दुपारी तीन वाजता टेलिफोनची ट्रिंग ट्रिंग अशी िरग वाजली आणि आम्हा सर्वाच्याच हृदयात आनंदाची कारंजी उसळली! कोण आनंद झाला होता आम्हाला! फोन मी घेणार, मी घेणार म्हणत आमच्या छोटय़ा मुलीने फोन उचलला आणि हॅलो, हॅलो कोण बोलतंय? असे ती गोड आवाजात बोलली.

नुकताच आम्ही आमच्या घरचा लँडलाइन टेलिफोन बंद केला. घरात आता प्रत्येकाकडे त्याचा-त्याचा स्वतंत्र मोबाइल आहे. शिवाय मोबाइलमध्ये संपर्क साधण्याचे विविध पर्यायही उपलब्ध आहेत. मोबाइलमधल्या एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक अशा अनेक माध्यमांद्वारे पटकन् संपर्क साधता येतो. इतकंच काय, परदेशात असलेल्या आमच्या मुलींशी वाइबर कॉलद्वारे विनामूल्य मनसोक्त बोलता तर येतंच, शिवाय स्काइपवरून समोरासमोर बसून निवांत गप्पाही मारता येतात. इतका सगळा विचार केला आणि आता लँडलाइन टेलिफोनची तशी काही आवश्यकता नाही, असा विचार करून तो बंद करायचं ठरवलं आणि तो विचार अमलातही आणला.
मोबाइलचा जसा शोध लागला आणि घरात प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला तसा लँडलाइन दूरध्वनी काहीसा दुर्लक्षित आणि निरुपयोगीच होऊ लागला होता. टेलिफोनचं ते यंत्र दिवसेंदिवस गुपचूपच पडून राहू लागलं. क्वचितच कधी तरी वाजू लागला. शेवटी एक दिवस ठरवून मी टेलिफोन एक्स्चेंजमध्ये गेले. दूरध्वनी जोडणी
बंद करण्यासाठी अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रं दिली. त्यांनी ‘दूरध्वनी संच’ आणून देण्यास सांगितलं. सर्व सोपस्कार पूर्ण करून घरी आले आणि घरच्या त्या टेलिफोन यंत्राकडे पाहिलं आणि मन एकदम उदासच झालं. उद्या हे आपलं टेलिफोन यंत्र घरातून जाणार या विचारानं वाईट वाटू लागलं.
वीस वर्षांपूर्वी हा दूरध्वनी संच घरी आला तो दिवस आठवला. दूरध्वनी जोडणी मिळावी म्हणून नोंदणी केल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी आमचा नंबर लागून फोन घरी आला होता. तो दिवस आम्ही एखाद्या सणासारखा साजरा केला होता. घरातल्या एल् टाइप शोकेसवर टेलिफोन ठेवण्यासाठी खास जागा तयार केली होती. टेलिफोनखाली ठेवायला छानशी मॅट आणि त्याच्यावर धूळ उडू नये म्हणून त्याच्यावर ठेवण्यासाठी सुंदरसा विणलेला रुमाल आणला होता. टेलिफोनशेजारी सुबकशी फुलदाणी आणि फोन नंबर्स टिपून ठेवण्यासाठी डायरी आणि पेनस्टँड ठेवलं होतं. अशी सारी जय्यत तयारी केली होती. आणि एकदाचं टेलिफोन असलेलं ते खोकं घरी आलं. आमच्या छोटय़ा मुलीने उत्सुकतेनं
आणि आनंदानं ते उघडलं आणि खोक्यात असलेला तो राखाडी रंगाचा नवा कोरा टेलिफोन बघून आम्हा सर्वाना कोण आनंद झाला होता! त्याला जागेवर ठेवून मुलीच्या हस्ते त्याची हळद-कुंकू, हार वाहून पूजा केली. अगदी त्याला ओवाळलंदेखील. त्या दिवशी जेवणातही गोडधोड बनवलं होतं. घरात एका नवजात बाळाचं स्वागत करावं तसं आम्ही या टेलिफोनचं जोरदार स्वागत केलं होतं. टेलिफोनच्या कनेक्शनचं सारे सोपस्कार व्यवस्थित पार पडले. ‘आता तुमचा फोन सुरू झाला आहे,’ अशी सूचना देणारा दूरध्वनी एक्स्चेंजमधून येणार होता. त्याची आम्ही आतुरतेनं वाट पाहात बसलो होतो.
दुपारी तीन वाजता टेलिफोनची ट्रिंग ट्रिंग अशी िरग वाजली आणि आम्हा सर्वाच्याच हृदयात आनंदाची कारंजी उसळली! कोण आनंद झाला होता आम्हाला! फोन मी घेणार, मी घेणार म्हणत आमच्या छोटीनं फोन उचलला. ‘हॅलो, हॅलो कोण बोलतंय?’ असा गोड आवाजातला तिचा स्वर ऐकला आणि आमचा टेलिफोन सुरू झाल्याची सूचना आम्हाला मिळाली. त्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी यांना फोन करून हा आनंद आम्ही द्विगुणित केला होता.
नंतर काही काळाने टेलिफोनचे नव्या नवलाईचे ते दिवस संपले. पण त्या यंत्राशी मात्र एक अनामिक नातं दिवसेंदिवस जुळत गेलं. याच टेलिफोनच्या यंत्रानं किती तरी आनंदाच्या बातम्या, सुखद आश्चर्याचे धक्के, खुशालीचे निरोप, आग्रहाची आमंत्रणं आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि काही अत्यंत दु:खद बातम्याही. टेलिफोनची िरग वाजली की तिचा तो ट्रिंगऽऽऽ ट्रिंग असा नाद घरभर घुमायचा. कोणाचा असेल बरे, म्हणून मनात एक उत्सुकता निर्माण व्हायची. मनातल्या मनात कोणाचा असेल याचा एक अंदाजही बांधला जायचा. अवेळी वाजला की उगाच मनात नसत्या शंकाकुशंका यायच्या. कधी कधी तो टेलिफोन काही काळासाठी ‘मृत’ म्हणजे ‘डेड’ व्हायचा. मग घरात अस्वस्थता यायची. उगाचच सगळं कामच ठप्प झाल्यासारखं वाटायचं. मग टेलिफोन एक्स्चेंजमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी लागायची. शिवाय एका फेरीत काम व्हायचं नाही. दोन-तीन चकारा माराव्या लागत तेव्हा कुठे मेकॅनिक यायचा आणि कुठे काय ‘फॉल्ट’ आहे बघून दुरुस्ती केल्यावर फोन पूर्ववत सुरू व्हायचा आणि हुश्श! म्हणून जीव भांडय़ात पडायचा. असं हे टेलिफोनचं यंत्र म्हणजे एक जिवाभावाचं घरातलं माणूसच झालं होतं. त्याच्याशी आपलेपणाचं, मायेचं नातं जुळलं होतं.. हे सारं आठवलं आणि आता हा टेलिफोन घरातून जाणार या विचाराने खूप वाईट वाटू लागलं. रात्रभर झोपही लागली नाही.
दुसरे दिवशी सकाळी टेलिफोन एक्स्चेंजमध्ये जाऊन तो टेलिफोन द्यायचा होता. म्हणून पहिल्या दिवशी केली तशी पुन्हा त्याची पूजा केली. त्याच्यावरून मायेने हात फिरवला. मोबाइलमध्ये त्याचे फोटो काढून ठेवले आणि टेलिफोनचे कनेक्शन काढून तो द्यायला गेले. एक्स्चेंजच्या ऑफिसमध्ये सही करून ते यंत्र तिथल्या कर्मचाऱ्याच्या हाती सुपूर्द केलं. तिथल्याच एका कोपऱ्यात लँडलाइन टेलिफोन बंद केलेल्यांची असंख्य टेलिफोन यंत्रं धूळ खात पडली होती. त्या ढिगात त्या कर्मचाऱ्याने आमचा तो टेलिफोन फेकून दिला आणि माझ्या डोळ्यात टचकन् पाणी आलं. चटकन तिथून निघाले.
घरी आले. पाहिलं तर टेलिफोनची जागा आता रिकामी पडली होती. घर एकदम सुनं वाटत होतं. घरात आता टेलिफोनची ती ट्रिंगऽऽऽ ट्रिंग िरग वाजणार नव्हती. घरातल्या प्रत्येकाच्या मोबाइलच्या वेगवेगळ्या सुंदर िरगटोन्स सतत वाजतच असतात; परंतु लँडलाइन टेलिफोनची वाजणारी ती िरग, घरभर घुमणारा तिचा नाद, फोन घेण्यापूर्वी कोणाचा असेल बरे? अशी मनात निर्माण होणारी उत्सुकता, फोन घेण्याची धावपळ, अधीरता ती सारी मजा काही औरच होती. तो आनंदही विलक्षण होता. ते सारं आता संपलं होतं, इतिहासजमा झालं होतं..!
pradnyakulkarni66@gmail.com