एकदा स्वीकारलेलं मातृत्व-पितृत्व अखंडच राहतं, शेवटच्या श्वासापर्यंत..! आपण प्रत्येक जण असेच असतो.. मायेनं बांधलेले! नश्वर देहाचं अस्तित्व नष्ट झालं तरीही माया आटत नाही.. संपत नाही.. नष्ट होत नाही. अगणित आठवणींतून, फोटोंमधून, जीवनात पुढे घडणाऱ्या प्रसंगांमधून, ध्वनिचित्रफितींतून ही माया आपल्यासोबतच राहणारी असते!

मोबाइल फोन वाजला.. कुणास ठाऊक का, पण बेलचा आवाज आर्तच भासला. व्हॉटस्अ‍ॅपवर संदेशपण आले, ‘‘नाना (वडील) जरा क्रिटिकल आहेत, आता तुम्ही याच!’’
मग ठरवलं, आता एक क्षणभरही थांबायचं नाही इथं! परदेशातून ताबडतोब निघालो.. तरी विमानाची तिकिटे मिळून परत यायला सारा मिळून दीड दिवस गेला. जीव टांगणीला लागलेला! धडधडत्या हृदयानं थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. सगळे चिंताक्रांत चेहरे!
‘‘आलात, या. आयसीसीयूमध्ये, क्रिटिकलच आहेत अजून.. आशा नाहीये..!’’
खास परवानगी घेऊन काही मिनिटांसाठी आत गेलो.. आल्याची खबर दिली. हाक मारली, त्यांना कळली की माहीत नाही.. सारंच अज्ञात..!
आई, बहीण, भाऊ, नातेवाईक सर्वाच्या सान्निध्यात बसलो. तब्येतीविषयी कुजबुज..
‘‘बरं झालं आलात. कदाचित तुमचीच वाट पाहत असतील.. लेक व जावई आलेले समजले असेल त्यांना!’’ थकून डोकं टेकून डोळे मिटून घेतले. आता कसं सावरायचं यातून? इतक्या वर्षांची वडिलांची माया, वात्सल्य, प्रेम अनुभवलं! त्यांचा आधार, आस्थापूर्वक त्यांनी केलेली नित्य चौकशी, तो पाठिंबा, निवारा, छाया, शाबासकी, कौतुक, प्रशंसा, उपदेश, वैचारिक सल्ला.. इतकं निरपेक्ष कोण भेटणार आता? स्वत:बद्दल नसेल इतका अभिमान आपल्या मुलामुलींबद्दल बाळगणारं छत्र आता हरपणार, कायमचं! पोरकं करून जाणारं अनाथपण! सर्वाच्या चेहऱ्यावर तेच भाव उमटले होते. बाबा आमच्यापासून दूर निघाले होते.. परत कधीही न येण्यासाठी!
‘‘आलीस..?’’ हा खोल, अस्पष्ट दूरवरून येणारा आवाज कुणाचा? वडिलांचा? का मला भास झाला? मनाचे खेळ सारे.. तरीसुद्धा त्या आभासी आवाजाची ओळख पटली.. नेहमी ते असंच विचारतात भेटल्यावर.. त्या संवादाची सवय झालीय.. बोलावं का? द्यावं उत्तर..?
‘‘काय हो, आणखी महिनाभराने येणार होते ना परदेशातून.. एवढी काय घाई आहे..?’’ वातावरणात हलकेपणा आणण्याचा प्रयत्न केला.. आवाज पोचले त्यांच्यापर्यंत..? हो नक्की पोचले. सप्तचक्र भेदून, पंचकोशांच्या आवरणातून, स्पंदने, नाद, ध्वनी यांच्या माध्यमातून.. तो आवाज पोहोचला असावा..
अपेक्षित उत्तर आलं, ‘‘वरून ऑर्डर आलीय.. जायला हवं.. थांबणं अशक्य..’’
‘‘असं म्हणू नका..’’
‘‘वेळ नाही आता.. तुझा आवाज ऐकला, बरं वाटलं.. दमलीस ना..?’’
हे पण नेहमीचंच विचारणं! दमलीस का, असं विचारलं त्यांनी की शिणवटा पळून जायचा. आज भकास वाटलं.. पोकळी.. पण व्हायब्रेशन्स पोचली असतील अस्तित्वाची! नुकत्याच शोध लागलेल्या नव्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची उगाचच आठवण झाली.. ध्वनींचा अर्थ!
त्या संमोहन अवस्थेतून बाहेर आले.. वेगळ्याच जगात, विश्वात, मनोवाचिक स्थितीत गेले होते. बोलणारी व ऐकणारी मीच होते.. अतक्र्य! तरीही निरोपाची, निर्वाणीची भाषा, ते संवाद, संवेदनपटलावर घुमत होते.. काही तरी, याबाबत बोलायची ती वेळ नव्हती म्हणून मूकच राहिले..
थोडय़ाच वेळात ‘ती’ बातमी येऊन थडकली. सर्व स्तब्ध झालं जणू! प्रत्येक जण शोकाकुल अवस्थेत! येणारा प्रत्येक जण आम्हाला पाहिल्यावर हेच म्हणत होता, ‘‘तुमच्यासाठीच थांबले होते बहुतेक.’’ पुढच्या दिवसांत अनेक जण भेटायला आलेले. त्यांचे विद्यार्थी, सभा-संघटनांचे सदस्य, प्रत्येक जण कृतज्ञता व्यक्त करत होता त्यांच्याबद्दल, ‘त्यांची विद्वत्ता, गं्रथलिखाण, सचोटी, शिस्त, वक्तशीरपणा, ध्येयनिष्ठा, तत्त्वनिष्ठा.. अशी जुनी माणसं भेटणार नाहीत आता..! सामाजिक भान, मनुष्यस्वभावाचं निरीक्षण, कर्तव्यपरायणता इत्यादी इत्यादी! हिमालयासारखी धवल उत्तुंगता आणि विशालता!’
आलेला प्रत्येक जण, आमचं ऐकून अनेक प्रकारच्या घटना सांगत होता, माझ्या अमक्याच्या/ अमक्याची.. अमकी.. अमका.. असंच झालं! ‘आई थांबली होती वाट पाहत.. मुलगा दाराशी पोचला अन् आई गेली.’! ‘नातीची दहावीची परीक्षा होती.. लेक आली आईला भेटायला. आई म्हणाली, अगं, मुलीची परीक्षा आहे ना, जा तू! नातीची परीक्षा संपली आणि आजीनं देह ठेवला.’ ‘मुलाचे वृद्ध वडील! मुलगा भेटायला आला, मुलाला पाहिल्यावर म्हणाले, जातो रे.. मुलानं मागं वळून पाहिलं वडील हयात नाहीत..’! अशी अनेक उदाहरणे, विश्वास न बसणारी, तर्कशास्त्रात न आढळणारी, मनाला-बुद्धीला न पटणारी! अगदी कावळा बसायला अन् फांदी मोडायला गाठ पडली या उक्तीला खोटं पाडणारी सापेक्षतावादी सिद्धांतासारखी, सेंद्रिय साखळी जोडणारी, असंख्य उदाहरणे..!
जेट लॅग असल्यामुळे शिणलेल्या देहाला झोप लागली. किंचित आवाजातली कुजबुज ऐकू आली, ‘ही अशी अवेळी काय झोपलीय..?’ परकेपणा आवाजात! दु:खमग्न अवस्थेतील आईच्या कानावर ते शब्द पडले बहुधा! ‘‘बरं का, तिला उठवू नका.. दमलीय ती.. झोपू दे जरा निवांत..’’ दचकून जागी झाले. आईचंपण तेच आतडं, तीच माया, तेच वात्सल्य? स्वत:ला सारून अपत्याची दखल घेणारं!
हेच वात्सल्य, हाच मायेचा ओलावा बालपण, तरुणपण आणि प्रौढावस्थेपर्यंत पाहत आले होते. काय ठेवलं असतं या आईवडिलांच्या अंत:करणात? हृदयाच्या गाभ्यातील ममत्व, मनातून ओसंडून वाहणारं! नसानसांत भिनलेलं वात्सल्य, उत्कटता! आयुष्य त्यांच्यासाठी वाहून घेणारे! मुलांचं सदा भलंच चिंतणारे! मग ते आईचं काळीज असो वा पित्याचं र्सवकष ममत्व असो. अपत्य जन्माला आलं की, आईवडिलांचापण जन्म होतो म्हणतात ते अगदी खरं! एकदा स्वीकारलेलं मातृत्वपितृत्व अखंडच राहतं, शेवटच्या श्वासापर्यंत..! आपण प्रत्येक जण असेच असतो.. मायेनं बांधलेले!
नश्वर देहाचं अस्तित्व नष्ट झालं तरीही आतडय़ाची माया आटत नाही.. संपत नाही.. नष्ट होत नाही. अगणित आठवणींतून, फोटोंमधून, जीवनात पुढे घडणाऱ्या प्रसंगांमधून, ध्वनिचित्रफितींतून ही माया आपल्यासोबतच राहणारी असते! व्यावहारिक जीवन पुढं चालूच राहणार असतं! त्यातून कुणाचीच सुटका नसते हे समजून पुढं जावंच लागतं..!
परदेशातून मुलाचा/ मुलीचा फोन सतत पाठपुरावा करत होता. शब्दांतून काळजी, ‘‘कसे आहात, तब्येत सांभाळा, काळजी करू नका, आम्हाला तुमची काळजी वाटते आहे.. परत लौकर या, वाट पाहतोय.. इत्यादी. भौगोलिक अंतर व दिवसरात्रीचं उलटं वेळापत्रक सांभाळून विचारणा होत होती.
विचारांना आणखी चालना मिळाली.. मुलांनाही त्यांच्या पालकांविषयी तेवढीच तळमळ , ओढ असते.. ही जातकुळी वेगळी असते! पण उत्कटता असते. आईवडील आपलं संवेदनशील जीवन घडवतात. तेच पुढच्या पिढींत संक्रमित होत जातं, जाणार असतं.. कारण ती माया असते. आईवडील आणि मुलांना चिरंतन बांधून ठेवणारी माया!