प्रेमपत्र म्हणजे प्रीतीच्या लाटेवर खळाळणारे फेनिबदू. प्रेमपत्राइतकी वैयक्तिक संबंधांची गोष्ट दुसरी खरोखर कोणतीच नाही. जे वाचताना बरसायला, वितळायला, वाहून जायला होत नाही ते प्रेमपत्रच नाही. जे शांत करतानाही पेटवीत नाही, ते प्रेमपत्रच नाही. महिनोन्महिने पतीविरहात जगणारी ही पत्नी, केवळ पत्र हाती आलंय् तर केवढी सुखावून गेलीय.. हरखून गेलीय्! एकान्ताचे क्षण सोसून, कधी उदासत, कधी वाट पाहत उत्कंठा, अधीरता, प्रतीक्षा अशा सगळ्या वाटांवरून चालत ही विरहिणी आता ज्याची वाट पाहावी, ते गवसल्याच्या आनंदात आहे.

आभाळात एक विमान उडालं आहे.. एका घराच्या अंगणात एक गृहिणी उभी आहे. नुकतंच आलं आहे पत्र तिच्या सन्यात असणाऱ्या नवऱ्याचं. अर्थातच ती हरखून- आनंदून गेली आहे. पत्र अजून हातातच आहे. उघडलं नाहीये पाकीट अजून. झोपाळ्यावर बसतेय ती.. मस्त हलके हलके झोके घेत गुणगुणू लागते.

‘तेरा खत लेके सनम

पाँव कहीं रखते है हम

कहीं पडते है कदम..’

‘अर्धागिनी’ या जुन्या हिंदी चित्रपटातलं हे दृश्य आणि गीत. साध्या घरगुती साडीत, स्वत:भोवती गिरक्या घेत, अंगणभर नाचणारी मीनाकुमारी. पत्राचं पाकीट न फोडताच, पत्र न वाचताच गाणं म्हणतेय.. स्वत:ची नाचरी पावलं पाहू म्हणतेय – पाँव कहीं रखते है हम – कहीं पडते है कदम.. किती साधे शब्द, परंतु केवढा मोठा अर्थ..! तिच्या मनाची उत्फुल्ल, अधीरी, नाचरी अवस्था नेमकी वर्णन करणारे! ती पाऊल टाकतेय एकीकडे, पण पडतंय् दुसरीकडे.. सहजसाधं तरीही विलोभनीय!

कै. माधव आचवल यांचा एक ललितलेख आहे ‘पत्र’ या शीर्षकाचा. अत्यंत तरल लेख! लेखात त्याला तिचं पत्र आलंय्. त्याच्या तळहातावर ते पाकीट आहे. तो तिच्या – त्याच्या पत्रांविषयी, मजकुराविषयी, पत्रांतून झालेल्या प्रदीर्घ, गाढ संवादांविषयी तिच्याशी मनोमन बोलतोय. इकडे पडद्यावरची मीनाकुमारीदेखील बंद पाकीट हातात धरून, त्या पत्रांतील अपेक्षित मजकूर आठवून हरखून गेली आहे. आनंदाने गातेय, नाचतेय, पत्र वाचण्यापूर्वीच!

आचवल लिहितात – ‘स्वत:चंच पत्र पुन्हा आठवावं, शब्द आठवावे, एखादी लिहिण्यातली लकब आठवावी. तो शब्द, ते वाक्य लिहिताना मनातला पंख फडफडवीत उडालेला पक्षी आठवावा. त्या शब्दानं तुला कुठे दिलासा दिला असेल, कुठे कसा स्पर्श करून मोहर आणला असेल याची कल्पना करावी. आता पत्र पोचलं असेल. तू ते वाचत असशील. एकदा वाचून उशीखाली ठेवलेलं ते पत्र.. रात्री अगदी एकटं असताना पुन्हा काढून.. त्यातल्या त्या शब्दाला- छोटय़ा पक्ष्याला मुठीत धरून हळूच गोंजारावं तसं गोंजारत असशील.. या कल्पनेनं सुखवावं.’

आचवल ज्या तरलतेनं हे लिहितात, ती सगळी तरलता, अधीरता आणि ते वारंवार सुखावून जाणं, मीनाकुमारी पडद्यावर जिवंत करते.

‘राज जो इसमें छुपा है

वो समझता है दिल

कैसे खोले तेरा खत हम

के धडकता है दिल..’

‘प्रेमपत्र म्हणजे प्रीतीच्या लाटेवर खळाळणारे फेनिबदू. प्रेमपत्राइतकी वैयक्तिक संबंधाची गोष्ट दुसरी खरोखर कोणतीच नाही. जे वाचताना बरसायला, वितळायला, वाहून जायला होत नाही ते प्रेमपत्रच नाही. जे शांत करतानाही पेटवीत नाही, ते प्रेमपत्रच नाही..’ आचवल लिहितात.

आणि पुन्हा.. पत्र हातात धरून अजूनदेखील ते वाचताच नाचणारी मीनाकुमारी म्हणते..

‘क्यूं पाकर इसे

तूफा उठे सीनेमें?

तेरी सूरत नजर आती है

इस आईनेमें ..

ये दिल ठहरे जरा

नजर ठहरे जरा

जरा फिर होले फिदा हम..’

महिनोन्महिने पतीविरहात जगणारी ही पत्नी, केवळ पत्र हाती आलंय् तर केवढी सुखावून गेलीय.. हरखून गेलीय्! एकान्ताचे क्षण सोसून, कधी उदासत, कधी वाट पाहत उत्कंठा, अधीरता, प्रतीक्षा अशा सगळ्या वाटांवरून चालत ही विरहिणी आता ज्याची वाट पाहावी, ते गवसल्याच्या आनंदात आहे. पत्रात काय काय आहे हे ती ओळखूनच आहे. पतीच्या हस्ताक्षरातून कागदावर प्रतिष्ठित झालेले शब्ददेखील तिला किती वेगवेगळे आनंद देऊन जाणार आहेत हेदेखील ती पक्कं जाणून आहे. म्हणूनच ती पुढं म्हणतेय –

‘इसमें जो बात भी होगी, बडी कातील होगी

तेरी आवाज भी इन बातोंमें शामील होगी’

आपलं पत्र त्याला पोचणं, त्यानं ते वाचून उत्तरादाखल लिहिणं आणि मग त्याचं पत्र हिच्यापर्यंत पोचणं.. हा सगळा प्रतीक्षेचा लांबलचक प्रदेश आहे. हा प्रदेश तुडवून शिखर पायाखाली आलं, की पत्र आलं आहे हातात.. उघडण्याआधीच ते पत्र इतकं सभोवाराचा विसर पाडायला लावणारं आहे! वाट पाहून पाहून थकलेल्या, कधी उदासलेल्या मनावर हलके हलके तुषार उडवणारं असं ठरतंय.. दळणवळणाची अपुरी, मर्यादित साधनं, संवादासाठी कोणतंही माध्यम सहजासहजी उपलब्ध नसणं अशा त्या जुन्या काळात पत्र हाच एक मोठा दिलासा असे. किती तरी अशा उत्कृष्ट हळव्या प्रेमपत्रांनी प्रेमी जीवांना बांधून ठेवलं होतं! आचवल म्हणतात -‘संवाद शब्दातनं घडत जातो आणि शब्द पुन्हा संवादाच्या धाग्यावरच तोल सावरून उभे असतात. भेटीआधीच्या, भेटींनतरच्या या सगळ्या काळात, केवळ तेवढं करण्याकरिताच जणू जगत आहोत असं वाटावं, अशी पत्रं आपण लिहिली. किती मोठी पत्रं! किती किती शब्द! इतके शब्द की भेटल्यावर आपण अवाक् होत असू. फक्त एकमेकांची तहान तेवढी उरे. आपण आपलं सगळं बोलणं पत्रांकरिता ठेवलं होतं. भेटीत-सहवासाच्या त्या कापरासारख्या उडून जाणाऱ्या क्षणांत शब्दांना उंबरठय़ाबाहेर उभं राहावं लागे. भाषा उरे फक्त स्पर्शाची. जसा शब्दातून आपला संवाद जुळला, तितकाच नि:शब्दातूही.’

प्रेमपत्रांची ही दुनिया मोठी अद्भुत असते. पाकिटांचे रंग, आकार, पत्राचा कागद, शाईचे रंग, अक्षरांची वळणं, अक्षरांमधून एखादंच अक्षर ठळक उमटविणं, काही विशिष्ट सांकेतिक खुणा, अशा खास खुणा करून त्या पत्राला खासगी नाजूक अशी वैयक्तिकतेची मोहोर उमटवणं.. अशी ही विशिष्ट खूण म्हणजे जणू त्या दोन जीवांचंच असं एक जग.. नाजूक हळव्या नात्याची नजर लाभलेलं, वैभवशाली रोमांचक जग! खास अक्षरं, काही अक्षरांची खास वळणं, एखाद्या रेषेची अकारण वाढलेली लांबी, काही ठिपके.. यामुळं ती पत्रं वेगळी.. सर्वस्वी भान हरपून जावी अशी भासणं..

पत्र पुन:पुन्हा वाचणं – संथ लयीत कधी गडबडीत – कधी स्वत:शीच मोठय़ा पण खासगी आवाजात वाचणं – काही मजकुराचं पुनर्वाचन.. असं करत करत भेटीचे भोगलेले क्षण पुन:पुन्हा जागवणं अन् जगाचा पूर्ण विसर पडणं..

खरोखरच प्रेमपत्रं अशा ताकदीची असतात. अशी नाजूक नात्याची पत्रं हातात ठेवणारा तो पोस्टमन. त्याचाही किती वाट पाहिली जाते अशा वेळी! प्रेमपत्रांची नशा चाखायला मिळालेल्या भाग्यवंतांना पोस्टमन प्रेमदूतच वाटायचा.

आजच्या जगात माणूस या अद्भुत आनंदाला मुकला आहे. सगळं कसं त्वरित मिळतं हल्ली. प्रतीक्षेचा नाजूक, अव्यक्त हुरहुर लावणारा काळ आता उरलेला नाहीय. संपर्काच्या नव्यानव्या मायाजालामुळं खूप सोयी सुविधा सुलभतेनं मिळाल्या आहेत. त्याचा आनंद पुरेपूर उपभोगत आहोत.. विरह-व्याकूळ आर्त अशी साद घालायची वेळच आता कुठे येतेय? सातासमुद्रापलीकडचं सगळं तुम्हाला दिसू शकतं, कुठेही कितीही वेळा, किती तरी वेळ, कुणाशी तरी बोलता येतं. त्यांना पाहतादेखील येतं. खूप नवनवे आनंद निर्माण झालेत,  विरहाचे चटके आता फारसे तीव्र उरले नाहीत हे खरंय्!

आपल्या माणसांच्या बोटातून उमटलेली अक्षरं.. त्यातलं अतीव खासगीपण आणि त्यातून जाणवणारं अतितरल स्पर्शेत्सुक नातं.. आताच्या जगातून मावळत जातंय का?  व्यक्त होण्यासाठीचा.. अत्यंत वैयक्तिक असा हा प्रेमपत्रांचा खजिना.. ज्यांना मिळतो ते जीव खरोखरच भाग्यवंत!

माधव आचवलांचा पत्र लेख वाचून आणि हे चित्रपटगीत पाहून, या अद्भुत दुनियेत फिरून यावंसं वाटलं.. रोमांचक सुखाची ही छोटीशी दुनिया.. मजरुह सुलतानपुरींचे गाण्यातले शब्द.. ‘तेरी सूरत नजर आती है इस आईनेमें’. खरंच मनातलं सगळं कागदावर उमटलं की तो चेहरादेखील पत्रात दिसू लागतो वाचणाऱ्याला. पाऊल पडणं आणि पाऊल टाकणं यात सूक्ष्मसा फरक आहे. पाऊल टाकण्यामध्ये सावधपण आहे तर पाऊल पडण्यात एक अटळ बेहोषी आहे. पत्राची नशा, ती बेहोषी अनुभवली की पाऊल नकळतच पडतं कुठे तरी. त्यामुळेच, ‘पाँव कही रखते हैं हम, कही पडते है कदम’  यातलं सौंदर्य पुन:पुन्हा ते गाणं ऐकताना, पाहताना जाणवत राहतं. विरहाची धग सोसून प्रेमदेखील परिपक्व होत जातं. दिसणाऱ्या त्या प्रिय माणसाच्या उरातलं सगळं काहूर पत्रातील शब्दांतून थेट समजत जातं. असे हे दोन जीव मग अतूट अदृश्य धाग्यांनी एकमेकात गुंतत एकच होऊन जातात. हे असं एकमेकांत विलीन होऊन अद्वैत होणं कसं असतं, ते कविवर्य केशवसुत फार सौम्य हळुवार पद्धतीनं सांगतात त्यांच्या कवितेतून..

‘सिद्ध झालो मी दूर जावयाला

कंठ तेव्हा तव फार भरुनि आला

मला म्हटले तू गद्गद स्वरा।

खुशालीचे ते वृत लिहीत जाणे

अजून तर तो गेला नाहीय्.. निरोप घेतोय’ – पण तिला पुढचं सगळं दिसतं आहे. सर्वदूर एकटेपणा पसरलेला दिसतोय अन् तिला त्याच्या खुशालीच्या दोन शब्दांची तहान लागली आहे. तो जाण्यापूर्वीच ती स्वत:च्या मनाला आश्वस्त करण्याचा.. पत्राचा पर्याय समोर ठेवतेय्. मनातून तर त्यानं जाऊच नये असंच वाटतं आहे तिला. तो मात्र शांत.. कारण त्या दोघांचं अद्वैत झालेलं आहे, हे तो समजून आहे, उमजून आहे. दूर जाणं अटळ.. त्यामुळं तो संयमी शहाणपण बाळगून उभा.

म्हणतोय तिला –

लिही म्हटले मी तुला आश्वसाया

पुढील केला मी मुळी नच विचार

करी घेता परी पत्र हे लिहाया

खुशालीचे क्षीणत्व दिसे फार

विरहाची वेदना किती ताकदीने, पण अत्यंत कमी शब्दांत कविवर्य मांडतात! मुळात त्याला पत्राची गरजच वाटत नाहीये, कारण त्याच्या मते ती दोघं एकरूपच झालेली आहेत. ती जवळ नाही तर त्याच्या आतच आहे किंवा तो तिच्या आत सामावला आहे. त्यामुळे खुशालीच्या वृत्ताला तसे क्षीणत्व प्राप्त झालेय.

‘लोचनांना या होसि तू प्रकाश

मदीयात्म्याचा तूच गे विकास

नाडी माझी तव करी वाहताहे

हृदय माझे तव उरी हालताहे’

दोन विरह-व्याकूळ जीवांना केवढा दिलासा आहे या शब्दांमधून!

‘नाडी माझी तव करी वाहताहे’ हे शब्द म्हणजे अद्वैताचंच शब्दरूप! किती पारदर्शी – नितळ भावना. तिची अवस्था जाणून घेण्यासाठी, तिसऱ्या अन्य कुठल्याच गोष्टीची गरज उरलेली नाहीय्.. तिनं स्वत:च्याच काळजाचा कानोसा घ्यावा अन् तिथं तिला त्याच्या हृदयाची धडधड ऐकू येईल.. पत्राची गरजच नाहीय.. इतका तो ‘ती’मय झालेला आहे. तिनं डोळे मिटावे, स्वत:च्याच नाडीचे ठोके मोजावे तर त्याचं समग्र दर्शनच तिला होईल. अद्वैताची हीच परमखूण! जुन्या पिढीतील कवी आ. ना. पेडणेकर. त्यांना तर पत्रात काय लिहू हेच कळेनासं झालंय्.. मनाला काहीच सुचेनासं झालंय्, पण तिला तर काही तरी सांगायचंच हे नक्की. तिला संबोधन कुठलं वापरावं.. संभ्रम पडलाय्. मग पत्र कोरंच द्यावं का, हादेखील विचार मनात आलाय्.

‘पत्र कोरे देऊ हाती

नको – पण –

वाचशील तुझ्या मनीचे भलेबुरे

माझ्या चित्ती जे नसेल’

या ओळी वाचल्या आणि पुन्हा मन माधव आचवलांच्या पत्राकडे गेलं.. ती या वेळी पत्रावर नेहमीची खूण करायला विसरली आहे. पत्र त्याच्या हातातच आहे, पण खूण नाही! आचवल लिहितात, ‘मी तुला ज्या लाडक्या नावाने हाक दिली होती, तेच बारीकसं, चित्ररूपानं पुढल्या पत्रावर खुणेच्या जागी रेखाटलेलं पाहून मी किती वेडावून गेलो होतो! क्वचित, तुला दिलेल्या नावाचं आद्याक्षर, माझ्या नावात गुंफून, तू खूण करायचीस आणि तुला त्या वेळी हे जाणवत असे का, की अक्षरं कशी गुंफली आहेत कशी गुंतली आहेत, किती सरळ, तिरकी आहेत, हेच पाहत मी पुष्कळदा खूप वेळ बसत असे. तुझ्या एका पत्रावर अशी काहीच खूण नव्हती आणि ते पत्र मिळताक्षणीच काही चुकल्यासारखं, शय्यागृहातून दिवाणखान्यात यावं तसं मला वाटलं होतं.’ प्रेमपत्रांचा खराखुरा जीव आणि सौंदर्य – त्यांच्या आत्यंतिक खासगीपणामध्ये लपलेलं असतं. हेच खासगीपण हरवलं की काय असं वाटून जातं, जेव्हा पत्रांवर त्या खास अशा त्या दोघांनाच कळतील अशा सांकेतिक खाणाखुणा नसतात.. आचवल किती हळुवार सांगतात ही गोष्ट! खुणा नाहीत अन् पत्र हातात पडूनदेखील आनंदानं मन भरून जाण्याऐवजी आनंदाची जागा शंकाकुशंकेने व्यापून जातेय्.. भलेबुरे विचार येताहेत मनात.. आणि मग म्हणूनच पेडणेकरांच्या प्रेमपत्राच्या कवितेची याद येते. ‘पत्र कोरे देऊ हाती

नको – पण

वाचशील तुझ्या मनीचे भलेबुरे..’

खूप वेडेवाकडे, आडवे-उभे-तिरके विचार मनात येऊ लागतात आणि एखादा प्रेमी जीव असाही विचार करू लागतो की, कोरेच देऊ या पत्र.. पण तेदेखील मनाला भावत नाही. धाडस गोळा करून मनातलं सारं कागदावर रितं होतं.. पत्र मनासारखं पूर्ण होतं. मनाला अगदी हलकं, प्रसन्न वाटू लागतं आणि अचानक एक सर्वस्वी नवाच विचार त्याच्या मनात येतो.. पत्र लिहिलं आहे खरं, पण तिला नाहीच द्यायचं! कारण काय.. तर-

‘पत्र पहिलेवहिले

माझ्या जवळी ठेवू दे

पहिलेच पुष्प प्रिया

वेलीवरीच राहू दे’

आणि इकडे ती? ती तर डोळ्यात प्राण आणून वाट पाहतेय. त्याची किंवा निदान त्याच्या खुशालीच्या वृत्ताची.. मनोमन त्याला खूप साद घालून झालीय् डोळ्यातून धारा तर किती बरसल्या? हिशेबच नाही. मीनाकुमारीचं गाणं संपत आलंय पडद्यावर.. पत्र मात्र अजून उघडलेलंच नाहीय्.. ते उघडून प्रेमशब्दांची बरसात तर व्हायचीच आहे अजून. नुसतं पत्र आलंय् याचाच आभाळाएवढा आनंद तिला झालाय.. गाणं संपत आलं आहे.. तिची पावलं थांबलीत. आता.. इकडे माधव आचवलांचा ‘पत्र’ लेखदेखील संपत आलाय. तुझं पत्र अजून माझ्या तळहातावर आहे, पण मला आता धीर उरलेला नाही.

इथं लेख संपतो!

पत्रात काय लिहिलंय हे तर अजून माहीतच नाही, पण नुसतं पत्र आलंय ही एकच छोटीशी घटना मनाला किती आणि कसा कसा रोमांचक सुखद हवाहवासा, अजब आनंद देऊन जाते!

मजरुह सुलतानपुरींचे शब्द घेऊन पडद्यावरची मीनाकुमारी गातेय.. केशवसुतांची क्षीणत्व लाभलेली खुशाली अद्वैताचं लोभस रूप दाखवतेय, तर पेडणेकरांचं पहिलंवहिलं पुष्प वेलीवरच राहतंय आणि आचवलांचा तरल, नाजूक पत्राचा लिफाफा अजूही उघडलेला नाहीय..

या सगळ्यांचा मिळून एक, अलगद डोळ्यांनी हलकेच टिपून घ्यावा असा कोलाज झालाय्.

आणि माझ्या घराच्या खिडकीतून मी बाहेर पाहतेय.. आभाळाचं प्रेमपत्र थेंबाथेंबाच्या रूपात धरतीकडे झेपावतंय्. जमीन हरखून गेलीय्.. तृषार्त ती.. आसुसलीय थेंबासाठी! पहिलेवहिले थेंब पिऊन ती सुखावेल आणि मग सुरू होईल- एक नवं गाणं.. धरतीचं..

डॉ. वृषाली किन्हाळकर vrushaleekinhalkar@yahoo.com