‘‘अवो वयनी, आभार काहून मानता? आमचं कामच हाय त्ये. अवो वयनी, तुमच्या सायबांची बदली करनं मला बी पटत न्हवतं, पण राजकारणात समदं आसंच असतं. विजयला म्हणावं चांगलं काम कर. सायबांचा मार्ग सोडू नको. त्यात जे समाधान हाय तसं कशातच नाय. बरं या. भेटू पुन्हा कवा तरी.’’ श्यामराव विमलताईंना सांगत होते..

संध्याकाळच्या बातम्या सुरू होत्या. संप, अपघात, बेताल वक्तव्यं वगैरे नेहमीचा रतीब सुरू झाला. एवढय़ात एक व्हिडीओ क्लिप अवतरली. एक अतरंगी कार्ट चक्क रेल्वे ट्रॅकवर उभं होतं. त्याला मागून धडधडत येणाऱ्या पॅसेंजरबरोबर ‘सेल्फी’ हवा होता. अरे बापरे! माझा श्वास थांबला. पॅसेंजर आली आणि ते कार्ट सेल्फीसकट स्वर्गात धडकले. मी श्वास सोडला तोवर आणखी एक ब्रेकिंग न्यूज अंगात आल्यागत घुमू लागली.
‘एका कर्तबगार आयुक्ताची बदली आणि जनता रस्त्यावर’ ही ती बातमी! मी सावरून बसले. आतापर्यंतच्या वाईट बातम्यांनी वैतागलेलं मन किंचित सुखावलं आणि आठवले वसंतराव! माझ्या वडिलांचे खास मित्र. अत्यंत प्रामाणिक व कर्तबगार अधिकारी! वसंतरावांना बढती मिळाली आणि मामलेदार म्हणून ते कोकणातल्या एका नितांत सुंदर तालुक्यात हजर झाले. (अलीकडेच या गावात माझं जाणं झालं. त्या सुंदर गावाचं पार वाटोळं झालंय) हा तालुका सर्वार्थाने चांगला होता, त्यामुळे वसंतराव जरा सुखावले, पण एक वर्ष झालं आणि एक दिवस नेहमीप्रमाणे बदलीची ‘गुड न्यूज’ आली. ‘‘अगं, माझी बदली होईल असं वाटतंय. बहुतेक पुढल्या आठवडय़ात ऑर्डर येईल.’’
‘‘पुन्हा बदली? अहो, काय चाललंय हे? इथे येऊन जेमतेम वर्ष झालंय. सतत मेले ते वाद आणि या बदल्या. कशाला एवढं ताणून धरता हो तुम्ही? थोडं त्यांच्या मनाप्रमाणे वागलात तर बिघडलं कुठं? विजयच्या शाळेचं नुकसान होतंय याचं तरी भान ठेवा.’’ विमलताई कधी नाही एवढय़ा संतापल्या होत्या. ‘‘विमल, अगं, मलापण तुझ्यासारखाच त्रास होतो, पण काय करू? या आमदारांची नको ती कामं करणं माझ्या तत्त्वात बसत नाही. मी शासनाचा नोकर आहे. त्यांचा नाही. बरं, मी पाहतो काय करायचं ते.’’ वसंतरावांनी विषय तिथेच थांबवला, पण होणारी बदली मात्र ते थांबवू शकले नाहीत. पुढल्याच आठवडय़ात ती आली आणि त्यांना दूर एका दुर्गम तालुक्यात घेऊन गेली. या तालुक्यात बदली होणं म्हणजे एक शिक्षाच होती. ‘प्रामाणिकपणाची शिक्षा’! वसंतरावांचा सारा सेवाकाल तसा वादग्रस्तच! नियमबाह्य़ कामांवरून स्थानिक नेत्यांशी उडणारे खटके आणि मग बदली हे नेहमीचंच झालं होतं. सततचा संघर्ष अन् त्यापायी होणारा मनस्ताप यामुळे प्रकृती खालावली आणि अखेर पाहुणा म्हणून राहायला आलेल्या मधुमेहाने घात केला. विजयचं शिक्षण पुरं होतंय तोवर वसंतरावांचं अकाली निधन झालं.
तत्त्व आणि आदर्शाचं मोल अनमोल खरं पण चलनी नोटांच्या दुनियेत त्याची किंमत शून्य! तत्त्वांच्या बाराखडीपायी व्यवहाराचं गणित अखेपर्यंत चुकत गेलं आणि वसंतरावांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब एकाकी पडलं. अखेर एका भल्या शेजाऱ्याच्या सल्ल्यानुसार विमलताईंनी शासनाचे दरवाजे ठोठावले. नोकरीसाठीचा अर्ज, प्रमाणपत्रांची पडताळणी वगैरे सारे सोपस्कार पार पाडले, पण लालफितीच्या कारभारात वजनदार ओळखीशिवाय काम होणं कठीणच होतं. बरेच दिवस झाले, पण काम काही पुढे सरकेना. एका दुपारी विमलताई आपल्याच विचारात मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये बसल्या होत्या आणि त्यांना श्यामराव येताना दिसले.
‘‘अरे देवा! हे इकडे कुठे आले? ह्यंच्यामुळेच वसंतरावांची बदली झाली होती. आता आणखी काय वाढून ठेवलंय देव जाणे!’’ ताईंच्या मनात हा विचार येतोय तोवर श्यामराव त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले. अंगात कडक इस्त्रीचे कपडे, उंची सेंटचा दरवळ आणि चेहऱ्यावर सत्तेची गुर्मी.
‘‘काय वयनी, आज इकडं कुठं? आमचे सायेब काय म्हणतात? बरे हायेत ना?’’ श्यामरावांनी ‘बरे’ शब्दावर जोर देत विचारलं.
‘‘अं..अं..ह्यंचं निधन झालं. मी इथे विजयच्या नोकरीसाठी आलेय.’’ विमलताई चाचरत म्हणाल्या.
‘‘अरे, सायेब गेल्याचं आमाला म्हाईतच नाय. सॉरी हां. लय वाईट झालं,’’ असं पुटपुटत श्यामराव गेले आणि ताई पार गळपटून गेल्या. घरी आल्यावर त्यांनी हे सारं काही विजयला सांगितलं.
‘‘आई, कशाला सांगितलंस त्यांना? तो माणूस कसा आहे हे तुला माहीत आहे ना? त्याने कामात काही खोडा घातला तर काय करायचं आपण?’’ पोरसवदा विजय रडकुंडीला आला.
त्यानंतर काही दिवस असेच गेले. पुन्हा एक भगभगीत रूक्ष दुपार, पब्लिकची आणि बाबू लोकांची ये-जा आणि अचानक श्यामरावांचा शिपाई त्यांच्यापाशी आला. ‘‘बाईसाहेब, आमच्या साहेबांनी तुमच्या कामाबाबत बोलणं केलंय. चला माझ्याबरोबर. मी तुम्हाला मोठय़ा साहेबांकडे घेऊन जातो.’’
श्यामरावांनी संबंधित शाखेच्या सचिवांकडे शब्द टाकला होता, त्यामुळे काहीही अडचण न येता सारे प्रशासकीय सोपस्कार चटाचटा पार पडले. जादू झाल्यागत सारी चक्रं भराभर फिरली. महिन्याभरात नेमणुकीचा आदेश निघाला आणि काम झाल्यामुळे आनंदित झालेल्या ताई पेढे घेऊन श्यामरावांकडे गेल्या.
‘‘साहेब, आभारी आहे आपली. तुमच्यामुळे माझ्या विजयचं काम झालं. मनापासून धन्यवाद,’’ ताईंच्या चेहऱ्यावर चांदणं फुललं होतं.
‘‘अवो वयनी, आभार काहून मानता? आमचं कामच हाय त्ये. अवो वयनी, तुमच्या सायबांची बदली करनं मला बी पटत न्हवतं, पण राजकारणात समदं आसंच असतं. विजयला म्हणावं चांगलं काम कर. सायबांचा मार्ग सोडू नको. त्यात जे समाधान हाय तसं कशातच नाय. बरं या. भेटू पुन्हा कवा तरी.’’
विमलताई गेल्या आणि श्यामरावांनी काहीशा समाधानाने खुर्चीवर पाठ टेकली. आज त्यांच्या मनावरचं ओझं उतरलं होतं. एवढय़ा वर्षांत वसंतरावांसारखा ताठ कण्याचा एखादाच अधिकारी त्यांना भेटला होता, त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा सल त्यांनाही टोचत होता.
ह्य गोष्टीला आता बरीच र्वष झालीत, पण तत्त्वनिष्ठांचा संघर्ष अजूनही तसाच सुरू आहे. किंबहुना आता अधिकच प्रखर झालाय. आता परिस्थिती एवढी गंभीर झालीय की प्रसंगी अधिकाऱ्यांच्या जिवावरही बेतू लागलंय. कौतुकाची बाब अशी की अशा परिस्थितीतही तेजाची ही इवलीशी ज्योत वादळवाऱ्याला तोंड देत समर्थपणे उभी आहे.