आज सकाळपासूनच सारखं आठवत आहे, आईबाबा सतत सांगायचे, ‘‘पहाटे उठून अभ्यास करत जा, मन एकाग्र व्हायला मदत होते. आरोग्य आणि अभ्यास दोन्हीसाठी उत्तम वेळ आहे ही.’’ पण बेहत्तर, एक दिवसही मनावर घेतलं असेल तर.. शाळा संपली; कॉलेजमध्ये आल्यावर मात्र बळजबरीने शेवटचे दोन महिने दिवसरात्र एक करावीच लागली; पण सर्व काही नाइलाजास्तव. पुढे लग्न झालं, मुलगा झाला. मग लहान बाळ आणि झोप हे समीकरण कधी जमलंय का कुणाला! वाट पाहात होते की, थोडा मोठा होऊ दे मुलाला, मग आपलं ते स्वच्छंदी आयुष्य परत जगता येईल. बघता बघता घडय़ाळ आणि कॅलेंडर भराभर धावत गेले. अचानक लोक म्हणायला लागले, चाळीशी आली.

हेच तर ते माझं ड्रीम वय ज्याची मी वाट पाहात होते. आरामात झोपायचं, काही व्यवधानं नाही, म्हणजे रविवार तर नक्कीच हक्काचा! उद्या रविवार. मी ठरवलं अजिबात ८.३० च्या आधी उठायचं नाही. घरात सगळ्यांना सांगितलं, कोणी मला उठवू नका, काही झालं तरी मी उठणार नाही. रात्री अकरापर्यंत एक मस्त मराठी चित्रपट पाहिला आणि कॉफी प्यायली सगळ्यांनी. मग एकदम गाढ झोपून गेले. आठ तासांची ती ‘ब्युटीस्लीप’ का काय त्याचा अनुभव घ्यायला..

‘‘ट्रिंगऽऽऽऽऽ..’’ अरे अलार्म बंदच केला नाही.

रोजच्याप्रमाणे साडेपाचला घडय़ाळाने इमानेइतबारे त्याचं काम केलं आणि तडक उठून बसले मी. सगळे झोपण्यापूर्वीचे प्लॅन गुंडाळून ठेवले. कोणासाठी? ‘मॉर्निग वॉक’?

हो मॉर्निग वॉकच. चाळिशीला ५/७ वर्षे राहिले असताना स्वत:ला धडधाकट ठेवण्यासाठी सुरू केलेला आटापिटा. कोणी तरी धाडकन भानावर आणल्यासारखा तडक एक दिवस सुरू केलेला दिनक्रम! कधी नवऱ्याबरोबर, मैत्रिणींबरोबर नाही तर कधी एकटंच. एकदम टवटवीत, प्रसन्न दिवसाची सुरेख सुरुवात. किती मोठा परिवार आमचा. मुंबई लोकल ट्रेनमध्ये असतो तसा कित्ती माणसं फक्त चेहऱ्यांनी माहिती, तर काही अगदी जीवश्चकंठश्च!

‘ती’ आज दिसली नाही, रोज तिच्या बाबांचा हात धरून रस्त्याच्या पलीकडून जायची, अगदी नित्याने न चुकता. साधारण सहा र्वष झाली असतील. तिचे बाबा हात धरून जवळ जवळ ओढत न्यायचे तिला, मग हळूहळू म्हणजे अलीकडेच बाबा पुढे आणि ती मागे अशी जोडी दिसायची; पण कधीच नाही तिचं नाव विचारलं, ना तिची व्यथा. का तिला तिचे बाबा न्यायचे? की त्यांना तिला ‘मॉर्निग वॉक’ला नेणे हाच तिचा उपचार होता? सगळे प्रश्न अनुत्तरित! तिने मला कधी पाहिलं का माहीत नाही; पण माझ्या दिनचर्येचा ते हिस्सा होऊन बसले आहेत. आज आली ती की निदान नाव तरी विचारेन तिचं.

सगळ्यात नियमाने फिरणारे सरासरी वय ७५ ते ८० हे आहे. त्यांच्या आयुष्यात तर किती र्वष हा नियम असेल कोण जाणे? पण मला मात्र चुकल्याचुकल्यासारखं वाटलं. आज ते ‘काका- मावशी’पण दिसत नाहीत? ‘‘किमान अर्धा तास तरी चालते मी. तेवढंच होतं ग या वयात.’’ हे सांगणाऱ्या काकूंचं वय ७८. मला कुतूहल वाटतं, की काय अपेक्षा असते माणसाची सुखी आयुष्याची? परावलंबित्व नाही आलं म्हणजे बास, वयाची ७५ वर्षे उलटून गेल्यावर. त्यात अर्धाच तास चालता येतं म्हणून खंत वाटते त्यांना!

सहस्रचंद्रदर्शन सोहळा नुकताच पूर्ण केलेल्या काकांना, आज मी फिरताना मागे टाकलं. ते सहजच म्हणाले, ‘‘आता माझा वेग थोडा कमी झालाय.’’ माझ्या मनात आणि ओठांवर एकाच वेळी आलं, ‘‘काय माहीत काका, अजून चाळीस वर्षांनी आम्ही चालत तरी असू का!’’ त्यामध्ये त्यांचं कौतुक आणि माझी अव्यक्त भीती दोन्ही होतं.

या सगळ्या छोटय़ा छोटय़ा दिसणाऱ्या गोष्टींनी आणि माणसांकडून रोज केवढं शिकायला मिळत होतं! एक एक धडा मिळत होता रोज. माझी मनाची कक्षा कधी रुंदावत गेली कळलंच नाही. आज लक्षात आलं, नुसतं चालणं-फिरणं नाही, तर हे सगळे माझ्या ‘मॉर्निग वॉक’चे अविभाज्य घटक होऊन बसले होते. जसा पोटात चहा गेल्याशिवाय, शरीर दिवस सुरू करत नाही, तसं डोळ्यांना आणि कानांना यांचं व्यसन तर लागलं नाही? पण आयुष्याला रोज पैलू पाडणाऱ्या या माणसांना आणि अनुभवांचं भरगच्च गाठोडं देणाऱ्या प्रसंगांना व्यसन नाहीच म्हणता येणार.

आज का कोणीच आलं नसेल? एखाददोन तुरळक लोक सोडून? अरे विसरलेच आज रविवार आणि नाही म्हणता म्हणता मी रोजच्या वेळेच्या तब्बल एक तास आधी बाहेर पडले होते.

पण मी एकटी नव्हते. फिरून झाल्यावर १५ मिनिटे बेंचवर म्हणजे खऱ्या अर्थाने आणि लौकिकार्थाने ‘बेंचवर’ बसतो. रोज आम्ही काहीही न करता त्या बाकडय़ावर बसण्याच्या त्या घटनेलाच आय.टी.वाल्यांनी ‘बेंचवर बसणे’ म्हणायला सुरुवात केली असणार.

झाडावरच्या पानांच्या हिरव्या रंगाच्या असंख्य छटा, त्यांची ती सळसळीतून सुरेल नादनिर्मिती. प्रदूषण, ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांवर मात करून आजही दिमाखाने दिल्लीत दिसणाऱ्या चिमण्या, मैना, पोपट यांचा मधुर किलबिलाट. सृष्टी अक्षरश: सौंदर्यानी ओसंडून वाहत असते या वेळेस. कितीही साठवून घेऊ त्याला डोळ्यांमध्ये तरी तृप्तता नाही मिळत. एकदा असा दिवस सुरू झाला ना, की ते मेडिटेशन आणि कसल्याच गोष्टींची गरज राहात नाही. कालच्या दिवसांतल्या काही कटू क्षण, घटना कालच्या पानावरच संपतात.

खूपदा लोक विचारतात, आज एकटीच बसली आहेस तू? हो माझ्या आजूबाजूला नसतं कोणी; तरी या सर्व लोकांशी, त्या पानांशी, पक्ष्यांशी एक नकळत नातं जोडलं गेलं आहे. कुठलंही नाव नाही त्या नात्याला, ना कुठल्या व्याख्येत व्यक्त होऊ शकेल. थेट हृदयाशी जोडली गेली आहेत ती. काही नवीन नाती जोडली जातील, काही जुनी संपतीलही. पण ते अनुभव, तो आनंद मात्र चिरंतन राहील.

सकाळी उठण्याच्या त्या कंटाळ्यापासून सुरू झालेल्या त्या प्रवासाची वाट, अजिबात न मोडता येणाऱ्या ‘मॉर्निग वॉक’पाशी घेऊन येईल असा विचारही नव्हता केला. कधी चुकून काही कारणांनी जाता नाही आलं तर, लोकांचा, ‘‘का नाही आलीस आज?’’ हा प्रश्न सुखावून जातो, ‘‘आलीस आज?’’ हा प्रश्न सुखावून जातो, की कधी नकळत आपणही त्यांच्या ‘मॉर्निग वॉक’चा भाग होऊन गेलो आहोत.

असेच कितीदा येता जाता

किती जोडले किती सोडले

उगाच का मी हिशोब ठेवू?

घडेल तसं घडू द्यावं

आयुष्याचं प्रत्येक पाऊल

त्याच्या आवडीने पडू द्यावं.

ऋचा मायी

ruchamayee@yahoo.com