मैत्रिणीच्या मुलाने तालुक्याच्या गावात वडिलांच्या जुन्या दवाखान्याचे रूपांतर सहा बेड्सच्या छोटय़ा रुग्णालयामध्ये, क्ष-किरण, रक्त तपासणी वगैरेची सोय करून केले होते. त्याच्या वास्तुशांतीला मला आमंत्रण दिले. महिला मंडळात समुपदेशनाचे काम करणाऱ्या माझा त्यांना त्यांच्या गावात काही उपयोग होईल, का हाही थोडासा उद्देश होताच मैत्रिणीचा. आसपासची छोटी गावे, वाडय़ा वगैरेंनाही त्या नर्सिग होमचा उपयोग होणार होताच. या मुलाची पत्नीसुद्धा

बी.ए.एम्.एस्. होती व गावात महिला मंडळात तिचा सहभाग होता. मैत्रीण त्यांचा जम बसेपर्यंत स्वागतिकेचे काम करणार होती. त्या समारंभाच्या नंतर महिला मंडळाची सभा म्हणजे मेळावा तेथीलच छोटय़ा प्रांगणात ठेवला होता. त्यात प्रौढ स्त्रिया, तरुणी म्हणजे सुना-लेकींनाही आमंत्रण होते. भाषणे, अल्पोपहार ठेवला होता. आम्ही हजर झालो. माझी शहरातील महिलांची मार्गदर्शक म्हणून ओळख करून दिली. कार्यक्रमाला ४०-५० जणी हजर होत्या.

अर्थातच प्रथम इकडच्या तिकडच्या गप्पा, वैयक्तिक स्वच्छता, घरातील स्वच्छता व व्यवस्था यांची माहिती देऊन घेऊन अडचणींची चर्चा सुरू झाली. आणि साहजिकच काही तरुणीही बोलत्या झाल्या.

त्यातील एक गावातील म्हणजे ग्रामीण भागातील दारू व्यसनांवर पोटतिडकेने माहिती देत होती. म्हणाली, ‘‘ही फार मोठी अडचण आमच्या जीवनात त्रासदायक ठरते. भांडणे, शिवीगाळ आणि विरोधानंतर मारहाणही केली जाते, जबरदस्ती होते. प्रत्येकीचे अबोल दु:खच ते. यावर काही ठोस उपाय का केले जात नाही! ते व्हावेत म्हणजे थोडेफार जीवन सुसह्य़ होईल.’’ अर्थात सार्वजनिक सभेत आपण यावर उत्तर देणे कठीण होते. त्या संदर्भात आपली मते तेथील पुरुषांना आवडत नाहीत. स्त्रीची किंमत शून्य आणि चूल-मूल येथपर्यंतच असते किंवा तसे मानतात. स्त्रिया आमच्या गुलामच ही प्रवृत्ती आजही दिसते, आणि ती कधी संपणार याचं उत्तर कुणाकडेही नाही.

तिथेच आणखी एक अनुभव ऐकायला मिळाला. एक मध्यमवयीन स्त्रीचा नवरा यथेच्छ दारू पिऊन घरी आला. काहीतरी बोलाचाली झाली आणि त्याने तिला अमानुष मारहाण केली व घराबाहेर काढले तेही रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास. आता यावेळी ती कुठे जाणार! ती दाराशीच बसून राहिली. जवळच एक औषधाचे दुकान होते. त्याचा मालक दुकानाच्या मागच्या भागातच राहात होता. त्यांचे घर उघडे दिसले. तिने विनंती केली आणि  दुकानदारानेही तिला थंडीत कुडकुडताना पाहून एक जुनी चादर दिली. चादर घेऊन आपल्या घराच्या दारातच ती बसून राहिली आणि सकाळी दार उघडे दिसतात आत शिरली.

हा प्रकार नेहमीचाच असे म्हणून तिला कोणीतरी म्हणाले, ‘‘कशाला येथे रहाते? बाहेर काही कामधंदा कर, स्वतंत्र राहा, शांतपणे राहता येईल. मारहाण त्रास संपेल.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘काय करायचं, कुठे जायचं, कोण खरा आधार देईल आणि कसा देईल, कोणावर विश्वास ठेवायचा? जिवंत रहायचे असेल तर हेच सहन करणे भाग आहे. माहेरचे व सासरचे घरात घेणारच नाहीत. दारू उतरली की नवरा गपगार पडतो आणि सर्व विसरूनही जातो. हे असेच चालणार.’’ हा अनुभव ऐकून वाटले स्त्री पाळीव प्राणी आहे का? मारा-झोडा ते दारातच येणार परत. यामुळे तिचे आयुष्य कमी होत जाईल याची कुणाला पर्वा नाहीच. मती कुंठित झाली माझी. समुपदेशकही हरतो जणू येथे.

मात्र त्याच वेळी दुसरा एक अनुभव ऐकायला मिळाला तो त्याविरुद्धचा होता. एका सामान्य कुटुंबात तरुण मुलगा. बेताचे शिक्षण आणि किरकोळ नोकरीत होता. आर्थिक स्थिरता यावी म्हणून आई-वडिलांनी घरगुती डब्यांची खाणावळ सुरू केली. त्यात बरासा जम बसला. आता लग्नाचा मुलगा, त्याचे लग्न केल्यावर सुनेची मदत कामात होईल व अधिक पैसा मिळून जाईल. त्याच्या संमतीने लग्न केले. सुरुवातीला सुनेने घरात मदत केली, पण एकूणच ती आळशी मुलगी होती. कष्ट न करता पैसा हवा, चैन हवी, आयते सर्व हवे ही वृत्ती.

मग हळूहळू वाद, भांडण-तंटे, मतभेद होऊ लागले. मुलगा व सुनेला व्यवसाय पटत नसेल तर बाहेरचा रस्ता दाखवला व वेगळे केले. मुलाला हे आवडले नाही. तो म्हणतो, ‘‘कशाला माझे लग्न केलेत? मी काय करू हिचं?’’ शेवटी सासू-सासऱ्याने कामाला वेगळी बाई ठेवून व्यवसाय पुन्हा सुरू केला. यात कुणाचे नुकसान झाले? सासुरवास नव्हता, दारू नव्हती, मारहाण नव्हती, हौस-मौज थोडीफार होती. पण त्याचे महत्त्व त्या मुलीला वाटले नाही. स्वभाव दुसरं काय? काय हरकत होती थोडेफार घरातच राहून कामासाठी मदत करायला?

दोन परस्पर विरुद्ध घटना. स्वभाव भिन्नता. काही वेळा नीट समजून सांगण्याचा उपयोगही होतो. पण काही वेळा मात्र माझंच खरं हा सूर लावला जातो आणि संसाराचा विचका होऊ शकतो. दोन विरुद्ध अनुभव घेऊन मी परतले खरी, परंतु माझ्यातल्या समुपदेशकाचीही ती हार होती..