पुण्याला स्मार्टसिटी करण्यात एकच अडथळा होता वाहतुकीचा. पण कुत्र्याचे शेपूट आणि पुण्याची वाहतूक सरळ करणे म्हणजे अवघड काम. नवे नियम करणे शक्य नव्हते म्हणून खूप विचारांती जशी आपली वाहतूक तसेच लिखित नियम तयार करणे हा तोडगा सापडला. पण.. पुण्याच्या वाहतुकीवरचा हा नर्मविनोदी लेख..

देशामध्ये स्मार्टसिटीचे वारे जोरदार वाहात आहेत. कॉलेजमध्ये जशी मुलांची पहिली यादी लागते, तशी या प्रकल्पाकरिता निवडल्या गेलेल्या वीस शहरांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. ‘पुणे तिथे काय उणे’ हे निवड समितीला माहीत असल्यामुळे पहिल्या यादीमध्येच पुण्याचे नाव झळकले. निरनिराळ्या थरामधल्या, वयोगटातील, क्षेत्रातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत यावर ठिकठिकाणी चर्चासत्रे सुरू झाली. वाहतूक, कचरा, मनोरंजन, वृक्ष लागवड, शिक्षणाच्या सोयी, खेळ, हवा-पाणी-अन्न प्रदूषण हे विषय हाताळावे यावर सर्वाचेच एकमत झाले. प्रत्येक विषय पूर्णत्वाकडे नेण्याकरता समित्या स्थापन करण्यात आल्या, त्या त्या विषयांमधल्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. कामाचे आराखडे तयार करण्यात आले. काम म्हटले की बजेट आले, पैसे देणे-घेणे आले, पैसे आले की बरेच काही आले, त्यामुळे सगळेच खूष होते..
पुण्यातले रोजचे अपघात व रस्त्यावरची जीवघेणी परिस्थिती बघून वाहतूक या प्रश्नाला ‘अअअ’ हे नामांकन देण्यात आले. वाहतूक या विषयाकरता खास समिती स्थापन करण्यात आली. शासकीय वाहतूक यंत्रणा, सामाजिक संस्था, यांनी वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्याकरता अथक प्रयत्न सुरू केले. शाळेमधल्या मुलांना त्यांचा अभ्यास बाजूला ठेवून चौकाचौकात नियमांचे फलक घेऊन दिवस-दिवस उभे करण्यात आले, शिक्षकांना ‘जिथे कोणी नाही तिथे शिक्षक’ या उक्तीप्रमाणे वाहतुकीच्या कामावर पाठवण्यात आले. वयस्कर स्त्री-पुरुष दुखऱ्या कमरेला- गुडघ्याला पट्टे बांधून व हातात शिट्टय़ा घेऊन सिग्नल नसलेल्या ठिकाणी डय़ुटीकरता उभे ठाकले. चौकाचौकात पथनाटय़ं सुरू झाली. पण पुण्याची वाहतूक बदलायला तयार नाही, सगळे ‘जैसे थे’. सगळेच प्रयत्न असफल होत आहेत हे लक्षात आल्यावर समितीने आपला अहवाल वरिष्ठांकडे सादर केला की पुण्याची वाहतूक सुधारणार नाही. हे काम कुत्र्याची शेपूट सरळ करण्यासारखे आहे. वाहतूक हा विषय स्मार्ट सिटीच्या नियमावलीमधून वगळता येतो का ते बघावे.
वरिष्ठांनी अर्थातच हे अमान्य केले. ‘दिवस रात्र काम करा आणि कुत्र्याची शेपूट सरळ करा’ असा सरळ निर्णय वरिष्ठांनी दिला. पैशांची काळजी करू नका, असे पण बजावले. म्हणता म्हणता पहिल्या प्राथमिक ऑडिटची वेळ जवळ आली. तेल अव्हीव्हहून श्रीयुत सॅम अँट ‘वाहतूक’च्या ऑडिटला येणार ही पहिली बातमी आली. जगामधल्या अनेक शहरांना स्मार्ट सिटी बनवण्यात व वाहतूक या विषयात सॅम अँट यांचे मोठे योगदान आहे, अशीही बातमी आली. तातडीची बैठक बोलावण्यात आली. कुत्र्याची शेपूट सरळ करणे हा मूळ विषय सध्या बाजूला ठेवून सॅम अँटला कसे पवटता येईल यावर लक्ष केंद्रित करावे, असे सर्वानुमते ठरले. एक मिनी समिती तयार करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी या समितीने तेल अव्हीव्हला जावे व सॅम अँट यांना सदिच्छा भेट द्यावी, त्यांना भेटवस्तू द्यावी असे ठरले. बायका-मुलांना नेण्यासाठीही बजेट मंजूर झाले.
मंडळी तेल अव्हीव्हला पोहोचली. सॅम अँटबरोबर चर्चासत्र झाले. सॅमनी एकाच मुद्दय़ावर भर दिला की वाहतुकीचे सगळे नियम तुम्ही ठरवा पण वाहतूक त्या नियमाप्रमाणे दिसली पाहिजे. असे असेल तर पास, नाहीतर नापास. काम झालं. तेल अव्हीव्हचं पर्यटन करून सगळे परतले. आल्या आल्या तातडीची बैठक बोलावण्यात आली. सॅमनी सांगितलेल्या मुद्दय़ावर भरपूर चर्चा झाली, पण लिखित नियम व रस्त्यावरची वाहतूक तंतोतंत सारखे कसे होणार यावर तोडगा सापडेना. अखेर खूप विचारांती जशी आपली वाहतूक आहे तसेच लिखित नियम तयार करणे हा सापडलेला तोडगा सगळ्यांनी एकमताने मंजूर केला. लोक कामाला लागले व दोन दिवसात नवीन नियमावली तयार करण्यात आली. दोन दिवसांनी सॅमचे पुण्यात विमानतळावर आगमन झाले. आल्या आल्या त्यांचा वाहतुकीशी संबंध येऊ नये म्हणून त्यांना विमानतळाच्या समोरच असलेल्या मोठय़ा हॉटेलमध्ये उतरवण्यात आले. दुपारच्या बैठकीची जय्यत तयारी झालीच होती.
दुपारची वेळ, स्थळ- मीटिंग हॉल-
उपस्थित : सॅम अँट, वाहतूक समिती सदस्य, वरिष्ठ नेते व अधिकारी.
सॅम यांचे स्वागत करण्यात आले. सॅम यांचे स्मार्ट सिटीच्या संदर्भामधील जगातील मोठय़ा शहरांकरताचे योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला.
सॅम थ्रू दुभाषी : धन्यवाद, तुमच्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. पुण्याला वाहतूक संदर्भात जगामध्ये अव्वल दर्जा मिळवण्याकरता मी सर्वतोपरी साहाय्य करीन असे मी वचन देतो. टाळ्यांचा कडकडाट झाला.
संयोजक : आता वाहतूक समितीचे सचिव आपल्याला वाहतुकीचे लिखित नियम वाचून दाखवतील.
सेक्रेटरी : आमच्याकडे लिखित नियम व रस्त्यावरची वाहतूक हे भावाभावासारखे गळ्यात गळे घालून वाटचाल करत असतात.
सॅम थ्रू दुभाषी : वा, खूपच छान.
सेक्रेटरी : आता आपण नियम बघू.. शाळांमध्ये ए फॉर अ‍ॅपल असे सगळीकडेच शिकवतात. तसं वाहतुकीचे महत्त्व मुलांना शालेय जीवनापासूनच समजायला पाहिजे म्हणून आम्ही शाळांमध्ये
व – वाहतुकीचा असे शिकवतो. स्मार्टसिटीमुळे तर, ‘प – पुण्याचा आणि व – वाहतुकीचा’ हेच आमचे ब्रीदवाक्य आहे. सगळे वाहतुकीचे नियम आम्ही बेमालूमपणे वाहतूक या शब्दामध्येच समाविष्ट केलेले आहेत. एका शब्दामध्ये सगळे नियम बसवणारे पुणे हे जगामधले एकमेव शहर असावे!
सेक्रेटरी : वाहतूक या शब्दामध्ये चार अक्षरे आहेत. वा, ह, तू आणि क.
आता प्रत्येक अक्षरांमधले नियम आपण बघू-
वा : वाटेल तशी गाडी चालवा- सरळ चालवा, तिरपी चालवा, उलटय़ा साइडने चालवा, वन- वे तून चालवा, फूटपाथवर चालवा, मोबाइलवर बोलताना चालवा. वाटेल तेव्हा हॉर्न वाजवा- सिग्नलजवळ गाडय़ा उभ्या असतील तर मागून हॉर्न वाजवा, माणसे रस्ता ओलांडत असतील तरी हॉर्न वाजवा, काही कारण नसेल तरी हॉर्न वाजवा. दुचाकीला ट्रकचा हॉर्न लावा. वाटले तर रात्रीच्या वेळी गावामध्ये गाडी चालवताना हेडलाइट डीप वर ठेवा, नाही वाटले तर अपर वर ठेवा.
ह : हवी तिथे रस्त्यावर गाडी थांबवा, हवी तिथे गाडी पार्क करा, पार्किंग-नो पार्किंग बोर्ड बघा किंवा बघू नका. हवं असेल तर कोणाच्या गेटसमोर पार्क करा. समांतर पार्क करा, काटकोनात पार्क करा, तिरपी पार्क करा- बाजूची गाडी काढणाऱ्याला त्रास होणार नाही ना याचा विचार करा किंवा करू नका. हवे असेल तर वळताना साइड इंडिकेटर द्या नाहीतर देऊ नका.
तू : तुम्ही रस्त्यावर काय स्पीडने गाडी चालवायची हे तुम्हीच ठरवा. तुम्ही सिग्नल केव्हा पाळायचे हे तुम्हीच ठरवा. तुमच्या शाळेत रिक्षांमध्ये पाच मुलं बसवायची का दहा-बारा बसवायची हे तुम्हीच ठरवा. तुमच्या सिक्स सिटर रिक्षात सहा लोक बसवायचे का बारा बसवायचे हे तुम्हीच ठरवा, टु व्हीलरवर दोघांनी बसायचं का तिघांनी- चौघांनी बसायचं हे तुम्हीच ठरवा. तुम्हीच ठरवायचे की आपल्या टेम्पोमध्ये त्याच्या क्षमतेएवढंच सामान भरायचं का आपल्या मनात येईल तेवढं भरायचं.
क : कशाचीही तमा बाळगू नका- गाडी तुमची आहे, रस्ते तुमचे आहेत, पुणे तुमचे आहे, देश तुमचा आहे.
सॅम थ्रू दुभाषी : चालणाऱ्या लोकांकरिता पण काही नियम आहेत का?
सेक्रेटरी : हो, हो. नक्कीच आहेत. चालणाऱ्या लोकांकरता ‘वॉक सेफ’ आणि रस्त्यावर असताना ‘सतत देवाचा धावा करत राहा’ एवढाच सोपा नियम आहे. सेक्रेटरींचे भाषण संपले. टाळ्यांचा कडकडाट झाला. आता सॅम काय सांगतात याकडे सगळ्यांचे डोळे लागले. सॅम उठून माईक स्टँडकडे गेले. दुभाषीपण हातात माईक घेऊन त्यांच्याजवळ गेले.
सॅम दुभाषींना म्हणाले : तुम्ही बसा. मी बोलतो.
सगळेच क्षणभर हादरले. सगळ्यांनी एकमेकांना चिमटे काढून जागे व शुद्धीवर असल्याची खात्री करून घेतली.
सॅम : माझे मराठी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटणे साहजिक आहे. असो या विषयावर आपण नंतर येऊ. आधी बिझनेस. कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही असे लक्षात आल्यावर बहुतेक जण आशा सोडतात. पण तुम्ही प्रयत्न सुरू ठेवले. वा, ह, तू, क, शब्दांची नवीन नियमावली तयार केली. तुमच्या नियमावलीला दाद देण्याकरता जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत.
सॅमनी टाळ्यांना सुरवात केली व सगळ्यांनी माना खाली घालून टाळ्या वाजवल्या.
सॅम : माझे असे मत आहे की तुम्ही केलेली नियमावलीच आपण स्मार्ट सिटी करता वापरावी. तुमचे काय मत आहे?
सगळ्यांनी टाळ्या वाजवून संमती दिली. शुद्धीवर असल्याची खात्री करण्याकरिता पुन: चिमटे काढण्याचा प्रयोग झाला.
सॅम : तुम्ही तयार केलेल्या नियमावलीवरून इथली वाहतूक किती जीवघेणी आहे याची मला पुरेपूर कल्पना आली. तुम्ही तयार केलेल्या नियमावलीमध्येच मी किरकोळ बदल सुचवले तर तुम्हाला चालेल का?
सगळे सदस्य (कोरसमध्ये) : सर, चालेल चालेल.
सॅम : तुमचा नियम वा – वाटेल तशी गाडी चालवा.. वाटेल तेव्हा हॉर्न.. वाटेल.. या सगळ्याच्या आधी फक्त आर. टी .ओ. जोडायचे. म्हणजे आर. टी. ओ. ठरवेल तशी गाडी चालवायची.. ह : हवी तिथे रस्त्यावर गाडी थांबवा, हवे असेल तर वळताना साइड इंडिकेटर.. या सगळ्याच्या आधी आर. टी. ओ. जोडायचे. म्हणजे आर. टी. ओ. ठरवेल तिथे गाडी थांबवा..
तू : तुम्ही काय स्पीडने गाडी चालवायची हे तुम्हीच ठरवा. तुम्ही सिग्नल केव्हा पाळायचे.. या सगळ्याच्या आधी आर. टी. ओ. जोडायचे. म्हणजे आर. टी. ओ. ठरवेल तो स्पीड ठेवायचा. ते सिग्नल.. क : कशाचीही तमा बाळगू नका- यामधले नका काढून टाका म्हणजे सगळ्या गोष्टींची तमा बाळगा. गाडी तुमची आहे, रस्ते तुमचे आहेत, पुणे तुमचे आहे, देश तुमचा आहे. यामध्ये फक्त तुमचे ऐवजी आपले हा शब्द वापरायचा आहे – गाडी तुमची आहे पण रस्ते आपले आहेत, पुणे आपले आहे. देश आपला आहे. बस, एवढाच बदल करायचा. थोडक्यात काय तर गाडी, तुम्ही आणि
वा- ह- तू- क हे नियम आर. टी. ओ. नी तयार केलेले – यांची सांगड घालायची.
सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त झाले. सॅम असा काही बंपर टाकेल याची कुणालाच कल्पना नव्हती.
सॅम : यालाच तुम्ही कुत्र्याचे शेपूट म्हणता, बरोबर!
सगळे (एकसुरात) : हो, हो.
सॅम : कुत्र्याचे शेपूट सरळ करता येत नाही पण माणसाला सरळ करता येतं. भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांना सरळ करता येतं, नियम तोडणाऱ्यांना सरळ करता येतं. वाकडय़ाला सरळ करण्याचा साम-दाम-दंड-भेद हा तुमच्याच पूर्वजांनी जगाला दिला होता. तुम्ही साम आणि दाम या दोनच पायऱ्यांवर खूश असता कारण त्यात दिखावा असतो व पैसा असतो. जगातील सगळ्या शहरांमध्ये नियम मोडणाऱ्यांना अतिशय कडक शिक्षा असते, मोठा दंड असतो. तुमच्याकडे रोज खून किती होतात?
प्रश्न बंपर होता. सगळेच बुचकळ्यात पडले.
एक सदस्य : सर, रोज होत नाहीत महिन्याला तीन-चार होत असतील.
सॅम : कारण काय, तर याला फाशीची शिक्षा असते. निष्पाप माणसांचे अपघातात हात-पाय तोडणे, त्यांना वर पाठवणे हे खून केल्यासारखेच नाही का? तुम्ही सापाला कधी सरळ चालताना पाहिले आहे का?
सगळे : कधीच नाही. तो वेडावाकडा चालतो.
सॅम : तो कायम वेडावाकडा चालतो हे बरोबर, पण कधीच नाही हे चूक. वारुळात शिरताना तो सरळच चालतो. ही टीप कुत्र्याच्या शेपटाकरता किंवा माणसाकरता वापरता येते का ते बघा, ‘शोधा म्हणजे सापडेल’. आणि हो, तुमच्या आदरातिथ्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.
सॅमना इथल्या सगळ्याच गोपनीय गोष्टी कशा कळल्या असे भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर उमटले.
सॅम : .. आणि शेवटची गोष्ट – येनकेनप्रकारेण पुणे शहर स्मार्ट सिटी म्हणून सर्टिफिकेट पण मिळवेल, पण मी सांगितल्याप्रमाणे बदल झाले नाहीत तर वाहतूक स्मार्ट झाली असे म्हणता येणार नाही आणि तुम्हाला पण आतून ते पटणार नाही. घरातून बाहेर गेलेला माणूस आज वर जातो, का हॉस्पिटलला जातो, का घरी परत येतो, ही सध्याची परिस्थिती आहे. जेव्हा घरातून बाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती छातीठोकपणे सांगू शकेल की मी संध्याकाळी घरी येईन, त्यालाच स्मार्ट वा – ह – तू – क म्हणतात.
सॅम : आता माझ्या मराठीबद्दल थोडे स्पष्टीकरण – आमचे पूर्वज पुण्याचे. दोन पिढय़ा आधी आम्ही परदेशात स्थायिक झालो. माझे मूळ आडनाव – सामंत. तिकडच्या लोकांना हा उच्चार करता येत नव्हता. त्यांनी स्पेलिंगचे दोन तुकडे केले. सॅम आणि अँट. आणि आता सॅम अँट हेच आमचे आडनाव झाले आहे. जेव्हा माझे इकडे यायचे ठरले तेव्हा मी पुण्याची वर्तमानपत्रे नेटवर वाचायला सुरुवात केली. त्यामुळे मला इथल्या वाहतुकीची पुरेपूर कल्पना आली. असो, मी इथल्या भेटीबद्दलची फी किंवा जाण्यायेण्याचा खर्च घेणार नाही आहे. मला मिळणारी रक्कम इथल्याच होतकरू अपघातग्रस्त व्यक्तीच्या उपचाराकरता द्यावी असे मी येतानाच अेम्बसीला सांगितले आहे.
जयहिंद!
सगळ्यानाच गहिवरून आले. ‘बदललेले पुणे बघायला आम्ही तुम्हाला लवकरच बोलवू आणि तुम्हाला यायचे आहे’, असा सामूहिक आवाज हॉलमध्ये घुमला. सॅमचा निरोप घेऊन सभा संपली.
सगळ्यांच्या मनात मात्र तोच विचार रेंगाळत राहिला की आपण सगळ्यांनीच मनावर घेतले तर सॅमच्या कल्पनेतली स्मार्ट वाहतूक पुण्यात नक्कीच अस्तित्वात येईल आणि मी दुपारी घरी येईन, मी संध्याकाळी घरी येईन, मी रात्री घरी येईन, असे ठामपणे घरच्यांना लवकरच ठामपणे सांगू शकू.

– सुधीर करंदीकर
srkarandikar@gmail.com