बायकोचं ते वाक्य माझ्या ‘डोक्यात गेलं’ आणि मी चॅलेंज म्हणून ‘हरीभरी पोटॅटो व्हेजिटेबल’ डिश करायला घेतली. कढईचे दोन्ही कान पकडले आणि तिला गॅसवर चढवली. अंदाजे पाच चमचे तेल टाकलं. मिसळणाचा डब काढला, उघडायला गेलो तर तो उघडेना. कढईतले तेल माझ्यावर तापलं. जळून खाक होण्याची धमकी देऊ लागलं. माझे पेशन्स संपू लागल्यावर चिमटा हातात घेतला नि मिसळणाच्या डब्याच्या दोन्ही कानशिलात मारल्या, पण निगरगट्ट डबा ऐकतच नव्हता. मग जोराचा फटका मारायला गेलो तर चिमटाच हातातून सटकला व तयारी केलेल्या ताटलीवर पडला. चिरलेली मिरची, कढीपत्ता, मटार, कोथिंबीर बिचारी घाबरून एकत्र झाली..

जेवल्याबरोबर झोपायचं नसतं म्हणून बायकोबरोबर दुपारचा दीड वाजताचा दूरचित्रवाहिनीवरील ‘परिपूर्ण किचन’  बघत होतो. तो ‘मनोहर’ कार्यक्रम चालू असताना जणू काही मी गेल्या जन्मी आचारी होतो या थाटात माझी अशी खास मतं व्यक्त करत होतो. ‘‘यात काय विशेष! सोपं, सरळ, साधं तर आहे!’’ माझी बडबड ऐकल्यावर तिनं एकच वाक्य म्हटलं, ‘‘पुरे झाली बडबड! एक तरी पदार्थ स्वत: करून घातलाय का मला खायला कधी?’’ झालं, तिचं हे वाक्य माझ्या ‘डोक्यात गेलं’ आणि मी ते एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं. तिला म्हटलं, ‘‘उद्या बघच मी तुला खासच ‘हरीभरी पोटॅटो व्हेजिटेबल’ डिश करून दाखवतो.’’ बायकोनं डोळे मोठे करून विचारलं, ‘‘हा कुठला नवीन पदार्थ?’’ दूरचित्रवाहिनीवरील रेसिपी कार्यक्रमात अशीच विचित्र नावं पदार्थाना दिलेली असतात, हे मी ऐकत असतो म्हणून साध्या बटाटय़ाच्या भाजीला हे नाव देऊन बायकोचं कुतूहल वाढवलं आणि म्हटलं, ‘‘उद्या बघच!’’

अनायसे दुसऱ्या दिवशी मंगळवार असल्यामुळे बायको मैत्रिणीबरोबर सिद्धिविनायक मंदिरात जाणार होती. सकाळचा ब्रेडबटर ब्रेकफास्ट झाल्यावर, मला खोचकपणे म्हणाली, ‘‘अहो! आज तुम्ही ती नवीन रेसिपी ‘हराभरा पोटॅटो’ करण्याचं प्रॉमिस केलं आहे माहीत आहे ना?’’ नंतर म्हणाली, ‘‘मी डाळभाताचा कुकर तयार करून ठेवते. तेवढा गॅसवर चढवा. तीन शिट्टय़ा झाल्यावर गॅस बंद करायला विसरू नका. मला आज उशीर होईल १२ वाजतील.’’ मी मनात म्हटलं, ‘‘झालं, म्हणजे माझे आज १२ वाजणार.’’ पण जरासुद्धा टेन्शन चेहऱ्यावर न दाखवता म्हटलं, ‘‘तू काही काळजी करू नकोस. टेक युवर ओन टाइम!’’ आणि टेन्शन-फ्री दाखवण्याकरिता कोचावर वर्तमानपत्र वाचत बसण्याचं नाटकही केलं.

बायकोनं जाताना दरवाजा बंद करताना धडकन आवाज झाला आणि माझ्या छातीत धस्स झालं. मी कागद-पेन घेऊन कामांचा क्रम लिहून काढायला सुरुवात केली. क्रमांक एक- कुकरच्या तिसऱ्या भांडय़ात पाच बटाटे टाकून चढवणं. मधूनमधून शिट्टय़ांकडे लक्ष ठेवणं. नंबर दोन -मिरच्यांचे लांब लांब तुकडे, कढीपत्ता व भरपूर कोथिंबीर चिरून ठेवणं  वगैरे वगैरे. ती यायच्या आत ‘हराभरा पोटॅटो’ ही माझी डिश तयार करण्याचं ठरवलं व कामाला लागलो.

तिनं तयार केलेल्या कुकरमध्ये तिसरं भांडं घेऊन पाण्यात बटाटे टाकले व कुकर गॅसवर चढवला. मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, मटार फ्रिजमधून शोधून काढले. उगाचच रिस्क नको म्हणून विळी न घेता डायनिंग टेबलवरच सुरीनं मिरच्या, कोथिंबीर कापून घेतल्या. एखाद्या सराईत आचाऱ्याप्रमाणे एका ताटलीत, चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता, थोडेसे कोवळे मटार व बरीचशी चिरलेली कोथिंबीर रचून ठेवली. तेवढय़ात कुकरनं मला पहिली शिटी मारली. तीन शिट्टय़ा होईपर्यंत गोंधळ नको म्हणून त्याला न्याहाळत बसलो. तिसरी शिट्टी झाल्यावर त्याला खाली उतरवलं. जरा वेळाने कुकर उघडला तर वरच्या भांडय़ातल्या पाचही बटाटय़ांनी पाणी जास्त झाले म्हणून डोके फोडून घेतले होते. मी म्हटलं, ‘‘जाऊ दे. नाही तरी त्यांना सोलवटून त्यांचे तुकडेच करायचे आहेत.’’ एका बाऊलमध्ये बटाटे चिरून ठेवले.

कढईचे दोन्ही कान पकडले आणि तिला गॅसवर चढवली. अंदाजे पाच चमचे तेल टाकले. बाजूच्या स्टँडवरचा मिसळणाचा डब काढला, उघडायला गेलो तर, काही केल्या तो उघडेना. हटून बसला. उजव्या हाताच्या नखांनी डबा उघडायचा प्रयत्न करायला गेलो तर काय, नखं खाल्लेली असल्यामुळे काहीच उपयोग होईना. कढईतले तेल माझ्यावर तापले. जळून खाक होण्याची धमकी देत होते. माझे पेशन्स संपू लागल्यावर चिमटा हातात घेतला नि मिसळणाच्या डब्याच्या दोन्ही कानशिलात मारला, पण डबा निगरगट्ट, ऐकतच नव्हता. तोंड काही उघडेना, मग जोराचा फटका मारायला गेलो तर चिमटाच हातातून सटकला व तयारी केलेल्या ताटलीवर पडला. चिरलेली मिरची, कढीपत्ता, मटार, कोथिंबीर बिचारी घाबरून एकत्र झाली. मग मात्र मिसळणाच्या डब्याला चेहऱ्यासमोर धरले. रागाने डोळे वटारल्यावर कळलं की, बिचाऱ्याचं झाकणच तिरकं बसलं होतं. तिकडे कढईतल्या तेलानं रागानं धूर सोडायला सुरुवात केली. डब्याला पोटाशी कुशीत घेतले व वरून एक जोरात थाप दिली आणि त्यानं आनंदानं लगेचच तोंड उघडलं. कधीकधी किरकोळ समस्या बाका प्रसंग उभा करतात.

घडय़ाळाचा काटा माझा पाठलाग करत होता. डोकं शांत ठेवून कढईतलं ते तापलेलं तेल काढून टाकलं नि पुन्हा नवं तेल ओतून गॅसवर कढई चढवली. खमंग फोडणी करताना आठवणीने, भाजी हराभरा होण्यासाठी मुद्दाम फोडणीला हळद घातली नाही. त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता व थोडे मटार टाकल्यावर शेवटी बटाटय़ाच्या फोडी टाकल्या. एक ढवळा मारल्यावर घरभर खमंग वास सुटला. मनभर दीर्घ श्वास घेतला. दोन वाफा आणल्यावर कढई सुखरूप खाली उतरवली. लगेचच थोडं लिंबू पिळलं. चिमूटभर साखर टाकली व ‘हराभरा पोटॅटो व्हेजिटेबल’करिता भरपूर चिरलेली कोथिंबीर टाकून एखाद्या सराईतासारखा ढवळा मारला आणि ‘हराभरा’ तयार! काचेच्या बाऊमध्ये काढली व टेबलावर झाकून ठेवली.

बेल वाजल्यावर बायकोच असणार म्हणून दार उघडलं व परत सोप्यावर पेपर वाचत बसण्याचं नाटक केलं. माझा ‘हराभरा’ पदार्थ करायला विसरलो असं दाखवायचा प्रयत्न करत होतो. पण बायकोनं ओटय़ावरचा व डायनिंग टेबलवरचा पसारा, तेलाचे शेगडीवरचे डाग बघून लगेचच ओळखलं. ‘‘अहो!’’ म्हणून ओरडण्याच्या आत, मीच पटकन आत गेलो व आत्मविश्वासाने बाऊल पुढे करून तिला म्हटले, ‘‘जरा टेस्ट करून बघ! माझी ‘हरभरा पोटॅटो व्हेजिटेबल’ डिश कशी आहे?’’

बटाटय़ाची भाजी बघून तिनं मिश्कील चेहरा केला खरा पण भाजी चमच्यात घेऊन टेस्ट केली व म्हणाली, ‘‘अहो! जेनूू काम तेनू थाय.. तुम्ही या भाजीत मीठच घालायला विसरलात.’’

‘‘अरे!’’ म्हणत बाऊल तिच्या हातून ओढून घेतला. माझा पडलेला चेहरा बघून पुढे म्हणाली, ‘‘काही हरकत नाही. मीठ काय नंतर टाकता येते, तुम्ही प्रयत्न तर केलात. हेही नसे थोडके, पण आता कळलं ना काय काय करावं लागतं! यापुढे ठेवाल आता माझ्या स्वयंपाकाला नावं?’’ असं म्हणून तिनं भाजीवर मीठ भुरभुरायला सुरुवात केली खरी, पण ते मीठ थेट माझ्या जखमेवर पडत होतं.     ठ

घड(व)लेले पदार्थ

काय पुरुष मंडळींनो, तुम्हीही करता ना स्वयंपाकघरात विविध प्रयोग? आम्हाला सांगा तुम्ही केलेल्या स्वयंपाकघरातील वेगळ्या खाद्यप्रयोगाविषयी, ज्यामुळे तुमच्या कुटुंबीयांच्या,  मित्रमंडळींच्या जिव्हा तृप्त झाल्यात आणि तुम्हालाही मिळालंय, आगळं समाधान. खाद्य पदार्थामधील फ्युजन असो, परदेशी डिशला दिलेला भारतीय चवीचा तडका असो वा अगदीच तुमच्या कल्पनेतून तयार झालेला वेगळाच पदार्थ. काय आहे त्याची रेसिपी, तो करण्यामागचं प्रयोजन आणि ते केल्यानंतर मिळालेलं समाधान.  काही गंमतीजमती असतील तर त्याही आम्हाला लिहा. मजकूर कल्पित नसावा आणि सोबत खाद्यपदार्थ करत असतानाचा फोटो असल्यास उत्तम.  मजकूर २० डिसेंबपर्यंत आम्हाला मिळायला हवा. मजकुरावर  ‘घड (व)लेले पदार्थ’ लिहायला विसरू नका.

आमचा पत्ता –  लोकसत्ता, चतुरंग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.

ई-मेल – chaturang@expressindia.com  किंवा chaturangnew@gmail.com