माझ्याशी बोलून मामी आपलं दु:ख हलकं करते आहे हे जाणवून बरं वाटलं, पण एकदम हेही लक्षात आलं की आपल्या आजूबाजूला अशा एकटय़ा जगणाऱ्या, भरल्या घरात राहून एकाकी जिणं वाटय़ाला आलेल्या अनेक वयस्कर स्त्रिया आहेत. त्यांच्याशी फोनवर संभाषण करताना, प्रत्येक जण ‘‘खूप बरं वाटलं गं राणी! अशीच फोन करत जा गं’’ किंवा ‘‘करशील ना परत फोन? मी वाट बघतेय तुझ्या फोनची,’’ असे काहीसे म्हणून आपल्या भावना व्यक्त करायच्या. मग मी मनाशी ठरवलं.. हाच आपला छंद..

आज रविवार. सकाळचे नऊ  वाजलेत. झटकन भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडरकडे धावले. आता नऊ वाजता शोभामावशीला फोन करायचा आहे, कॅलेंडरने लगेच फर्मान सोडले. हा माझा खूप चांगला, भरवशाचा परममित्र आहे. कधी डॉक्टर मंडळींच्या अपॉइंटमेंट्सची आठवण करून देतो, कधी इस्त्रीवाल्याचे कपडे मोजून हिशेब तयार ठेवण्याची सूचना देतो, एक ना दोन, हजारों गोष्टींची नोंद अगदी न कुरकुरता ठेवतो!

तर शोभामावशीला फोन लावायला घेतला. नंबर तोंडपाठ होताच. लँडलाइन फोनवरून एखाद्या वादकाच्या सराईत बोटांसारखी माझी बोटे फिरली. दोन वेळा पलीकडून बेल वाजल्याचा आवाज आला नाही तोच, ‘‘अगं राणी (म्हणजे अस्मादिक बरं का.) वाटच बघत होते तुझ्या फोनची.’’ असं म्हणून मावशीने माझ्यावर प्रश्नांचा भडिमारच सुरू केला. ‘‘अगं ते ‘यमुना जळी खेळू खेळ..’ गाणं कुठल्या चित्रपटातलं आहे गं? कालपासून आठवतेय बघ. ती मीनाक्षी, तो

मा. विनायक, ते मॅजेस्टिक थिएटर सगळं आठवतंय बघ, पण मेलं चित्रपटाचं नावच नाही आठवत.’’

‘‘अगं मावशी, ब्रह्मचारी.’’ नशीब! मला वेळेवर नाव आठवलं.

‘‘अगदी बरोबर!’’ मावशीचा तो आनंदी चीत्कार मला फोनच्या रिसिव्हरमधून नुसता ऐकूच आला नाही तर आनंदाने खुललेला चेहरासुद्धा दिसू लागला आणि पुढची १५-२० मिनिटे आमच्या गप्पा खूप रंगल्या.

‘‘राणी, दर रविवारी ९ वाजता असाच फोन करत जा गं. खूप बरं वाटतं.’’ मावशीच्या आवाजात अजिजी होती.

‘‘हो मावशी, अगदी नक्की करीन हो फोन.’’ आणि मी फोन खाली ठेवला. एका अतीव समाधानानं.

‘चला आता दुपारी साडेचार वाजता शालिनीकाकूला आणि मग सात वाजता पार्वतीआंटीला फोन केले की माझा रविवारचा रतीब पूर्ण होणार!’ मी मनाशीच प्रसन्न होऊन म्हटले.

हा माझा नव्यानेच जोपासलेला छंद मला आवडू लागला की! अगदी आठवणीने मी माझ्या आई, मावशी, आत्याच्या पिढीमधल्या ज्या वयस्कर स्त्रिया आहेत, ज्यांच्याशी माझ्या लहानपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत, अशा सगळ्यांना आवर्जून फोन करते. गप्पा मारते, गुजगोष्टी करते.

माझ्या आगळ्यावेगळ्या छंदाची सुरुवात झाली दोन वर्षांपूर्वी. माझा विठूमामा एकाएकी वारला आणि रखमामामींना मोठाच धक्का बसला. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत, पण शेजार चांगला. आम्ही नातेवाईकही होतोच आधार द्यायला. विठूमामाच्या निधनानंतर सुट्टीवर आलेली त्यांची दोन्ही पोरे अमेरिकेला परत गेली. मामी इथेच राहिली. हळूहळू एकटं राहण्याची मामीला सवय झाली. मामीचा स्वभावही मुळात खूप गमत्या. तिच्या तरुणपणी आम्हा भाचरांबरोबर भेळपुरी खाणे, सिनेमाला जाणे, थट्टा मस्करी करणे हे अगदी सर्रास चालायचे. मामा गेल्यानंतर महिनाभराने मी या माझ्या रखमामामीला फोन केला, पण त्या दु:खाचा लवलेशही माझ्या बोलण्यात दिसू दिला नाही. ‘‘काय रखमाबाई एम.बी.बी.एस. (तिचा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ अतिशय आवडता चित्रपट!) काय चाललंय?’’ असं मी म्हटलं आणि पलीकडून मामी मनापासून हसली. आभाळ मोकळं झाल्यागत अर्धा तास मामा सोडून माझ्याशी सर्व विषयांवर भरभरून बोलली. माझाच गळा मधे मधे दाटून येत होता. माझ्याशी बोलून ती आपलं दु:ख हलकं करते आहे हे जाणवून मात्र फार बरं वाटलं.

आणि एकदम माझ्या लक्षात आलं की आपल्या आजूबाजूला अशा एकटय़ा जगणाऱ्या, भरल्या घरात राहूनसुद्धा एकाकी जिणं वाटय़ाला आलेल्या अनेक वयस्कर बायका आहेत. त्यांच्याशी फोनवर संभाषण करताना, प्रत्येक जण ‘‘खूप बरं वाटलं गं राणी! अशीच फोन करत जा गं.’’ किंवा ‘‘करशील ना परत फोन? मी वाट बघतेय तुझ्या फोनची.’’ असे काहीसे म्हणून आपल्या भावना व्यक्त करायच्या.

मग मी मनाशी ठरवलं. आता या सगळ्या मावश्या-काक्या-मामांची एक यादीच तयार करावी. सगळ्यांची नावे आठवून, त्यांच्यापुढे फोन नंबर लिहून पाठसुद्धा करून टाकले (अल्झायमरचा बागुलबुवा घाबरवतो ना)! कुणाला कधी फोन करायचा त्याचं वेळापत्रकच बनवलं आणि कॅलेंडरवर तशी नोंदही केली आणि मग सोमवारी सकाळी दहा वाजता बेबी आत्याला, दुपारी दोन वाजता मीराताईंना अशा रोजच्या रोज माझ्या या अपॉइंटमेंट्स मी आठवणीने ठेवू लागले. प्रत्येकीची स्वभाव वैशिष्टय़े, सवयी, आवडीनिवडी आवर्जून लक्षात ठेवून त्यानुसार माझ्या संभाषणाचा ओघ त्यांना प्रिय असलेल्या गोष्टींकडे वळवण्यात तर मी एकदम तरबेज झाले. कुणाला एखादा खळखळून हसवणारा विनोद सांगणे, कुणाला ‘पनीर पसंदाची’ रेसिपी सांगणे, काही जणींचे नवरे हयात आहेत पण कायम स्वत:च्याच विश्वात अखंड बुडालेले, अशा मावश्या-काक्यांची त्यांच्या ‘अहों’ संबंधी कधी गंभीरपणे तर कधी गमतीने चौकशी करणे, दूरचित्रवाणी मालिकांमधल्या ताई-माई-गौरी-स्वानंदी अशा पात्रांबद्दल तिखट मीठ लावून चर्चा करणे अशा हजारों विषयांवर मी त्यांच्याशी लीलया बडबड करते, सल्ला देते, उपदेशसुद्धा देते. काही जणींची बोलता बोलता स्थळा-काळांची खूपच गल्लत होते (डिमेन्शिया दुसरे काय!) मग त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांच्याबरोबर त्या म्हणतील तेथे ही त्यांची ‘राणी बेटी’ भूतकाळातसुद्धा फेरफटका मारून येते!

आता या लीला मावशीचीच गंमत बघा ना! महिन्याभरापूर्वी मी तिला फोन केला तेव्हा ताणमुक्त जीवन जगण्यासाठी रोज पंधरा मिनिटे ध्यान करायचा सल्ला तिला ‘बापूमहाराजांनी दिल्याचे मला तिने सांगितले. परत दहा दिवसांपूर्वी फोन केला तर म्हणते कशी, ‘‘अगं राणी, डोळे मिटले की सारखी भूकच लागते. मन एकाग्र होतच नाही. काय करू?’’

मी लगेच, ‘‘अगं मावशी, डोळे मिटून स्वस्थ बस आणि नक्षीदार चांदीच्या वाटीतले केशरयुक्त श्रीखंड डोळ्यासमोर आणून, त्याच्याकडे एकटक बघत बस. बघ दहा मिनिटे कशी मस्त ध्यानधारणा होईल.’’ असा पोक्त सल्ला दिला, पण हे ध्यान तिला काही जमलेच नाही. गेल्या खेपेस फोन केला तेव्हा तिने सांगून टाकले, ‘‘राणी, तुझा सल्ला फारच हावरट निघाला हो! डोळे मिटून श्रीखंड समोर आणले आणि तोंडाला पाणीच सुटले! त्यापेक्षा तू माझ्याशी अशीच बडबड करत राहा. अगदी दूर जातो माझा ताण आणि हेच माझे ध्यान! ’’

लीलामावशीचा तो अभिप्राय माझ्यासाठी आशीर्वादच होता. या बिचाऱ्या वयस्कांना हाताशी मोबाइल तर असतो पण चष्मा चढवून नंबर शोधून फोन लावणे नको आणि कुणा ‘चिंटू’ किंवा ‘पिंकी’सारख्या द्वाड नातवंडांच्या ‘‘लावून द्यारे जरा फोन’’ म्हणून नाकदुऱ्या काढणे नको. राणीचा फोन आला की नुसता कानाला लावला की काम भागते आणि थोडा वेळ मजेत जातो. मग माझ्यासारख्यांनी आठवणीने थोडा मोकळा वेळ बाजूला काढून त्यांच्याशी वार्तालाप केला, सुख-दु:खाच्या चार गोष्टी केल्या तर तेवढेच समाधान मिळते, त्यांना आणि मलासुद्धा!

मग काय, तुम्ही पण सुरू करणार ना माझ्यासारखा हा आगळावेगळा छंद?

chiitraanov@gmail.com