स्वच्छतागृहांविषयी असणारी अनास्था, औदासिन्यच सर्वत्र दिसून येते. नळ असतो पण पाणी नाही, काही ठिकाणी नळ गायब असतात. कमोड सिस्टीम असली तर फ्लश चालू नसतो. जिथे हात धुवायचे त्या ठिकाणी बहुतेक नळांना पाणीच नसते. नळ गळके असतात. काहीही सोय नसते.. सध्या स्वच्छतागृह हा प्रश्न ऐरणीवर असताना तरी कोणी याची दखल घेईल का?

‘स्वच्छता अभियान’- आजकाल सर्व ठिकाणी आपण याचा बोलबाला ऐकतो. मध्यंतरी ‘चला हवा येऊ द्या’च्या रंगमंचावर सगळे नावाजलेले कलावंत आले होते..

बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर, जयतीर्थ मेऊंडी आणि इतर.. या सर्वानी एकत्र येऊन गाण्याचे कार्यक्रम करून तो निधी स्वच्छता अभियानांतर्गत उपक्रमांसाठी देण्याचा संकल्प सोडला. असं आजूबाजूला काही घडलं की प्रकर्षांने जाणवतं की स्वच्छतेबाबतीत आपण खरेच जागरूक झालो आहोत का? तर ‘नाही’ हेच त्याचे उत्तर द्यावे लागेल.

आजकाल काही नाटय़गृह, काही चित्रपटगृह, एखाद दुसरा मॉल सोडला तर स्वच्छतागृहांची दुर्दशा आढळून येते. खरेदीच्या ठिकाणी, जागोजागी स्वच्छतागृहांचा अभाव दिसून येतो. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर येणाऱ्या गरजेबरोबरच स्वच्छता ही नैसर्गिक गरज आहे. लांबच्या, जवळच्या कुठल्या प्रवासामध्ये स्वच्छतागृहांचा अभाव, स्त्रियांची होणारी कुचंबणा, त्यामुळे होणारे रोग हे आपल्या अंगवळणी पडले आहे का? याकडे कोणाचेच लक्ष नाही का? मध्यंतरी मी एका नामवंत स्टेडियमला कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. अनेक दर्जेदार कार्यक्रम तिथे होत असून तिथल्या स्वच्छतागृहांची अवस्था अजिबात चांगली नव्हती. थोडय़ाफार फरकाने सर्व थिएटर्स, सार्वजनिक कार्यक्रम करणारे हॉल, लग्न हॉल इथली स्वच्छतागृहे फारच क्वचित चांगली असतात.

स्वच्छतागृहांविषयी असणारी अनास्था, औदासिन्यच सर्वत्र दिसून येते. पुण्यातल्या नामवंत नाटय़गृहात जिथे नेहमीच नाटकांचा राबता असतो त्या ठिकाणी पण हेच निदर्शनास आले. त्या दिवशी तर मी नाटकातल्या मान्यवर कलाकारांना प्रेक्षकांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहात पाहिले. कलाकारांची कुचंबणा किती वेळा व्यक्त होऊनसुद्धा फरक पडलेला नाही. नळ असतो पण पाणी नाही, काही ठिकाणी नळ गायब असतात. कमोड सिस्टीम असली तर फ्लश चालू नसतो आणि काही ठिकाणी कमोड नसतोच. जिथे हात धुवायचे त्या ठिकाणी बहुतेक नळांना पाणीच नसते. नळ गळके असतात. काहीही सोय नसते..

गावाला जाताना, रेल्वे काय, एस.टी. स्टॅण्ड, लक्झरी गाडय़ा थांबणाऱ्या थांबे सर्व ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होत असते. पुणे-मुंबई हायवेवर थांबणाऱ्या लोकांसाठी असणारे काही फूडमॉलवर स्वच्छतागृह चांगली असतात. बाकी ठिकाणी अंधारच. पर्याय नसला की आपला जीव, श्वास कोंडून जावे लागतेच.

प्रवास करताना, खरेदी करताना जागोजागी रेस्टरूम ही संकल्पना या योजनेपासून आपण कैक योजने अजूनच दूरच आहोत. अगदी मूलभूत सोयी आपल्याकडे नाहीत. खेद वाटतो. आज आपण २१व्या शतकात, आधुनिक युगात, तंत्रज्ञान विकसित अशा युगात राहताना पुणे-मुंबईसारख्या शहरात अशा सोयींपासून वंचित राहावे लागते तर खेडोपाडी काय स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी. आपण सर्व आधुनिक प्रवर्तकाचे प्रतिनिधी आहोत पण याबाबत मागासलेपण का? मेरा भारत महान आपण म्हणतो पण..

अर्थात परदेशात गेल्यावर तिथल्या सोयीसुविधा पाहिल्यावर ही तुलना प्रकर्षांने जाणवते. तिथली श्रीमंती आणि मर्यादित लोकसंख्या याचा फरक जाणवणारच, परंतु मानसिकताही स्वच्छतेकडेच वळणारी असते. मध्यंतरी मी अमेरिकेला मुलाकडे गेले होते. शिकागोमध्ये हिंडताना.. बाहेर फिरताना कोणत्याही मॉलमध्ये कोणतेही स्टोअर, फूड मॉल-कुठेही हिंडताना रेस्टरुमची सोय असते विनामूल्य.. अत्यंत स्वच्छ टॉयलेट्स, हात धुण्यासाठी स्वच्छ बेसिनस्, लिक्विड सोप, पेपर नॅपकिन्स, हॅण्ड ड्रायर कशाची कमतरता नाही. मुलांचे डायपर बदलायला वेगळी सुविधा, अपंग लोकांसाठी वेगळी सोय, सगळेच आश्चर्यचकित करणारे होते. लोकसंख्या कमी असली तरी (आपल्यापेक्षा) पाण्याचा वापर कमी करणारे लोक असले तरी स्वच्छतेचा अभाव नाही.

न्यूयॉर्क शहरात आम्ही एम अ‍ॅण्ड एम्सच्या दुकानात गेलो होतो. दोन मजली दुकान, गर्दी खूप. साहजिकच त्यामानाने स्वच्छतागृह थोडी कमी पण तिथेसुद्धा लोकांनी शांतपणे लाइन लावली होती. स्वच्छता गर्दी असली तरी तशीच. लोकं संयमाने उभे होते.

न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, नायगारा सर्व ठिकाणी हिंडताना हाच अनुभव आला. स्वच्छतेचे निकष पाळून लोकांकडून  त्या सुविधांचा वापर होत असतो. शिकागोमध्ये पण आम्ही जेवढय़ा मंदिरात गेलो तेथे पण अतिशय स्वच्छ रेस्टरूम.

अलीकडेच आपल्या इथल्या एका प्रसिद्ध देवळात गेले होते. त्या वेळी प्रवेशद्वारापाशीच डावीकडे स्वच्छतागृह आहे पण त्याची स्वच्छता मन अप्रसन्न करणारी. देवीच्या देवळात जाताना प्रसन्न मनाने जायला हवे, पण.. बहुतेक देवालयाजवळ हाच अनुभव येतो एक तर पाण्याचा अभाव आणि स्वच्छतेची वानवा. लोकांची, भक्तांची गर्दी या ठिकाणी होतेच पण स्वच्छतागृह स्वच्छ नको का? भक्त जातात, दर्शन घेतात अडचणींमुळे तसेच निमूट राहतात. वरची उदाहरणे वानगीदाखल आहेत पण आपल्याकडे असे का नसते? मूलभूत सोयीसुविधा का आपल्याला मिळत नाहीत. स्वच्छतेचे धडे अगदी लहानपणापासून मिळायला पाहिजे आणि त्यासाठी जनजागरण झाले पाहिजे.

मूलभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. चांगली स्वच्छतागृहे असायलाच पाहिजे. आध्यात्मिक बैठक असणाऱ्या, चांगल्या आदर्शाची, संस्काराची मूल्ये जपणाऱ्या हुशार बुद्धिजीवी भारतामध्ये, त्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक शहरात ही वानवा का? जे चांगले ते वेचित जावे या उक्तीप्रमाणे पेहेरावाच्या आधुनिकपणाबरोबर हे स्वच्छतेचे मूळ आपण रुजविले पाहिजे. सगळ्यांनी संघटित होऊन या मूल्याचा पाठपुरावा केला पाहिजे असे वाटते.

आपल्याला खूप गोष्टींचा पाठपुरावा करायचा आहे. मूलभूत पायासुविधा या आपल्याला मिळायला पाहिजे. एक एक गोष्ट करत मेरा भारत महान होणार आहे वॉर्डातील नगरसेवक, राजकीय नेते, सामाजिक संस्था यांनी त्याची दखल घेऊन सुधारणा केली पाहिजे. अजून खूप प्रश्न आहेत पण सध्या स्वच्छतागृह हा प्रश्न ऐरणीवर असताना कोणी याची दखल घेईल का?

मीनल श्रीखंडे chaturang@expressindia.com