आजी, आई घरखर्चातूनोचत केलेले पैसे धान्याच्या डयात दडवून ठेवत असे आणि घरात निकड निर्माण झाली की ते पैसे कर्त्यां पुरुषाला काढून देत असे. अंधाऱ्या डयात पुरुषमंडळींच्या अपरोक्ष ठेवलेल्या अशा पैशांचं तिच्या आजीने चक्क ‘ब्लॅकमनी’ म्हणून नामकरणदेखील करून टाकलेलं होतं. काळोदलला तसा पैसा ठेवण्याच्या काही जागाही.. पण स्त्रीवर्गाचा ‘ब्लॅकमनी’ कायम राहिला..

तिला आणि तिच्या कन्येला शॉपिंगची भारी आवड, क्रेझच म्हणाना. कुठेही जायचे ठरले की नेटवरून त्या ठिकाणच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेण्याआधी शॉपिंगच्या ठिकाणांची माहिती मिळविण्याकडे त्या दोघींचा कल जास्त. राजस्थान-मेवाड टूरला जायचं निश्चित झालं आणि शॉपिंगच्या ठिकाणांची माहिती गोळा करण्याच्या उद्योगाला मायलेकी लागल्या. जयपूरला तीन दिवस प्रेक्षणीय स्थळे फिरल्यावर संध्याकाळी दोघींना जुन्या जयपूर मार्केटमध्ये जाण्याची संधी मिळाली. मॉलपेक्षा त्या त्या शहरातील स्थानिक बाजार जास्त ‘कलरफूल’ असतो हा त्यांचा अनुभव. वस्तू खरेदी करण्यापेक्षा त्या वस्तूंचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेण्यातच त्या मग्न झालेल्या. तेवढय़ात ती भानावर आली ते पतीच्या आवाजानेच, ‘‘चला चला, खूप उशीर होतोय, हॉटेलवर वेळेत पोचायला हवे.’’

‘‘अरे, आम्ही अजून काहीच खरेदी केली नाहीये.’’ मायलेकी एकदम बोलल्या. इतक्या सुंदर सुंदर रंगीबेरंगी वस्तूंमधून नेमके काय घ्यावे हेच त्यांना सूचेनासे झाले होते.

‘‘चला, आता काही घेऊ  नका. उगाच आतापासून सामान वाढवू नका. पुढे उदयपूरलासुद्धा असेच लोकल मार्केट आहे. तिथे आपण शॉपिंग करू.’’ मायलेकींना बाबांचे म्हणणे मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता.. रंगीत रंगीत कपडे आणि दागिने तिथेच सोडून त्या खट्टू मनानं परतल्या.

उदयपूर मुक्कामात इतर प्रेक्षणीय स्थळांबरोबर नाथद्वारा श्रीनाथजी मंदिरातही जायचे होते. श्रीनाथजी मंदिराचा परिसर म्हणजे मुंबईतील माधवबागच. दर्शन घेऊन दोघी मंदिरातून बाहेर पडल्या आणि थेट मार्केटमध्येच शिरल्या. लेकीने बाबांच्या विरोधाला न जुमानता थोडी(शीच) दागिने खरेदी केलीच. ‘‘इथे फारसं आवडलं नसेल तर काही खरेदी करू नका, माउंट अबूला सगळं काही मिळतं. तेही मस्त आणि तेथून आपण घरीच तर जाणार आहोत, त्यामुळे वाढीव सामानाचंही काही टेन्शन नाही.’’ पतीदेवाने दिलेल्या दिलाशाने दोघी खूश होऊन हॉटेलवर परतल्या,  अर्थात शॉपिंग शिवायच!

माउंट अबूच्या अप्रतिम दिलवाडा मंदिराचं दर्शन घेऊन समस्त महिला मंडळाला ‘‘उद्या भरपूर शॉपिंग करा बरं का!’’ असे मोठे आश्वासन देण्यात आले. एटीएममधून पैसेदेखील काढले गेले. एक हजाराच्या लाल रंगाच्या कोऱ्या करकरीत नोटा मशीनमधून हलकेच बाहेर आल्या. त्या कुरवाळत, गोंजारत हळूवारपणे शॉपिंगची रंगीत स्वप्न बघत पर्समध्ये सरकवल्या गेल्या. महिला मंडळ एकदम खुशीत हॉटेलवर परतले. लेकीने शॉपिंगची यादी करायला घेतली. स्वत:साठी काय शॉपिंग करायची, मैत्रिणींना काय घ्यायचं या विश्वात कन्या रमून गेली आणि त्यातच झोपीही गेली. फ्रेश होऊन तीपण टीव्ही पहाण्यासाठी सोफ्यावर विसावली. दिवसभराच्या फिरण्याने डोळे मिटत होते. पण ‘ब्रेकिंग न्यूज’मधल्या  पाचशे आणि हजाराच्या नोटा एकदम रद्दच केल्याच्या बातमीने तिची झोप मैलभर लांब पळाली. आपल्या शॉपिंगचं काय होणार, हा विचार पहिल्यांदा मनात आला आणि निजलेल्या लेकीच्या चेहऱ्यावरचे शॉपिंगचे स्वप्नाळू भाव बघून तिचं काळीज तुटलं. एटीएममधून जादूसारख्या बाहेर आलेल्या एक हजाराच्या नोटा आता नागिणीसारख्या तिला डसू लागल्या. स्वत:च्या शॉपिंगपेक्षा लेकीला कसे समजावयाचे या विचारांनी ती कावरीबावरी झाली होती. उद्याचा दिवस न उजाडता घरी जाण्याचाच दिवस जादूने उजाडावा असे तिला वाटत राहिले..

पण तो दिवस उजाडलाच. आज गुरुशिखर चढायचे होते. गाईडने बीएसएफची सीमा दाखवली. उंचावरून दिसणाऱ्या शहराच्या मनोहारी दृश्याने सगळे हरखून गेले. तिच्या मनातील एक कप्पा मात्र घराकडे ओढ घेत होता.. फिरुन रूमवर परतल्यावर लेक म्हणाली, ‘‘आई, खूप ताण नको गं घेऊस. बाबाने मला सगळे सांगितले आहे. मला फार कळले असे नाही पण बऱ्यापैकी समजले आहे.’’ तिने कौतुकाने लेकीला कुशीत घेतले. ‘‘ए आई, आपल्याला थोडे का होईना पण जमेल तेवढे शॉपिंग मी करणारच आहे बरं का आणि हो, बरं झालं काल मी थोडे दागिने घेतले. दाखवण्यापुरते तरी.’’ असं म्हणत लेक स्वत:वरच खूश झाली. संध्याकाळी दोघींनी बाजारात विंडोशॉपिंग केली. नाही म्हणायला थोडय़ाफार वस्तू घेतल्या म्हणा, पण उत्साह कमी होता. आधी पतीच्या धोरणामुळे शॉपिंग करता आली नाही आणि नंतर सरकारच्या धोरणामुळे..  चिडचिडच झाली तिची. त्यात सर्व लक्ष घराकडे लागले होते. तिथे तर दुसरं दिव्य तिची वाट पहात होतं..

विमानतळावरून संध्याकाळी घरी पोचल्यावर घरातली आवराआवर तिने केली खरी, पण तिच्या मनात दुसरेच विचार चालू होते.  दुसऱ्या दिवशी लेक शाळेत आणि लेकीचे बाबा ऑफिसला गेले. तिने मात्र मुद्दाम एक दिवस रजा वाढवून घेतली होती. घर रिकामं झाल्यावर दारं खिडक्या लावून तिने तिचे कपाट उघडले. अडीअडचणीला उपयोगी पडतील म्हणून साडी फोल्डरमध्ये, साडय़ांच्या-ड्रेसच्या घडीत, पाऊचमध्ये, जुन्या झालेल्या, पण टाकाऊ  नसलेल्या पर्समध्ये जपून ठेवलेल्या ५०, १००, ५०० आणि १००० च्या नोटा काढू लागली. पुढे उपयोगी पडतील म्हणून जपून ठेवलेली घरखर्चाच्या बचतीतून जमलेली रक्कम, वाढीव महागाई भत्त्याच्या रक्कमेतून थोडे बाजूला काढून ठेवलेले पैसे, रक्षाबंधन-भाऊबीजेला मिळालेली रक्कम, लेकीच्या वाढदिवसांच्या वेळी नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आप्तेष्टांनी गिफ्ट म्हणून दिलेली पाकिटे ती उघडू लागली. गरजेला उपयोगी पडतील म्हणून घरातल्यांच्या नकळत जपून ठेवलेल्या या नोटांचं आता काय करायचं हा मोठा प्रश्न तिला भेडसावू लागला.

अशा संकटसमयी तिला प्रथम आठवण झाली ती तिच्या बालपणीच्या दोस्ताचीच. कोणतीही आनंदाची बातमी असो, खरेदी असो, वा काही सल्ला हवा असो, तिचा पहिला कॉल दोस्तालाच. नेहमीप्रमाणे तिने त्याला आपली व्यथा कथन केली. ‘‘अगं, सरळ बँकेत जा आणि तुझ्या वैयक्तिक खात्यावर पैसे जमा कर. मला माहीत आहे पैसे तुझ्या कष्टाचे आहेत ते. वाया जाण्याचा प्रश्नच नाही.’’ असे म्हणत दोस्ताने तिची चिंता दूर केली. तिला वाटणाऱ्या अवघड प्रश्नावर दोस्त नक्की तोडगा काढणार या तिच्या विश्वासाला त्याने तडा जाऊ  दिला नाही. तिच्या काळजीचे निरसन होऊन मन हलके झाले. कष्टाने जमवलेले पैसे तिला वाया जाऊ  द्यायचे नव्हते. ५०, १०० च्या नोटा सहज सवयीप्रमाणे पुन्हा साडी फोल्डरमध्ये विराजमान झाल्या आणि ५००-१००० च्या नोटांची मोजणी सुरू झाली. जवळपास १५ हजार जमले. सल्ला देताना तिची कानउघडणी करायला मात्र दोस्त विसरला नाही. म्हणाला, ‘‘हे पैसे वेळोवेळी बँकेत ठेवले असते तर आज व्याज जमा होऊन रक्कम वाढली असती.’’ ती गाल्यातल्या गालात हसत मनात पुटपुटली, ‘‘याला कशी कळणार माझ्या आजीकडून, आईकडे आणि आईकडून माझ्याकडे चालत आलेली आमची ‘ब्लॅकमनी’ची परंपरा.’’

आजी, आई घरखर्चातून बचत केलेले पैसे धान्याच्या डब्यात दडवून ठेवत असे आणि घरात निकड निर्माण झाली की ते पैसे कर्त्यां पुरुषाला काढून देत असे. अंधाऱ्या डब्यात पुरुषमंडळींच्या अपरोक्ष ठेवलेल्या अशा पैशांचं तिच्या आजीने चक्क ‘ब्लॅकमनी’ म्हणून नामकरणदेखील करून टाकलेलं होतं. घरातल्या पुरुषमंडळींना महिलामंडळाच्या या ‘ब्लॅकमनी’ची कल्पना होती. पण त्यांनी कधीही त्यांच्यावर ‘टॅक्स’ची धाड टाकली नाही. घरातल्या महिलामंडळाच्या ‘ब्लॅकमनी’कडे नेहमी जाणूनबुजून कानाडोळा केला जायचा. जशी आजी किंवा आई, काकू, मावशी घरखर्चातून बचत केलेले पैसे धान्याच्या डब्यात ठेवत तसे ती तिचा ‘ब्लॅकमनी’ साडी फोल्डरमध्ये ठेवत होती. जागा बदलली पण संकल्पना तशीच राहिली. घरात अचानक निकड/अडचण निर्माण झाली की हा बिनव्याजी मनीच तर उपयोगी पडतो, दोस्ताला कसे कळणार तिचे हे गणित? वेळप्रसंगी पटकन फोल्डरमध्ये हात घालून पैसा उभा करता येतो. तेव्हा कुठे बँकेत जायला वेळ असतो आणि सुट्टीच्या दिवशी गरज निर्माण झाली तर कुठली बँक उपयोगी पडणार आहे? आणि एटीएमची खात्री कोण देणार? असे असंख्य प्रश्न तिने मनातल्या मनात त्याला विचारले, कोणत्याही उत्तराची अपेक्षा न ठेवता!

pathak.padmaja@gmail.com