रिओ ऑलिम्पिकदरम्यान पोहण्याच्या स्पर्धेत चौथी आलेल्या एका चिनी जलतरणपटूने कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देताना बिनधास्तपणे कालच मासिक पाळी सुरू झाल्यामुळे मी लौकर थकले, असं सांगितलं. तिच्या या प्रतिक्रियेला जगभरातून स्त्रियांचा प्रतिसाद मिळाला. अकारण निषिद्ध ठरलेल्या या विषयाने जगभरातल्या स्त्रियांचा किती कोंडमारा होतोय हे यातून सिद्ध होतं.

काही गोष्टी केवळ मुलींनी आपसात बोलायच्या असतात. सिक्रेट, गर्ली टॉक्स, बायकी गप्पा, गॉसिप असं काही नाही, तरीही हा बायकी विषय खरा! हे गॉसिपादी विषय म्हणजे बायकांचे, असं उगीच पसरवलं जातं. बऱ्याचदा स्त्रियांनाही ते आवडतं म्हणे.. उगाच तुम्हा पुरुषांच्यात कशाला बसायचं मुद्दाम.. आम्ही आपल्या आतल्या खोलीत बसतो, असं म्हणणाऱ्या कित्येक असतात. तर.. असो. तर मगाचा ‘बायकी’ विषय मुली-मुलींनी आपसांतच बोलायचा. बराचसा गंभीर. शक्यतो बोलायचाच नाही असा. चारचौघांत तर नाहीच नाही. बोललं तरी गुपचूपपणे अगदी, थेट नाव न घेता. त्याविषयी बोलायची वेळ आलीच तर अगदी बापुडवाणा चेहरा करत, खाली बघत पुटपुटायचं फक्त. त्याविषयी बोलताना कधी नेत्रपल्लवी करून, तर कधी त्यासाठी कुठले प्रतीकात्मक शब्द वापरून तर कधी अगदी ‘यू नो हू’ स्टाइलने.. नाव न घेताच. नवऱ्याचं नाव चारचौघात उच्चारायची बंदी होती ना पूर्वी अगदी तस्सं. आता नवऱ्याचं नाव एकेरीवर आलं तरी हा विषय मात्र अजूनही माजघरातून ओसरीवर म्हणजे चारचौघांदेखत बोलला जात नाही. आडवळणानं याविषयी सांगितलं जातं. कावळा, अडचण, प्रॉब्लेम हे असे शब्द उच्चारले की, समोरच्याला बरोब्बर कळणार. ही परिस्थिती केवळ आपल्या देशात नाही, तर जगभर आहे, हे रिओ ऑलिम्पिकदरम्यानच्या एका प्रसंगामुळे समोर आलं.

चीनची जलतरणपटू फू युआनहुई हिच्यामुळे हा एरवी निषिद्ध असणारा विषय चर्चेत आला. फू चीनमधली लोकप्रिय खेळाडू. स्टार खेळाडू आपल्याकडे केवळ क्रिकेट किंवा कधी कधी टेनिसमध्येच तयार होतात. चीनचं तसं नाही. पण ही फू युआनहुई लोकप्रिय झाली आहे तिच्या दिलखुलास मुलाखतींमुळे. ही पोरगी तशी मनस्वी. स्पर्धेत जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतरही अगदी खऱ्याखुऱ्या भावना व्यक्त करणारी. जिंकल्यानंतर अल्लडपणे फोटोग्राफरना चित्रविचित्र पोझेस देणारी, हरल्यानंतर मनमोकळेपणाने रडणारी. आपल्या देशाच्या खेळाडूला प्रोत्साहन देताना घसा फोडून ओरडणारी.. त्या वेळी मीडिया कॅमेरे लावून असेल, लोक काय म्हणतील वगैरे विचार न करणारी. तर अशा या २० वर्षांच्या मनस्वी खेळाडूकडून चीनला बऱ्याच अपेक्षा असणार. ती टीममध्ये असणाऱ्या रिले स्पर्धेत चीनला चौथं स्थान मिळालं, त्यानंतरच्या तिच्या मुलाखतीमध्ये फू युआनहुई हिने हरण्याचं कारण स्वत:ची वाईट कामगिरी असं सांगितलं. ‘मी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाही. त्यामुळे आमची टीम चौथ्या स्थानावर फेकली गेली. माझी कालच मासिक पाळी सुरू झाली. त्यामुळे मी लवकर थकले. अर्थात हे काही हरण्याचं जस्टिफिकेशन नाही. मला चांगला खेळ करायलाच हवा होता.’ फूने मासिक पाळीचा उल्लेख चक्क टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोर बिनधास्त केला. चीनमध्ये आपल्यासारखंच पाळी हा विषय अपवित्र, स्त्रीची कमजोरी वगैरे मानला जात असावा, हे या मुलाखतीला मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झालं. तिचं वक्तव्य काही क्षणांत इंटरनेटमुळे ‘व्हायरल’ झालं. या एका वाक्याने फू युआनहुईने हरूनही अनेकांना जिंकलं.

मासिक पाळीच्या वेळी स्त्री पोहू शकते, हेच अनेकींना तिच्या निमित्ताने पहिल्यांदाच समजलं. मासिक पाळीला ‘टॅबू’ न मानता त्याविषयी बोलणं हा दुसरा भाग. फूच्या देशातही हा विषय आपल्यासारखाच निषिद्ध आहे. चीनमध्ये तर टॅम्पऑनच्या (a plug of soft material inserted into the vagina to absorb menstrual blood.) जाहिरातींवरही बंदी आहे. पाळीच्या दिवसांत खेळाडूंसाठी वरदान ठरणाऱ्या टॅम्पऑनसारख्या गोष्टींची निर्मिती अजूनही तिथे होत नाही. तिथे बाहेरच्या देशांतील विदेशी ब्रॅण्ड्सच उपलब्ध होतात. चपलेच्या खिळ्यापासून ते महासंगणकाच्या मदरबोर्डपर्यंत सगळं काही प्रचंड प्रमाणात उत्पादित करणाऱ्यांना ही साधी आणि महत्त्वाची गोष्ट अजूनही निर्माण करावीशी वाटली नाही. याला कारण हा ‘टॅबू’च आहे. टॅम्पऑनचा पहिला चिनी ब्रॅण्ड आत्ता कुठे सुरू होण्याच्या मार्गावर आहे. अशी परिस्थिती असणाऱ्या देशातून येऊनदेखील फू धीटपणे याविषयी बोलली, म्हणून तिचं कौतुक सुरू झालं. अगदी जगभरातून याविषयी लिहिलं गेलं. प्रगत देशांमध्येही पाळी हा विषय असा जाहीर चर्चेचा नसतोच अजून. जाहीरपणे हे असं कारण देणं कदाचित त्यांच्या शिष्टाचारात बसत नसावं. पण जगभरातल्या स्त्रियांना फूचं थकणं कळलं आणि म्हणूनच मनापासून खरं बोलणंही भावलं. फू युआनहुई जगभर प्रसिद्ध झाली ते यामुळे. अकारण निषिद्ध ठरलेल्या या विषयाने जगभरातल्या स्त्रियांचा किती कोंडमारा होतोय हे यातून सिद्ध होतं.

मासिक पाळी म्हणजे स्त्रियांना मिळालेला शाप इथपासून ते या काळात स्त्रिया अपवित्र असतात, अशुद्ध रक्त असतं, बाजूला बसलं नाही तर जंतू पसरतात असं काहीबाही पसरवलं जातं आणि त्यात स्त्रियाही अडकत जातात. मासिक पाळी नैसर्गिक आहे आणि म्हणूनच त्याविषयी बोलू नये असं काहीच नाही, हे माहिती असूनदेखील आजही याबाबत गुप्तता पाळली जाते. सॅनिटरी नॅपकिन्स आपल्याकडे काळ्या पिशवीतून किंवा कागदात गुंडाळून दिले जातात. ते गुपचूप आणायचे असतात. जगभरात सॅनिटरी नॅपकिन्स वापरले जातात. जाहिरातीही केल्या जातात, पण मासिक पाळीचा स्राव म्हणून कुठला निळा द्राव दाखवतात, हे अद्याप न उलगडलेलं कोडं आहे. मध्यंतरी सॅनिटरी नॅपकिनच्या एका ब्रिटिश ब्रॅण्डने प्रथमच त्यांच्या जाहिरातीमध्ये रक्त दाखवलं. प्रथमच थेटपणे सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीत लाल रंग दिसला. अर्थात पाळीच्या वेळचं रक्त न दाखवता कुठलीही किळस वाटणार नाही अशा पद्धतीनं प्रतीकात्मक म्हणून हा भाग दाखवला गेला. खरं तर बाईच्या रक्ताची ताकद या जाहिरातीमधून दाखवली. स्त्रीचं सामथ्र्य अधोरेखित करणाऱ्या या जाहिरातीचं भरपूर कौतुक झालं. पाळीचा अकारण बागुलबुवा निर्माण करणाऱ्यांना ही जाहिरात बरंच काही शिकवून जाते.

आज सगळ्याच क्षेत्रांत स्रिया, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहून रोजच्या धकाधकीच्या जीवनातले ताणतणाव झेलत आहेत. त्यात त्यांनी कधी स्त्री म्हणून एखादी सवलत मागितली, घेतली तर लगेचच डोळे वटारले जातात, पण आयुष्यातली जवळपास चाळीस वर्षे त्या मासिक पाळीरूपी निसर्गाच्या देणगीचं बायप्रॉडक्ट म्हणून जो त्रास बिनबोभाट सहन करत असतात, त्याबद्दल संवेदनशीलता कधी निर्माण होणार?
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com