगी रविवारीसुद्धा कामावर बोलावणारा उद्योजक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांची पिळवणूकच करतो असं त्यांना वाटायचं. कर्मचाऱ्यांच्या जास्तीच्या वेळेचा वापर, एक कपर्दिकही न मोजता सर्रास आपल्याला हवा तसा करून घेणं ही मनमानी त्यांना पटत नव्हती. मालक गोड गोड बोलून, अधून मधून झडणाऱ्या मौजमजेच्या स्वरूपात मधाची बोटं कर्मचाऱ्यांना चाटवतोय की, सत्प्रवृत्तीचा पुतळा असलेल्या मालकाला भोवतालच्या सल्लागारांनी उभारलेली मार्केटिंगची स्वार्थी तटबंदी जाणवतच नाही, याबद्दल अप्पासाहेब साशंक होते. त्यांनी स्वत: छोटासा उद्योग चालवलेला होता. त्यामुळे त्यातलं इंगित त्यांना पुरेपूर माहीत होतं.

कालांतराने चालू परिस्थितीची चिरफाड करण्याची वेळ आलीच.

सुदेशच्या कंपनीतलाच एक सहकारी आजारी पडला. सुरुवातीला कंपनीच्या लोकांनी आपण त्याची पुरेपूर काळजी घेत आहोत असा दिखावा केला. थोडी फार मदत करण्याची तत्परताही दाखवली. पण त्याचं आजारपण जसजसं लांबत गेलं, तसतशी कंपनीची दडलेली स्ट्रॅटेजी बाहेर येऊ लागली. त्या सहकाऱ्याला थोडं बरं वाटताच त्याने कामावर येण्याची व्यक्त केलेली इच्छा डावलली गेली. ‘तुम्ही सध्या आराम करा आणि पूर्ण बरं वाटल्यावरच कामावर या.’ अशा काळजीवाहू गोड शब्दात त्याचं येणं बंद करून टाकलं. त्याच्या मानसिकतेचा विचार न करता असे कोरडे काळजीवाहू शब्द त्याला ऐकवणं कितपत योग्य होतं? उमेदीनं कामावर येण्यास उत्सुक असलेल्या त्याचा आत्मविश्वास त्यामुळे खच्ची झाला नसेल? जो मालक माझं कुटुंब, माझी माणसं’ असा प्रत्येक मुलाखतीच्या वेळी आपल्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख करीत असे, त्या मालकाला सहा-सात महिन्यांत आपल्या कर्मचारी कुटुंबातल्या या माणसाची आठवण जरासुद्धा झाली नाही. कंपनीच्या संदर्भात होणारा भरघोस फायदा लुटताना, त्या माणसाचा झालेला उपयोग, त्याचे शब्द, त्याची हातोटी याची जराही आठवण त्याच्या मनाला शिवली सुद्धा नसेल?

त्या सहकाऱ्याकडे सुदेशच्या एक-दोन खेपा झाल्या. त्याला शक्य ती मदतही तो करत राहिला. पण ‘इतर लोकांचं काय हे वागणं?’ असं अप्पासाहेबांनी सुदेशला म्हणताच सुदेशने अप्पासाहेबांनाच सुनावलं,

‘‘अहो अप्पा, असं काही नसतं हो! ऑफिसमधली नाती तेवढय़ापुरतीच असतात. त्यात वाईट काय वाटून घ्यायचं?’’

‘‘अरे पण, इतका कोरडेपणा कसा काय असू शकतो? तू नाही का जात त्यांच्याकडे?’’

‘‘मी त्याच्याकडे जातो. त्याचं काय एवढं?’’

अप्पासाहेब विचार करत राहिले.

‘‘सुदेश किती सहजपणे सगळं स्वीकारतोय!’’

आला क्षण कसा वापरायचा.. संपर्कात येईल, त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा आणि नंतर नामानिराळे कसं राहायचं, हे काळाच्या ओघात सगळ्यांच्या अंगवळणी पडलंय! आजच्या पिढीचा हा गुणधर्म म्हणायचा की, पुढे चालत राहण्याचा निकष म्हणायचा? सुदेश स्वत:च्या स्वभावधर्माची बूज राखत वाटचाल करतोय! आपण मात्र प्रत्येक ठिकाणी भावनिक गुंतवणूक करू पाहतोय! की, आपण आपल्याच दृष्टिकोनातून सगळ्यांना तोलू पाहतोय! हा आपला दोषच म्हणायचा का?

निमाताईंनी एक दिवस त्यांना त्यावरून म्हटलंसुद्धा,

‘‘अहो, नका एवढा त्रास करून घेऊ स्वत:ला! सुदेश म्हणतो, ते खरं आहे. प्रत्येक जण काळाची गरज लक्षात घेऊन, तरीसुद्धा आपापल्या सहज प्रवृत्तीनुसार वागतो. जग बदलणं कधी कुणाला शक्य झालंय का? आता या वयात तर कुणाला बदलवण्याचा विचारसुद्धा मनात येता कामा नये आणि बरं का, सुदेश म्हणत होता, या वर्षी त्यांच्या कंपनीच्या वार्षिकोत्सवात आपल्या दोघांना अध्यक्षस्थानी बसवणार आहेत. आपल्या हस्ते सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कसली कसली बक्षिसं द्यायचं आहेत म्हणे!’’

‘‘चला! चला! पाघळल्या निमाताई!’’ कंपनीने दाखवलेली निथळती मधाची बोटं तुम्हाला खुणावतायत म्हणायची!’’ अप्पासाहेब उद्गारले.

पण ते मनातल्या मनात विचार करत राहिले,

‘‘आता यात खरं स्थितप्रज्ञ कुणाला म्हणायचं? सगळं समजून उमजून निर्लेप राहून परिस्थितीशी हसतमुखाने समझोता करणाऱ्या सुदेशला आणि निमाताईंना की, कुठल्याही मोहाला बळी न पडता तत्त्वत: आपल्याच मतावर चिकटून राहणाऱ्या आपल्याला?