साडी, पाणीपुरी, मिठाई, पार्टी या सगळ्यांमधून महिला दिनाचं महत्त्व वाढतंय. अशा इव्हेंटमधून किमान त्या दिवसाचं अस्तित्व समाजात सर्वदूर, आतापर्यंत खोलवर पोहोचत असेल तर त्याला नावं कशाला ठेवायची?

आंतरराष्ट्रीय महिला दिन नुकताच झाला. झाला म्हणजे काय.. छानच साजरा झाला. महिला दिनानंतर दोन-तीन दिवस त्या दिनमाहात्म्याचे विशेष कानावर येत होते. आसपास वावरणा बहुतेक सगळ्या महिलांनी या दिनाची त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या विचारांनी दखल घेतल्याचं जाणवलं. मगाशी ‘छानच साजरा’ झाला असं म्हणण्याचं कारण म्हणजे महिला दिनाचा ‘माहौल’ यंदा जोरदार जाणवत होता. वेगवेगळ्या दुकानांमधून साडय़ांचे, पंजाबी ड्रेसचे सेल लागले होते, तेही अगदी दोन-तीन दिवस आधीपासून (वीकएण्ड अनुलक्षून)! दुकानात येणाऱ्या महिला ग्राहकांसाठी घसघशीत १० टक्के डिस्काऊंट दिले गेले. कुणी पाणीपुरी स्वस्तात दिली तर कुणी महिलांना ‘चाट ट्रीट’ दिली. कुठे कुणी डिस्काऊंट कुपन देत होतं तर कुठल्या ऑफिसात कर्तबगार महिला सहकाऱ्यांचे सत्कार चालले होते. तद्दन साऱ्या पुरुष सहकाऱ्यांनी, मित्रांनी, परिचितांनी त्या दिवशी ‘तुमचं बरंय बुवा एकंदरीत’ अशा अर्थाचे कटाक्ष, टिप्पण्या, ट्विप्पण्या, पोस्ट, कमेंट इत्यादी टाकल्या होत्या. सोशल मीडियावर तर शुभेच्छांचा महापूर आला होता ८ मार्चच्या दिवशी. तर म्हणून जागतिक महिला दिन एकूण छान साजरा झाला.

JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Loksatta viva Indian National Calendar Official National Calendar of Indians
भारतीयांचे नववर्ष!
Sachin Tendulkar Investment
‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स’ महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार, सचिन तेंडुलकरचाही सहभाग!
Office of ED and National Investigation Agency in BKC mumbai
ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला

फ्रेम १

‘आयटी’मध्ये काम करणारी एक मैत्रीण ऑनलाइन भेटली त्याच दिवशी. अमेरिकेत असते. म्हणजे इंजिनीअरिंग झाल्यापासून उच्चशिक्षणासाठी म्हणून अमेरिकेला गेलीय, ती कायमची. तिथेच नोकरी मिळाली. सेटल झाली. लग्न करायला भारतात येऊन गेली. नवराही तिथला. त्यामुळे परतण्याचा प्रश्नच नाही. सुट्टीत मात्र आवर्जून येते. ‘इंडिया’त. तर तिच्याही ऑफिसात इंटरनॅशनल विमेन्स डे ‘सेलिब्रेट’ झाला. ऑफिसमध्ये एक ‘अर्ली इव्हनिंग डिनर’ पार्टी झाली. ओन्ली फॉर लेडीज. धमाल आली.. ती म्हणाली.. आज स्वयंपाक नवऱ्याने केला. मला आराम. ‘आयडब्लूडी’ झिंदाबाद !!

फ्रेम २

त्याच दिवशी ऑफिसमध्ये जायच्या गडबडीत सुवर्णाचा फोन आला. घरकामवाल्या सुवर्णाचा. ‘वैनी, आज मी येणार नाही बरं का कामावर..  आज सुट्टी. ‘जाग्तीक म्हैला दिन’ आहे ना.. आमच्या एरियात कारेक्रम आहे. उद्याच्याला येईन वेळेवर.’ दुसऱ्या दिवशी छान हसतमुखाने कामावर हजर झाली. कार्यक्रमात काय झालं विचारल्यावर स्थानिक नेत्याकडून साडी मिळाली असं सांगत होती. सुवर्णाचाही म्हैला दिन चांगला झाला म्हणायचा.

फ्रेम ३

कॉलेजमधल्या काही कन्यकांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रेझेंटेशन करायचं होतं. ‘इंटरनेटवर ठरावीक माहिती दिसतेय. ती आम्ही ऑलरेडी ‘गुगल’ केलीय. पण ती सगळ्याच करणार. आमचं प्रेझेंटेशन वेगळं कसं होईल?’ ही त्यांची चिंता. ‘काही वेगळे मुद्दे द्या ना..’ ही मागणी. ‘काय बघा ना.. मुलं हसतायेत आम्हाला. जागतिक महिला दिन आणि आम्हा ‘महिलां’नाच कामाला लावलंय मॅमनी.’ एक जण सांगतेय. तेवढय़ात दुसरी खिदळली, ‘महिला काय..  कसं तरीच वाटतं, स्वत:ला म्हैला म्हणताना.. अ‍ॅक्टिव्हिस्ट टाइप्स. आम्ही अजून मुली आहोत. आता आम्ही काय सांगणार आणखी महिला दिनाचं महत्त्व? इट्स सो ऑबव्हिअस.’

फ्रेम ४

बिल्डिंगमधल्या आजी हल्ली ऊन बरंच वाढलंय म्हणून व्हरांडय़ाच्या शेडबाहेर पडल्याच नव्हत्या आठ दिवसांत. त्या दिवशी संध्याकाळी उशिरा जरा वारा बरा सुटला होता, म्हणून खाली आलेल्या. आजींचं वय असेल ८०च्या घरात. पण चांगल्या तरतरीत. म्हणाल्या, ‘आज काय तुमचा महिला दिन होता ना.. मग साडी नेसून नाही गेलीस का? सणच की हा तुमचा.’ तुमचा म्हणजे? असं विचारल्यावर म्हणाल्या. ‘आजकालच्या तुम्हा मुलींचा गं. आमच्या वेळी कुठे होतं असं काही. असं संध्याकाळी सातच्या सुमाराला उंबरठय़ाबाहेर पडायचादेखील विचार येत नव्हता, आमच्या तरुणपणी. वेळही कुठे होता म्हणा आम्हाला आमच्यासाठी? बरंय पण.. किमान तुमच्या पिढीला तरी तो वेळ मिळतोय. मोकळीक मिळतेय. आमच्या वेळी असा महिला दिन असायला हवा होता गं..’

फ्रेम ५

जिन्यावरून वर जातेय तेवढय़ात आजींची मध्यमवयीन सून लिफ्टपाशी दिसली. ‘आजी खाली आहेत ना गं?’ तिने विचारलं. मी आजींनी दिलेल्या महिला दिनाच्या शुभेच्छांबद्दल हसत सांगितलं तशी एकदम वैतागलीच. ‘कसले महिला दिन साजरे करताय.. थेरं नुसती. हल्ली कशाचंही सेलिब्रेशन करते नवी पिढी. आधीच हल्लीच्या मुली उंडारलेल्या. हवाय कशाला आणखी त्यांना महिला दिन.. आणखी उंडारायला? आमची नाही आयुष्यं गेली असे दिन साजरे न करताही.. आणि असे महिला दिन साजरे करून का बायकांची परिस्थिती सुधारणार आहे? सध्या कुणाला काही उद्योग नाहीत, हेच खरं. महिला दिन म्हणजे शुद्ध मार्केटिंग आहे.’

महिला दिनाचा आजच्या काळातला रिलेव्हन्स, आवश्यकता, महिला दिनाचं स्वरूप या सगळ्याचा विचार करताना मनात हे सगळं आठवून गेलं. या सगळ्या फ्रेम्स खऱ्याखुऱ्या घडलेल्या.. एकामागोमाग एक झरझर येत गेल्या. सन २०१६ चा महिला दिन हा असा विविधरंगी, विविध पैलूंचा, बहुआयामी. त्याच वेळी जाणवलं.. शहरातल्या बहुतेक सगळ्या स्तरातील स्त्रियांपर्यंत तो पोहोचतोय. महिला दिनाचा इव्हेंट झालाय, खरंय. कुठलीही नवी प्रथा, नवी जाणीव, नवी कल्पना रुजताना त्याचा हा असा इव्हेंट होतच असावा बहुतेक. खरं तर पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन झाल्याला शंभरहून अधिक र्वष झालीत. आपल्याकडे मात्र हा असा महिला दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर असतो हे आत्ता कुठे कानावर पडायला लागलंय. गेल्या काही वर्षांत.. त्याचं ‘इव्हेंटीकरण’ झाल्यावरच! इव्हेंट झालाय म्हणूनच की काय आपल्याला लगेच प्रश्न पडायला लागलेत.. असल्या महिला दिनाची काय आवश्यकता? हल्लीच्या पिढीला या दिनाचा काय रिलेव्हन्स? दुसऱ्याच क्षणी आणखी काही प्रश्नही सतावताहेत.. स्त्री सबल होतेय, स्वतंत्र होतेय पण ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालीय का? आपल्या देशात अजूनही ‘निर्भया’ होतातच ना. दररोज अत्याचार, बलात्काराच्या बातम्या येताहेत. लिंगगुणोत्तर अजूनही ९००च्या आत अडखळतंय. आणि तेही शहरातल्या सो कॉल्ड शिक्षित समाजात. तिथेच जास्त स्त्रीभ्रूणहत्या होताहेत हाच त्याचा अर्थ.

विकसित देशांतली परिस्थिती बरी म्हणावी इतकंच. कारण अगदी अमेरिकेतही स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरताहेत. तिथेही समान संधी, समान मोबदला यासाठी आंदोलनं करावी लागताहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या आकडेवारीनुसार जगातल्या दर तीन स्त्रियांपैकी एक स्त्री मारहाण, हिंसाचार याला आयुष्यात कधी ना कधी बळी पडलेली असते. ३० टक्के स्त्रियांना घरगुती हिंसाचार, मानसिक छळ सहन करावा लागतो आणि तो बहुतेकदा तिचा पतीच तो करतो. ३० टक्के ही तक्रार दाखल करणाऱ्यांची आकडेवारी आहे. मुळात १० टक्के स्त्रियाच केवळ तक्रार दाखल करायला पुढे येतात. म्हणजे हे प्रमाण खरं किती असेल? आजच्या काळात महिला दिनाची काय गरज, असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. भारतासारख्या सर्वात मोठय़ा लोकशाही देशात ५४४ लोकप्रतिनिधींपैकी केवळ ६० स्त्रिया आहेत. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेत ११ टक्के आणि राज्यसभेत केवळ १०.७ एवढाच टक्का स्त्रियांचा आहे. ही आकडेवारीही पुरेशी बोलकी आहे.

अर्थार्जन करणाऱ्या महिलांमध्ये नियमित वाढ होते आहे. खरंय. त्याची आकडेवारी उपलब्ध आहे. पण त्यातल्या किती जणींना आर्थिक स्वातंत्र्य आहे, या प्रश्नाचं उत्तर अद्याप बाकी आहे. सगळ्या क्षेत्रांत आता स्त्रियांचं अस्तित्व दिसतंय. पुरुषप्रधान क्षेत्रांत घट्ट पाय रोवून उभ्या राहणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या महिला दिनालाही वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सत्कार झाला. महिला नोकरदार आणि महिला उद्योजकही वाढताहेत. त्यानिमित्ताने रोजगारनिर्मितीत स्त्रियांचा वाटा आहे, हादेखील चांगला भाग आहे. स्टार्टअप इंडियाचा चांगला बोलबाला आहे सध्या. नवउद्योजकांची संख्या वाढतेय. पण ही वाढही ‘जेंडर इनइक्व्ॉलिटी’ सांगणारी आहे. कारण गेल्या वर्षभरात नोंदलेल्या नवीन स्टार्टअपपैकी ९१ टक्क्यांचा भार  पुरुषांच्या खांद्यावर आहे. उरले-सुरले ८-९ टक्के स्त्रियांनी सुरू केलेले उद्योग आहेत. कारण मोठय़ा पदांवर काम करणाऱ्या उच्चभ्रू पुरुषांचाही अजून स्त्री पूर्ण क्षमतेने घराबाहेरचं काम करू शकते यावर विश्वास नाही. पुरुषांनाच कशाला.. स्त्रीलाच अजून तिच्या कार्यक्षमतेची खात्री पटलेली नाही. समाजाने, संस्कृतीने, परंपरेने तिला शिकवणच तशी दिलीय की, स्वत:च्या कार्यक्षेत्रांचं बंधन ती स्वत:हूनच घालून घेतेय. आर्थिकस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य म्हणजे काय, याचा गंधही नाही कित्येकींना. ‘नवरा हवे तेव्हा शॉपिंगला पैसे देतो. थोडी लाडीगोडी लावली की काम होतं. आम्हाला कश्शाची कमी नाही’ आर्थिकस्वातंत्र्यावरच्या गप्पांमध्ये एका उच्चशिक्षित उच्चभ्रू बाईने केलेली ही आर्थिकस्वातंत्र्याची व्याख्या अगदी काल उच्चारलेली ऐकली.

आपल्यावर अन्याय होतोय, त्याविरुद्ध बोललं पाहिजे. आपल्याला समानतेने वागवलं जात नाहीये, आपल्याला डावललं जातंय.. याची जाणीव होणं म्हणजे स्वातंत्र्याकडे जाणारं पहिलं पाऊल असतं, असं म्हणतात. स्वातंत्र्य हेच समानतेच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. वेगवेगळ्या स्तरावरचं स्वातंत्र्य, साक्षेपीस्वातंत्र्य, सापेक्ष स्वातंत्र्य हे सगळं गृहीत धरलं तरीही आजच्या कित्येक स्त्रियांनी हे पहिलं पाऊलदेखील टाकलेलं नाहीये, हे सत्य आहे. या सगळ्याच्या जाणीव-जागृतीसाठी तरी असा एक महिला दिन कामी येतोय का, हे बघायला हवं. तेवढी जाणीव देणं, स्त्री म्हणून त्या सगळ्यांच्या स्वातंत्र्यासाठी एकत्र असणं हाच तर महिला दिनाचा उद्देश आहे. साडी, पाणीपुरी, मिठाई, पार्टी या सगळ्यांमधून तो साध्य होतोय. इव्हेंटमधून किमान त्या दिवसाचं अस्तित्व समजात सर्वदूर, आतापर्यंत खोलवर पोहोचत असेल तर त्याला नावं कशाला ठेवायची? थोडक्यात महिला दिन ‘साजरा’ होतोय असंच म्हणायचं. महिला दिनाची गरज उरणार नाही, तो खरा साजरा करण्याचा दिवस हे मात्र लक्षात ठेवायला हवं.
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter –  aru001