‘तो’ पाहुणा म्हणून आला की माझी अवस्था बिकट व्हायची. त्याचं म्हणणं असायचं, ‘‘सतत माझाच विचार कर. मलाच डोक्यात ठेव. माझ्याच सान्निध्यात रहा. कुठेही जाऊ  नकोस.’’ त्याच्या ‘मी’च्या पाढय़ाला कंटाळले होते पण त्याची दहशत एवढी होती की मी घराबाहेर पडूच शकत नव्हते. अतिथी कसला दहशतवादीच होता तो..’’

साधारण एक महिन्यांपूर्वीची गोष्ट. सकाळचे पाच वाजले होते. ओटय़ाखालून चहाचे भांडे काढण्यासाठी मी खाली वाकले आणि डोळ्यापुढे एकदम काजवेच चमकले. बाजूला पहिलं तर ‘तो’ उभा. मी म्हटलं, ‘‘तू आता इकडे कुठे?’’ तर म्हणाला, ‘‘अगं, मी अतिथी आहे. मी केव्हाही येऊ  शकतो.’’

‘‘अरे हो, पण ही काय वेळ झाली यायची. मला आता चहा पिऊन गार्डनमध्ये फिरायला जायचंय. चांगला अर्धा तास फिरते आणि नंतर तिथे बसून मी नित्य व्यायाम करते. मग आमच्या मैत्रिणींच्या कट्टय़ावर गप्पांचा फड जमतो. खूप मजा येते आणि आज तर सर्व जणी येणार आहेत. आज आमची भिशी फुटणार आहे. सगळे पैसे माझ्याकडे आहेत. माझी वाट पाहतील सगळ्या जणी. मी गेले नाही तर सर्व जण नाराज होतील.’’

‘‘सोड गं, तुला वाटतं तुझी वाट पाहतील? भ्रम आहे तुझा. तुझ्यावाचून कोणाचं काहीही अडत नाही. उगाच भाव खाऊ  नकोस. मीच तुझ्या जास्त जवळचा आहे.’’

मी नुसती मान हलवली तर लगेच धावला नि डोक्यातच जाऊन बसला. म्हणतो कसा, ‘‘बघ मी आलो ना. आता काही दिवस मीच तुझी सोबत करणार आहे. मी म्हणतो तसंच वाग. झोप पाहू आता.’’

‘‘अरे पण मला..’’ पुढे काही बोलणार तोच मी भेलकांडत पलंगावर कोसळले अन् गपकन डोळे मिटले. तेवढय़ात त्याचा आवाज आलाच, ‘‘आता कशी शहाण्यासारखी वागलीस. झोप आता.’’ मी बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. भांडय़ांचा आवाज आला. साधनाने, माझ्या सुनेने स्वयंपाकघराचा ताबा घेतला होता. ती विचारत होती, ‘‘आज काय मॉर्निग वॉक नाही का? मैत्रिणी वाट बघत असतील.’’ मी बोलणार तोच त्याने एक थप्पड मारली डोक्यात. मी गप्प झोपले. सून पुटपुटली, ‘‘झोपल्या वाटतं.’’ माझी इच्छा असूनही शब्द उमटत नव्हते. थोडय़ा वेळाने साधनाचा आवाज आला. ‘‘अहो उठा ब्रेकफास्ट घ्या. गोळी घ्यायची आहे ना.’’

‘तो’ पाहुणा म्हणून आला नि माझी अशी अवस्था झाली की काय करायचं हे तिला माहीत झालं होतं. मला धरून तिनं वॉश बेसिनकडे नेलं. मीही त्याच्या थप्पडांना दाद न देता बेसिनपाशी गेले. तोंड धुतलं आणि थोडं खाऊन गोळी घेतली. एवढय़ात तो तडमडलाच.. मी किंचाळले, ‘‘अरे मध्येच उपटसुंभासारखा कसा उगवलास?’’

तो खेकसला, ‘‘अगं, मी अतिथी आहे. उपटसुंभ नाही.’’

‘‘कसला अतिथी?’’

तो माझा शब्द कसा पडू देईल? लगेच कोकलला, ‘‘एवढं वय झालं तरी कळत कसं नाही? अगं, कोणतीही तिथी, वार न सांगता येतो तो अतिथी आणि आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहे ‘अतिथी देवो भव’.’’

याच्याशी काय वाद घालणार? मी डोळे मिटून झोपले. तोच खुदकन हसून म्हणाला, ‘‘दॅटस् लाइक ए गुड गर्ल.’’

मनात म्हटलं, ‘‘अरे वा! आता माझं वय काढत होता नि आता लगेच गर्ल! कमाल आहे.’’ मी डोळे मिटून घेतले. तासाभरानं साधना आली. म्हणाली, ‘‘आई, आज ऑडिट आहे मला, ऑफिसमध्ये गेलंच पाहिजे. तुमच्यासाठी मऊ  खिचडी केली आहे. तुमच्या ‘पाहुण्याला’ सांभाळून घ्याल ना! मला आज दांडी मारता येणार नाही. मी मानेने हो म्हणण्यासाठी मान हलवली तोच त्यानं जी उसळी घेतली त्यामुळे मी गरगरत दरीतच कोसळू लागले. पलंगाच्या कडा दोन्ही हाताने घट्ट  पकडल्या. तोंडातून शब्द निघेना. घसा कोरडा पडला शेवटी हातानेच तिला जा म्हणून खुणावलं.

दुपारी उठून खिचडी गरम करण्यासाठी ओव्हन उघडला तोच तो कानाशी लागला. ‘‘सांभाळ, भांडं हातातून पडेल.’’ मी त्याच्याकडे लक्ष न देता खिचडी खाल्ली. गोळी घेतली व झोपून गेले. तो मात्र गर्जत होता, ‘‘गोळी कशाला घेतलीस? मला आवडत नाही.’’ मी काहीच बोलले नाही, कारण माझी ब्रह्मानंदी टाळी लागली होती. डोळे उघडले तर साडेतीन वाजले होते. त्याचं अस्तित्व जाणवलं नाही. मी सुस्कारा सोडला आणि शाळेची तयारी करू लागले.

‘‘अरे मी जरा बाहेर गेलो तर लगेच उठलीस.’’ तो उपटलाच. मी म्हटलं, ‘‘मला शाळेत जायचं आहे.’’ तर तो कुत्सितपणे म्हणतो कसा, ‘‘या वयात शाळेत जाणार?’’ (मेला पुन्हा माझे वय काढतो. अस्सा राग आला, पण संयम ठेवला.) मी शांतपणे म्हटले, ‘‘हो. आमची नाना-नानींची शाळा आहे आणि आज गुरुवार आहे.’’

‘‘मग काय दत्ताला हार-पेढे.’’

मी अभिमानाने सांगू लागले, ‘‘तसे नाही रे मी गुरुवारी ज्ञानेश्वरी सांगते. माझी सगळे वाट  बघतील.’’ तो मिश्कीलपणे बोलला, ‘‘काय भ्रम आहे तुझा. तू ज्ञानेश्वरी सांगतेस तेव्हा अर्धी माणसे पेंगतात. काही घडय़ाळाकडे बघतात तर काही तल्लीन झाल्याचे नाटक करतात. तू गेली नाहीस तर आनंदाने गप्पा मारतील. करू दे की त्यांना आनंद साजरा.. आणि तू गृहिणी आहेस ना मग गृहिणीधर्माचे पालन कर’’

‘‘म्हणजे काय करू?’’

‘‘अगं मी अतिथी आहे. माझा आदरसत्कार कर.’’

‘‘कसा?’’

तो संतापून म्हणाला, ‘‘प्रथम त्या गोळ्या बंद कर. त्याचा मला त्रास होतो. सतत माझाच विचार कर. मलाच डोक्यात ठेव. माझ्याच सान्निध्यात राहा. कुठेही जाऊ  नकोस.’’ त्याच्या ‘मी’च्या पाढय़ाला कंटाळून मी डोळे मिटले. त्यानं थोपटून म्हटलं, ‘‘गुणी गं माझी बाळ झोप.’’ अशी आमची जुगलबंदी आठ-दहा दिवस चालली होती. मी त्याला न जुमानता गोळ्या घेत होते. तो अधूनमधून बाहेर जात असे. तेवढीच मला उसंत मिळत होती. पण त्याची दहशत एवढी होती की मी घराबाहेर पडूच शकत नव्हते. अतिथी कसला दहशतवादीच होता. घरात बसून जीव गुदमरत होता पण दाराबाहेर पडण्याची हिम्मत नव्हती.

एक दिवस सकाळीच आला म्हणाला, ‘‘तुझी सुटका. आता मी शेजारच्या श्याम्याकडे जातो. येतो मी.’’ मी किंचाळले, ‘‘कोठेही जा पण ‘येतो’ म्हणू नको ‘जातो’ म्हण.’’

‘‘अगं, पण आपल्या संस्कृतीत..’’ त्याचं वाक्य तोडत मी ओरडले, ‘‘तुला रे त्याची कसली चाड, तू तर असंस्कृत आहेस. चल निघ माझ्या घरातून. खबरदार पुन्हा माझ्या दारात आलास तर तुझी तंगडीच तोडीन, मग लंगडशील आयुष्यभर.’’ माझ्यात कोठून बळ आलं माहीत नाही, बहुधा बराच अन्याय झाला की दुबळा माणूसही पेटून उठतो. माझंही तसंच झालं. माझा कडकलक्ष्मीचा अवतार पाहून तो पळालाच. आता तुम्हाला समजले असेल तो आगंतुक पाहुणा म्हणजे कोण तो? मला आलेला ‘व्हर्टीगो’चा झटका! आता मात्र मी सर्व ‘पॅथ’चा वापर करून त्याचा पुरता बंदोबस्त करणार आहे. तुम्हीही काळजी घ्या हां.. आणि दूर ठेवा त्या व्हर्टिगोला..

लतिका नाईक

nlatikav@gmail.com