प्रत्येक पुरुषाच्या हृदयात मृदुता, ममता लपलेली असते. एखाद्या मुलाच्या हृदयातली ही स्त्रीजरा जास्त जाणवू लागली, तर मात्र जग त्याला हिणवू लागतं. ललितचा तो स्वभावपाहून त्याला त्याच्या आवडीचं करिअर करायला लावलं आणि एक आयुष्य सावरलं गेलं..

पुरुषाचं मन तसं कठीण आणि थांगपत्ता लागू न देणारं मानलं जातं, पण प्रत्येक जण असा टणक खडक, कोरडा पाषाण असतो का? अजिबात नाही! प्रत्येक पुरुषाच्या हृदयात मृदुता, ममता लपलेली असते. वात्सल्याचा आविष्कारही होत असतो त्यातून. एखाद्या मुलाच्या हृदयातली ही ‘स्त्री’ जरा जास्त जाणवू लागली तर मात्र जग त्याला हिणवू लागतं. ते पोरगं जी अंगभूत स्त्रणता ‘व्यक्त’ करतं, ती उसनी नसते. अंगभूत असते. पण तिचं जिथं तिथं हसं होतं. तो मुलीसारखा मुलगा गोंधळून जातो.

ललितचं (नाव बदललं आहे) तसंच झालं! टिंगल करणारे नातलग तो टाळू लागला. त्याच्या वाडीत तो जवळजवळ वाळीतच पडला. मैदानी खेळात त्याचा जीव रमेना. व्यायामशाळेकडे पाऊल वळेना. भीतीचं एक दडपण आलं. तो जास्तच लाजाळू,   भिडस्त झाला, पण त्याला हिणवण्यासाठी कुणी ना कुणी शोधत यायचं. शिवराळ बोलायचं. नृत्याच्या क्लासला तो जात होता. तेही थांबलं. नर्तकाला ‘नाच्या’ म्हणणारं मित्रमंडळ तर त्याला तो पुरुष असताना तृतीयपंथी समजू लागलं.. स्वत:ला ‘स्वीकारणं’ ललितलाच जड जात होतं. मग बाकीचा समाज त्याला कसा समजून घेणार आणि कसा स्वीकारणार?

ललित मधूनच आक्रमकही व्हायचा. बाई भडकावी तसा. मग अचानक ललित ‘व्हायोलंट’ होतो असं कानी आलं. किती सहन करणार ना? मर्यादा असते. कोचिंग क्लासमधल्या टिंगलबाज पोराला त्याने खाली पाडलं, त्याचा गळा आवळला. ललितला ‘आवरायला’ दोघे-तिघे लागले असंही समजलं. सतत डिवचल्यामुळे त्याचं मन घायाळ झालं होतं. चिघळलं होतं.. ललित माझ्या पुतण्याचा वर्गमित्र. एकदा आमच्याकडे आला, तेव्हा त्याने खीर इतकी अप्रतिम बनवली की बायकाही चकित झाल्या. माझ्या ते लक्षात आलं.

ललित बारावी उत्तीर्ण होताच मी पुतण्याबरोबर निरोप देऊन त्याला बोलावलं. ‘हॉस्पिटलिटी’चा अभ्यासक्रम त्याला धड माहीतही नव्हता. व्यक्तिमत्त्वात काही दोष असेल, तो टाळता येतच नसेल, तरी करिअर तर करायलाच हवं! स्वत:च्या पायांवर उभं राहायलाच हवं. आई-वडील किती दिवस पुरणार? हे मी त्याला वेगळ्या भाषेत सांगितलं.

हॉटेल मॅनेजमेंटच्या करिअरसाठी ललितने वडिलांना सांगून पैशांची जमवाजमव केली. माझा सल्ला त्याला मानवला आणि आता तर वाटतं, तो खरोखरच योग्य होता. इंग्रजीतून बोलण्यासाठी ललितला थोडं वेगळं प्रशिक्षण द्यावं लागलं. नंतर तो फ्रेंचही शिकला. व्यवहारापुरतं बोलू लागला. आवडीचं ‘किचन’ त्याने व्यावसायिक पातळीवर स्वीकारलं. त्याच्या गळ्यात पडलं नाही! त्याच्या काळजातली ती ‘स्त्री’ नाना देशी-विदेशी पदार्थ तयार करताना सुखावली. समुपदेशन, पुनर्वसन हे सामान्य माणसांच्या दृष्टीने मोठे शब्द झाले. पण काही वेळा या माणसांची लपवलेली दु:खं मोठी असतात. सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी दुर्दशा होते.

ललितला ही करिअरची वाट मिळाली नसती तर कदाचित तो निराश होऊन ‘आत्मघातकी’ बनला असता, पण आता तसं होणार नाही. मोठं जग त्याला लाभणार आहे. तिथं त्याची ‘छेड’ कुणी काढणार नाही. उलट, त्याच्या पाककौशल्याचं, सजावटीचं, मांडणीचं, रंगरांगोळीचं कौतुक होईल.

पंचतारांकित संस्कृतीत तो रुळेल आणि माझी फादर फिगर आठवून त्याच्या डोळ्यात पाणीही येईल कदाचित.. पुरुषाच्या हृदयातली ‘बाई’ प्रकट होऊ लागली, तर ‘कठीण कठीण’ न मानता सोपा, वेगळा मार्गही शोधता येतो. तेच आम्ही केलं!

-माधव गवाणकर