ती मुलं इतकी स्मार्ट होती, त्यांनी माझा मोबाइल नंबर मागून घेतला. संध्याकाळी रोज बरोबर पाच वाजता, माझा मोबाइल वाजतो. त्यांनी मला मोबाइल वाजला तरी उचलायचा नाही हेदेखील बजावून ठेवलं आहे. थोडक्यात तुम्ही गुपचूप खाली गार्डनमध्ये यायचं आणि अम्पायिरग करायचं, हे त्यांनी पक्कं करून टाकलं होतं.
खरं म्हणजे मला क्रिकेट मधलं ओ की ठो कळत नाही, तरीही मी माझी क्रिकेट टीम तयार केली. आणि आम्ही रोज न चुकता क्रिकेट खेळतो. हे सर्व ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. पण ही गोष्ट अगदी सत्य आहे.
मी त्यादिवशी नेहमीप्रमाणे आमच्या सोसायटीत संध्याकाळची फेरी मारायला बाहेर पडलो होतो. बऱ्याच फेऱ्या मारल्यानंतर थोडी विश्रांती घ्यावी या उद्देशाने बाजूच्या एका बाकडय़ावर टेकलो. काही थोराड मुलं, मोठय़ा लोकांची पर्वा न करता आणि त्यांनी दिलेले शिव्याशाप जास्त मनावर न घेता, सोसायटीच्या मधोमध क्रिकेटच खेळत होती. त्यामुळे याआधी आमच्या सोसायटीतील सभासदांमध्ये आपापसात भांडणंही झालेली होती. ज्यांना मोठी मुलं होती ते सभासद ज्यांच्या घरात मोठी मुलं नाहीत त्यांच्या रोषाचे धनी ठरत होते. काही वेळा फिरत असताना मलाही एखाद् दुसऱ्या वेळेला चेंडूचा फटका बसला होता. मी त्या वेळी संतापलोही होतो. त्या मोठय़ा मुलांना चांगलं फैलावर घ्यावं, असं मानातून वाटतही होतं, पण माझ्या मुलीचा मोठा मुलगा आमच्याकडे आल्यावर, या मुलांतच गुपचूप सामील होऊन खेळत असे, हे लक्षात आल्यावर केवळ त्यांच्यावर दातओठ खाण्याच्या पुढे माझी हिंमत त्या त्या वेळी झालेली नव्हती.
मी बाकावर बसलो होतो, त्याच्या पुढे काही अंतरावर, अगदी दुसरी-तिसरीत जाणारी असावीत अशा लहान वयाच्या मुलांचाही क्रिकेट खेळ चालला होता. मी मात्र वेगळ्याच विचारात गर्क होतो, कालच माझे पॅथॅलॉजीतून रिपोर्ट आले होते, ते काही तितकेसे चांगल्या प्रकृतीची लक्षणं दाखवणारे नव्हते. ह्याच्यावर आमच्या डॉक्टरांनी उत्तम उपाय म्हणून औषधाबरोबरच कशात तरी मन रमवा असा सल्ला दिला होता. या वयात अशी दुखणी येणं म्हणजे फार गंभीर स्थिती नाही. त्यावर औषधोपाचार आहेतच पण मन गुंतवून ठेवणंही अगत्याचं आहे, या गोष्टीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. मलाही ती गोष्ट मनोमन पटली होती. मी अशा विचारात गर्क असताना एक अगदी चार-पाच वर्षांचा, अस्ताव्यस्त कपडे झालेला, केस विस्कटलेला, घामाघूम झालेला लहान मुलगा माझ्या समोर, त्याची इवलीशी तरीही त्याला न पेलणारी बॅट खांद्यावर घेऊन उभा होता. माझे लक्ष त्याच्याकडे वेधत तो मला म्हणाला, ‘‘आजोबा मी आऊट नाहीये ना? विकी म्हणतो मी आऊट आहे.’’ मग विकीसकट सगळी बच्चे कंपनी माझ्या पुढय़ात येऊन उभी ठाकली. चार चार मुलांच्या त्या दोन टीम होत्या हे लक्षात यायला मला वेळ लागला नाही. दोन्ही टीम आपल्या मतावर ठाम होत्या. त्यांच्यातलं भांडण थांबणं शक्य नाही याचा मला आता अंदाज आला होता. माझी मोठी पंचाईत झाली. एक तर माझं त्यांच्या खेळाकडे पूर्ण लक्ष नव्हतं. डोळे त्यांच्या खेळाकडे होते, पण मनात विचार मात्र दुसरेच चालू होते. त्यामुळे मला काही योग्य निर्णय देता येईना. मग मी एक शक्कल काढली, मी म्हटलं, ‘‘अरे, मी काही तुमचा खेळ नीट लक्ष देऊन पाहिलेला नाही. मी कसं सांगणार.’’ मग त्या मुलांनीच मला एक कल्पना सुचवली. ‘‘आम्ही परत, टीम पाडतो, तुम्ही अम्पायर व्हा.’’ मी म्हटलं, ‘‘अरे मला त्या खेळातलं काही कळत नाही. मला त्यातले नियमही माहीत नाहीत. मी अम्पायर कसं होणार रे बाळांनो!’’
ती छोटी मुलं म्हणाली, ‘‘अहो आजोबा अगदी सोप्पं आहे.’’ मग त्यांनी मला त्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेले नियम नीट समजावून सांगितलं. एक टप्पा आऊट म्हणजे काय, स्टंप दोनच असल्यामुळे ते तीन आहेत असं समजून आऊट कसं द्यायचं, नो बोल कुठला, बॉऊन्ड्री कधी, सिक्सर कुठला, उभ्या मारुती गाडीच्या पुढे बॉल गेला तर आऊट, ज्या मुलाची बॅट असते त्याला दोनदा आऊट झाल्यावर आऊट द्यायचं हा त्यातल्या त्यात खास नियम, असं बरेच नियम मला सांगून झाल्यावर, माझ्या अंपायरच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झालं. मग मी त्यांना म्हटलं, ‘‘आज आपण नुसतेच खेळू. आजचा डाव भुताचा.’’..आणि माझ्या अम्पायरशिपखाली, पुढचा खेळ पार पडला. ती मुलं इतकी स्मार्ट होती, त्यांनी माझा मोबाइल नंबर मागून घेतला.
आता रोज संध्याकाळी बरोबर पाच वाजता, माझा मोबाइल वाजतो. त्यांनी मला मोबाइल वाजला तरी उचलायचा नाही हेदेखील बजावून ठेवलं आहे. थोडक्यात तुम्ही गुपचूप खाली गार्डनमध्ये यायचं आणि अम्पायिरग करायची, हे त्यांनी पक्कं करून टाकलं होतं. त्या दिवसापासून आमच्या टीममध्ये आम्ही अनंत नवीन नियम केले, जुने रद्द केले, काही नवीन भिडू आम्हाला जॉइन झाले, काही सोडून गेले. पण मी मात्र कायम अम्पायर, म्हणून ग्राऊंडवर हजर. कधी कधी माझ्यावर चिक्कीखाऊ म्हणूनही आरोप झाले. पण मी रागावून दुसऱ्या दिवशी गेलो नाही की, सर्व टीम आमच्या दरवाजात हजर. ‘सॉरी’ म्हणून समजूत काढायला. मग मीपण जरा ताणून धरत असे आणि त्यांची गम्मत बघत असे. खरं म्हणजे या संधीची मी वाटच पाहत असायचो. आणि त्यांच्याबरोबर खाली जायला तयारीला लागायचो. त्या दिवसापासून आमची क्रिकेट टीम एकदम फॉर्मात आहे. माझे सगळे रिपोर्ट मी त्या दिवसापासून पार विसरून गेलो आहे. माझ्या या मुलांबरोबरच्या खेळण्याला काही लोक मला त्याबद्दल नावंही ठेवतात, सोसायटीतील मुलांना डोक्यावर चढवून ठेवतो, म्हणतात. मला अशा लोकाशी काही देणंघेणं नाही. मोठय़ा लोकांबरोबर बसून प्रत्येकाच्या घरच्या कटकटी, ज्याच्याशी काहीही देणंघेणं नाही अशा राजकारणावर फालतू गप्पा ऐकत बसण्यापेक्षा लहान मुलांमध्ये रोज सामील होऊन त्यांच्या निव्र्याज आणि निरागस स्वभावाने रोजचा दिवस आनंदात घालवणं माझ्यासाठी वरदान आहे, हे त्यांना सांगून काय उपयोग!
काल डॉक्टरांनी माझे परत काढलेले पॅथॅलॉजी रिपोर्ट पाहिले आणि आश्चर्याने म्हणाले, ‘एकंदरीत मी लिहून दिलेल्या औषधांचा चांगलाच परिणाम दिसून येतोय.’’ मी म्हटले, ‘‘अर्थातच त्यात मी कधी चालढकल केली नाही.’’ पण माझ्या सुधारणाऱ्या प्रकृतीचं गुपित मी त्यांना सांगितल्यावर मात्र ते चकित झाले.
मला गमतीने म्हणाले, ‘‘अम्पायर आहात तोपर्यंत ठीक आहे. त्यांच्या बरोबर धावा काढण्याच्या भानगडीत मात्र पडू नका. खेळाडू आऊट झाला तरी चालेल, अम्पायर आऊट होता कामा नये.’’ इतकं बोलणं होतं तोच माझा मोबाइलवर एसएमएस आलाच. ‘‘अम्पायर आजोबा कुठे आहात? टीम इज वेटिंग.’’ मी तो एसएमएस डॉक्टरांना दाखवला, आणि हसत हसत दवाखान्याबाहेर पडलो. खूप वेळानंतर माझ्या लक्षात आलं, माझे रिपोर्ट्स मी डॉक्टरांच्या टेबलवरच विसरून आलो होतो.
gadrekaka@ gmail.com