जिवंत वातावरणातून मी दिवसरात्र तोंडाला कुलूप लावून जगणाऱ्यांच्या घुम्या वस्तीत राहायला आलो होतो. कोणाचा आवाज नाही, भांडण नाही, तंटा नाही, सर्व कसे नि:शब्द. त्यामुळे निर्जीव वाटू लागले होते; पण एक दिवस मात्र एखाद्याची एखादी इच्छा पूर्ण व्हावी तसे माझ्या बाबतीत घडून आले. आमच्या सोसायटीच्या लगत असणाऱ्या चाळवजा वस्तीत आज जाहीर भांडणाला मस्त सुरुवात झाली..

दोन महिने झाले आम्हाला या सोसायटीत राहायला येऊन. हळूहळू नवीन ठिकाणी बस्तान बसू लागले आहे. इस्त्रीवाला, किराणावाला, दूधवाला, पेपरवाला, सर्व नवीन सगेसोयरे यांच्याशी नाते घट्ट होऊ लागले आहे. तरीही कसली तरी कमतरता जाणवत होती.

मी ठरवून लिफ्टने माझ्या चौथ्या मजल्यावरील सदनिकेत जात नाही. (आता माझ्या घराची सदनिका झाली आहे आणि मी भाडेकरू न राहता आता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे माननीय सभासद झालो आहे.) चार मजले चढत जातो. कोणाच्या तरी सदनिकेचे दार उघडे दिसेल आणि मी जाता जाता आत जो कोणी असेल त्याला मनापासून साद देईन. माझी ओळख करून देईन, त्याची करून घेईन; पण छे! कोणाचे दार सताड सोडा, साधे किलकिलेदेखील उघडे दिसत नाही. असलीच तर बाहेरच्या सेफ्टी डोअरची इवलीशी गज असलेली खिडकी उघडी असते, त्यापाठीमागे एखादा खडूस म्हातारा, हातातील माळ ओढत जास्तीत जास्त आध्यात्मिक चेहरा करून त्या गजाच्या खिडकीतून दिसणाऱ्या बाहेरच्या जगाकडे तुच्छ नजरेने पाहत असतो. कधी कधी लिफ्टने जातो त्या वेळी लिफ्टमध्ये एखादी आमच्याच सोसायटीत राहणारी व्यक्ती असतेही, पण आपल्याकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटेल अशी आशा करावी तर आपण अदृश अवस्थेत तर नाही ना अशी आपल्याला भीती वाटू लागते, कारण आपले अस्तित्व त्यांच्या खिजगणतीतही नसते. अंगावरच्या पर्फ्यूमची अशी उधळण करणारा माणूस इतका माणूसघाणा कसा? असा आपल्याला प्रश्न पडतो.

इथेही घराघरांतून भांडय़ाला भांडे लागत असणारच, त्यामुळे बंद दाराआड वादविवाद, धुसफुस, कटकटी होतच असाव्यात; पण ते सर्व बंद दाराआड चार भिंतींच्या आत. आम्ही इथे येण्यापूर्वी राहत होतो त्या चाळीत प्रत्येक घरात होणारे भांडण हे त्या कुटुंबाचे किंवा त्या कुटुंबापुरते न राहता सर्व चाळीचे होऊन जात असे. काही वेळा तर त्या भांडणाला सार्वजनिक रूपसुद्धा प्राप्त व्हायचे. अगदी रस्त्यावरून येणारे-जाणारेदेखील त्यात सहज भाग घेऊ  शकायचे. बरे, भांडणांना कारणे तरी किती अनंत! मुलाचे भांडण, सार्वजनिक नळावरचे पाणी भरणे, जिन्यावरून येता-जाताना टोमणे मारणे, दुपारचा मुलांचा गॅलरीतील धुडगूस, आपल्या बिऱ्हाडासमोरची गॅलरी पाण्याने धुताना शेजारच्या गॅलरीत पाणी जाईल याची कपटी धोरणाने तजवीज करणे, सार्वजनिक संडास आतून बंद आहे याची पुरेपूर माहिती असूनदेखील त्याची कडी जोरात वाजवून निघून जाणे, तरुणींची तरुणांनी काढलेली छेड, सार्वजनिक गणेश उत्सवाच्या दरम्यान जे काही भांडणतंटे होत त्याला तर तोडच नाही. हं! चाळीत होणारी साधी कुजबुजदेखील सर्व चाळीला सहज ऐकू जाईल अशी ठेवण्याची काळजी कुजबुज करणारे घेत. एखाद्या बाईने दुसऱ्याला एखादी गोष्ट सांगताना, तुम्हाला म्हणून सांगते, इतर कोणाला सांगू नका, याचाच दुसरा अर्थ याआधी ती गोष्ट बऱ्याच जणांना यापूर्वीच ठाऊकझालेली आहे. त्यामुळे त्या चाळीतील सर्व रहिवाशांच्यात मध्ये मध्ये उत्पन्न होणारी आपापसातील भांडणे ही एक नित्याची बाब झाली होती, त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही मनोरंजनाच्या साधनांची चाळकऱ्यांना आवश्यकताच वाटली नव्हती. सहज कान दिला तर कुठे तरी चाललेले भांडण अगदी घरबसल्या सहज आरामखुर्चीत बसल्या-बसल्या ऐकू येत असे. ‘याचि देही याचि डोळा’ पाहायची इच्छा असेल तर तशीही सोय उपलब्ध होती. काही वेळा तर आपले भांडण ऐकायला यावे अशी भांडण करणाऱ्या दोघांची मनापासून इच्छा असायची, कारण भांडण दोघांत राहण्याला काही अर्थच नाही असे भांडणाऱ्यांना मनापासून वाटायचे. अजून काही व्यक्ती यात सामील झाल्या तर निवाडा करायला उपयोग होईल असा त्यात त्यांचा हेतू असायचा आणि त्यात नंतर सामील होणाऱ्यांना वेळ घालवायला एक सामाजिक काम आपणहून चालत आल्याचे मानसिक समाधान मिळायचे. मग पुढचे काही दिवस भांडणाऱ्या दोघांतील एकाच्या बाजूचे आणि विरुद्ध अशी भाडेकरूंमध्ये फळी किंवा ग्रुप तयार व्हायचे  मग मात्र त्या दोन्ही ग्रुपमध्ये आपसात भलताच उमाळा आणि आपुलकी उफाळून यायची. पूर्वी एकमेकांच्या विरोधात असलेले आता एकमेकांचे घट्ट मित्र झालेले बघायला मिळायचे; पण पुढे अशी काही घटना घडून यायची की दोन्ही कुटुंबांत दिलजमाईदेखील सहज होऊन जात असे. त्यामुळे त्या चाळीत राहणारे एखादेच डोक्याला कायम आठय़ा पडून राहणारे कुटुंब सोडता बाकीची सर्व कुटुंबे एकदम सणसणीत आणि तेजतर्रार. कुठच्याही प्रसंगाला कधीही तोंड द्यायला सदा तय्यार. असो. थोडक्यात, अशा एकंदर ‘जिवंत’ वातावरणातून मी दिवसरात्र तोंडाला कुलूप लावून जगणाऱ्यांच्या घुम्या वस्तीत राहायला आलो होतो. कोणाचा आवाज नाही, भांडण नाही, तंटा नाही, सर्व कसे नि:शब्द. त्यामुळे निर्जीव वाटू लागले होते.

पण एक दिवस मात्र एखाद्याची एखादी इच्छा पूर्ण व्हावी तसे माझ्या बाबतीत घडून आले. आमच्या सोसायटीच्या लगत असणाऱ्या चाळवजा वस्तीत जाहीर भांडणाला मस्त सुरुवात झाली. खिडकीत उभा राहून किती तरी दिवसांनी मी भांडणाचा जिवंत प्रयोग पाहणार होतो. सुरुवात झाली तेव्हा दोन्ही बाजूला स्त्रियाच होत्या. एका बाजूला एक वयस्क स्त्री होती आणि विरुद्ध पार्टीत एक प्रौढ स्त्री होती. भांडणाचे कारण होते प्रौढ स्त्रीने मासे साफ केलेले पाणी दुसरीने लावलेल्या प्राजक्ताच्या बुंध्यात ओतले होते. एकीचे म्हणणे माशांचे पाणी झाडांना पोषक असते म्हणून घातले, तर वयस्क बाईचे म्हणणे प्राजक्तासारख्या झाडाला मासे धुतलेले पाणी घातले तर फुलांचा सुगंध नाहीसा होईल. त्यावरून प्रौढ बाई तिला ‘खेडवळ’, ‘अनाडी’ म्हणाली. झाले, भांडणाला तोंड फुटले. जसे भांडण पुढे सरकत होते तसतसे दोन्ही बाजूंनी असे काही बिनतोड मुद्दे पुढे येत होते, की वाटावे हिंदी सिनेमातील एखादा न्यायालयाचा सीन अगदी रंगात आला आहे. मग दोन्ही बाजूंनी साक्षी-पुरावे आणि साक्षीदार पुढे आणले जाऊ  लागले. दोन्ही बाजूंच्या बायकांनी उपस्थित नसलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांचे स्वभावदोष जाहीर केले आणि तुम्ही पिढीजात कसे भांडखोर आणि लबाड आहात याचा जाहीर पाढा एकमेकांविरुद्ध वाचला. तुमच्या तोंडाला लागण्यात काही अर्थ नाही, असे म्हणून एक बाई घरात जाई, पण आपली माघार तुम्हाला घाबरून घेतलेली नाही हे पटवून देण्यासाठी परत भांडणाला येऊन ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करे.

अगदी मला हवे तसे आणि आवडते तसे घडत होते. काल माझ्याच समोरच्या फ्लॅट ओनर्समध्ये कचऱ्याचा डबा फ्लॅटबाहेर ठेवण्यावरून खटका उडाला, तेव्हा मी नेमका बाहेर जाण्यासाठी, दरवाजा उघडून बाहेर उभा होतो. मी म्हटलं, चला, आता तरी या दोन फ्लॅट ओनर्समध्ये भांडणाच्या निमित्ताने का होईना काही तरी संवाद घडून येईल, पण छे, कसले काय! ‘‘जो कम्प्लेंट करना है वो सोसायटी के ऑफिस में करने का,’’ असे म्हणून डबा बाहेर ठेवणाऱ्याने आपल्या फ्लॅटचा दरवाजा धाडकन लावून घेतला. दुसऱ्याने ‘मॅनर्सलेस’ म्हणून आपल्या फ्लॅटचा दरवाजा धडकन लावला. मला वाटलं, मी समोर आहे तेव्हा तो माझी साक्ष काढेल, मग मी अजून कोणाला तरी त्यात सामील करून हा कचऱ्याचा प्रश्न धसास लावीन; पण कसले काय. क्षणभरातच परत सर्व शांत शांत.

आज मला किती तरी दिवसांनी असे दोन शेजाऱ्यांतील ‘लाइव्ह’ भांडण बघण्याचा योग आला होता. दोन्हीकडून छान आणि तर्कशुद्ध अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या.. त्यांना आजच काय तो सोक्षमोक्ष लावायचा होता. रोजरोजची कटकट नको होती. मी मनातल्या मनात म्हटले, असे नका करू बायांनो, तुम्हाला जी कटकट वाटते ती तुमच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. तेव्हा असले काही विचार मनात आणू नका. त्यांच्या भांडणाच्या ओघात मला हेदेखील कळले होते, त्या प्रौढ बाईच्या मुलीचे लग्न थोडय़ा दिवसांवर आले आहे आणि मला याचीदेखील अनुभवाने खात्री होती की, तिच्या झोपडीवजा घरात येणारी पाहुणेमंडळींची ऊठबस ती वयस्क बाई आपल्या झोपडीत शेजारधर्म म्हणून आनंदाने करणार आहे. नवीन लग्न झालेले जोडपे न विसरता त्या वयस्क बाईच्या पाया पडायला आवर्जून येणार होते. पुढचे भांडण होईपर्यंत, रोज उठून आपल्याला एकमेकांचे तोंड बघायचे आहे आणि अडचणीला एकमेकांच्या उपयोगी पडायचे आहे. यावर पक्का विश्वास ठेवून त्या वस्तीतील सर्वाचेच तेथले सहजीवन असेच पुढे चालू राहणार होते.

मला मात्र बरेच दिवसांनी, असे जिवंतपणाचे लक्षण असणारी वस्ती आपल्यापासून हाकेच्या अंतरावर आहे हे पाहून मनस्वी बरे वाटत होते.

मोहन गद्रे gadrekaka@gmail.com