बॉबकट केलेली, जीन्स, टी शर्ट घालणारी स्त्री म्हणजे मॉडर्न आणि केसांची लांब वेणी, पंजाबी ड्रेस किंवा साडी म्हणजे पारंपरिक, टिपिकल?

कॉलेजमध्ये असताना कट्टय़ावरचा आवडता उद्योग असायचा- प्रत्येक जाणाऱ्या-येणाऱ्या अनोळखी मुला-मुलीकडे बघून त्यांच्याबद्दल कॉमेंट्स करणं. कॉमेंट्स म्हणजे त्या व्यक्तीबद्दल मत आपसात व्यक्त करायचं. त्याला किंवा तिला एखादं नाव द्यायचं (खरं तर नावं ठेवायची.), उपमा द्यायची. त्याबाबत ग्रुपमध्ये एकमत झालं तर ठीकच, नाही तर त्यावरून वादावादी.. चर्चा म्हणा हवं तर! म्हणजे ती व्यक्ती खरंच आपण अंदाज बांधला तशीच आहे की नाही हे बघण्याची पैजही लागायची कधी. अर्थात हा मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमधला आपसात चालणारा ‘टाइमपास’ असायचा. या गप्पा आपल्या आपल्यात समोरच्याला कळणार नाही, अशा बेतात असायच्या. थोडक्यात आम्ही समोरच्या व्यक्तीला त्याच्या/ तिच्या दिसण्यावरून ताडायचो, जोखायचो. बहुतेक वेळा त्या व्यक्तीकडे बघून तिच्या स्वभावाचा, पाश्र्वभूमीचा अंदाज बांधताना ग्रुपमध्ये एकमत व्हायचं. कारण काही साचेबद्ध ठोकताळे वापरले तर हा अंदाज लावणं अवघड नसतंच कधी, पण अशा कट्टय़ावर ताडलेल्या काही जणांशी नंतर बऱ्यापैकी ओळख झाली की उमजायचं, आमच्या सगळ्यांचं एकमत झालेलं असलं तरी तो अंदाज चुकीचा होता.

एकदा एक मुलगी कॉलेजच्या गेटवर अवतरली. कॉलेजचं वर्ष नव्यानेच सुरू झालेलं, त्यामुळे आमच्या कट्टा अवलोकनार्थ अनेक नमुने येत होते. ही मुलगी त्यातलीच. तर ही आमच्यासमोरून गेली, तेव्हाच आपसात कॉमेंट्स सुरू झाल्या. त्या वेळी फॅशनमध्ये होते तसे कपडे काही तिच्या अंगावर नव्हते. त्याऐवजी साधेसेच पण स्वच्छ कपडे होते. नीटनेटकी वेणी.. घट्ट बांधलेली, पायात साध्या चपला आणि पर्स वगैरे न घेता दोन वह्य़ा आणि एक पुस्तक हातातच घेऊन दुपट्टा सांभाळत चाललेली ही मुलगी. तिच्याकडे बघून एकजात सगळ्यांनी तिला नाव दिलं- गावरान गंगू. कारण अर्थातच सरळ. तिच्याकडे बघून तिला शहरी फॅशनचा गंध अजून चढलेला नाही हे उघड दिसत होतं. आमच्या अंदाजानुसार ‘गावरान गंगू’ प्रकारातल्या मुली फारशा कुणामध्ये मिसळत नाहीत. कशीबशी तीन र्वष पूर्ण करतात, आपल्यासारखीच दुसरी गंगू मिळाली तर तिच्यासोबत कोपऱ्यात बसून डबा खातात. लायब्ररीत जाऊन अभ्यास करतात आणि यातल्या अनेक जणी मध्येच कॉलेज शिक्षण सोडून लग्नपंथाला लागतात; पण ही ‘गंगू’ ऊर्फ अर्चना वेगळी निघाली खरी. चार महिन्यांत अर्चनाच्या हुशारीची आणि मैत्रीपूर्ण स्वभावाची चुणूक साऱ्या वर्गाला दिसली. कोकणातून आलेली अर्चना कमालीची गप्पिष्ट आणि आमची सगळ्यांची दांडी उडवणाऱ्या गणितात पारंगत. आमच्या ग्रुपची मेंबरही झाली यथावकाश ती आणि आमच्याबरोबर कट्टय़ावर तसे ‘अंदाज बांधायला’ही (अर्थात टाइमपास करायला किंवा टप्पे टाकायला) बसू लागली; पण तिची ती तेल लावून घट्ट बांधलेली वेणी, चपला आणि राहणीमान तिने सोडलं नाही. ती गावातून आली होती हे खरं, पण आमच्या मनातील ‘गावरान गंगू’च्या प्रतिमेला तिने जोरदार धक्का दिला होता. तिच्याकडे बघून अंदाज व्यक्त केला होता त्यापेक्षा तिच्या क्षमता, विचारसरणी आणि तिचा दृष्टिकोन खूपच वेगळा होता. आमच्या शहरी मानसिकतेतून आलेल्या ‘गावरान गंगू’च्या व्याख्येला तिने बदलायला लावलं खरं. अर्चनामुळे मनातला एक ‘स्टीरीओटाइप’ पुसला गेला.

एखाद्याच्या केवळ दिसण्याकडे, राहणीमानाकडे बघून बांधलेले ठोकताळे अनेक वेळा कसे चुकीचे ठरतात हे पुढे वयाने आणि विचाराने मोठं होताना हळूहळू लक्षात येत गेलं. विचारांबरोबर आलेल्या विवेकाने असे ठोकताळे बांधणं आणि त्याबरहुकूम दुसऱ्याची कुवत ठरवणं, त्याला गृहीत धरणं योग्य नाही, हेही शिकवलं. हे उमगताना लक्षात आलं, बाई म्हणून समाजात वावरताना किती तरी जण आपल्याला त्यांच्या नजरेने जोखत असतात. आपापल्या वकुबानुरूप आणि स्वभावानुसार त्यावरून अंदाजही बांधत असतात. एक वेळ मनातल्या मनात अंदाज बांधणं ठीक. तो मानवी स्वभाव आहे, असं गृहीत धरलं तरी आपल्या दिसण्यावरून आपली क्षमता ठरवणाऱ्यांचा वास्तविक खूप राग येतो; पण समाज म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनात विशेषत: स्त्रियांबद्दल, तिच्या दिसण्याबद्दलचे ‘स्टीरीओटाइप’ इतके घट्ट बसवले गेले आहेत की, त्यातून सहजासहजी बाहेर पडता येत नाही आणि पूर्वग्रह आणि पक्क्या समजुती यात अंतर उरतच नाही. पुरुषांपेक्षा स्त्रीच्या राहणीमानावरून, तिच्या पेहरावावरून असे स्टीरीओटिपिकल अंदाज बांधणं सोपं असतं. म्हणजे किती तरी साध्या गोष्टी खूप काही सांगून जातात बाईच्या बाबतीत. गळ्यात मंगळसूत्र नाही म्हणजे- अविवाहित दिसतेय, ‘अव्हेलेबल’ दिसतेय, स्वतंत्र दिसतेय.. इत्यादी. नीटनेटके कापलेले केस आहेत, ते बांधलेले नाहीत म्हणजे मॉडर्न दिसतेय. शिवाय ओठाला लिपस्टिक, हलकासा मेकअप, चांगल्यापैकी पर्स म्हणजे चांगलीच मॉडर्न आहे, शिकलेली दिसतेय, नटवी असेल, उच्छृंखल असेल, दिखाऊ  असेल, कामावर जाणारी दिसतेय, करिअरिस्ट दिसतेय, एवढा नटायला वेळ म्हणजे घरात काही काम नसेल वगैरे वगैरे.. हे आणि असे किती तरी.. अर्थातच हे पूर्वग्रह असतात. प्रथमदर्शनी मनात येणारे विचार असतात, पण या विचारांच्या आधारेच समोरच्या व्यक्तीची कार्यक्षमता जोखत राहिलं आणि त्यावरूनच तिची कुवत ठरवली, तर मात्र पंचाईत होते. ही पंचाईत आपल्या देशात तरी स्त्रीची जास्त होते. कारण तिच्या वागण्या- बोलण्यापेक्षा, तिच्या विचारांपेक्षा, तिच्या दिसण्या-राहण्याची चर्चा समाजात जास्त होते. स्त्री जर काम करणारी असेल तर कामाच्या ठिकाणीदेखील तिच्या दिसण्यावरून तिचं काम जोखलं जातं. दिसणं म्हणजे काय? तर बाईचे कपडे, तिचे केस, तिनं मेकअप केलेला आहे का नाही इत्यादी. केस कापलेली बाई आपल्याकडे सरसकट मॉडर्न ठरते; विचारांनी कितीही मागास असली तरी. आणि वेणीतली बाई पारंपरिक आणि पारंपरिक म्हणजे जुन्या विचारांची. साडी किंवा ठरावीक पद्धतीचा अघळ-पघळ पंजाबी ड्रेस घालणारी स्त्री ‘टिपिकल’, मग तिच्या विचारांना जाणून घेणंही महत्त्वाचं वाटत नाही आपल्याला. कारण ‘टिपिकल’ स्त्रीला वेगळे विचार असतातच कुठे? किती सोपं आहे ना बाईला जोखणं. अशा जोखण्याचा स्त्रीला त्रास होतो, तिच्या क्षमतांवर त्याचा परिणाम होतो आणि हे सगळं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे.

ही सगळी चर्चा आत्ता करायला निमित्त म्हणजे गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झालेला देशपातळीवर केल्या गेलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल. यातले काही निष्कर्ष मजेशीर आहेत; पण ते धक्कादायक नाहीत, तर डोळे उघडणारे आहेत. ६४ टक्के स्त्रियांना त्यांच्याकडे बघून केलेल्या अंदाजामुळे खऱ्या क्षमतेप्रमाणे काम करता येत नसल्याचं ही आकडेवारी सांगते. निहार नॅचरल्स या कंपनीसाठी ए.सी. निल्सन या संस्थेने हे सर्वेक्षण देशातल्या लहान-मोठय़ा शहरांमध्ये केलं. पुरुषांपेक्षा स्त्रीला तिच्या दिसण्यावरून, राहणीमानावरून जोखलं जातं आणि तिची काम करण्याची क्षमता तिच्या दिसण्यावरून ठरवली जाते, असं या सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून स्पष्ट दिसतं. देशातील ६४ टक्के पुरुष बाईचा हेअरकट बघून तिच्या कार्यक्षमतेचा अंदाज बांधतात. केस कापलेली स्त्री स्वतंत्रपणे राहण्यास जास्त सक्षम असते, असं ६० टक्के  पुरुषांना वाटतं. साडी नेसलेली स्त्री गाडीचं चाक बदलू शकणार नाही, असं ६९ टक्के पुरुषांना वाटतं. या सर्वेक्षणात जवळपास ७० टक्के पुरुषांनी हे मान्य केलं की, ते बाईच्या दिसण्यावरून तिच्या कार्यक्षमतेचा अंदाज बांधतात आणि स्त्रियांनी हे मान्य केलं की, या अंदाजांमुळे आणि पूर्वग्रहांमुळे त्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो. ही खरोखर गंभीर बाब आहे; पण त्यातून गंभीर आहे त्यापुढची आकडेवारी. यातले बहुतेक पूर्वग्रह घरातल्या किंवा जवळच्या व्यक्ती करून घेतात आणि राहणीमानावरून स्त्रीच्या कार्यक्षमतेचा अंदाज बांधणारे बहुतेक तिचे आप्त असतात, असं या सर्वेक्षणातल्या ६५ टक्के स्त्रियांनी सांगितलं. म्हणजे राहणीमानावरून आपल्या समाजाच्या मनात असलेले ठोकताळे इतके पक्के  आहेत की, आपल्या आसपास वावरणारी, आपल्या नात्यातली, आपण ओळखतो(?) अशा स्त्रीची कुवत आपण तिच्या दिसण्यावरून ठरवून टाकतो. गृहीत धरतो. बहुतेक वेळेला या गृहीत धरण्यामुळेच स्त्रियांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळत नाही. त्यांची कार्यक्षमता सिद्ध करण्याची वेळच येत नाही.

या सर्वेक्षणातून असंही दिसलं की, काम करणाऱ्या स्त्रीच्या बाबतीत असे दिसण्यावरून क्षमता ठरवण्याचे प्रसंग वारंवार येतात. नोकरीसाठी मुलाखतीला जाताना आवर्जून ‘पेहराव कसा असावा, काय घालावं, काय टाळावं’ वगैरे टिप्स दिल्या जातात. याविषयी घरातले, मित्रमैत्रिणी, शिक्षक तर सांगतातच, पण याविषयी खास क्लासेसही घेतले जातात, पुस्तकं लिहिली जातात. हे सगळं ठीक; कारण तुम्ही प्रेझेंटेबल असणं ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय स्त्रीला मात्र केवळ प्रेझेंटेबल असणं पुरत नाही. तिच्या पेहरावात आणि राहणीमानात परंपरा, संस्कृती, प्रथा, पद्धती, आर्थिक स्थिती आणि सवयी या सगळ्यांचं एक चमत्कारिक मिश्रण असतं. तिचे विचारही या पेहरावातून व्यक्त होतात, असं मानलं जातं. खरं तर तिच्याकडे बघणाऱ्या समाजाचे विचार तिच्या पेहरावापाशी थांबतात, हे जास्त खरं आहे. लहानपणापासून समाज म्हणून आपल्यावर होत असलेल्या ‘संस्कारां’चा तो एक भाग असतो. या सो कॉल्ड संस्कारांमधून साचेबद्ध ठोकताळे तयार होतात. या ठोकताळ्यांमध्ये प्रत्येक स्त्रीला बांधायचा प्रयत्न सुरू होतो. तिच्या क्षमतेचा, कुवतीचा विचारही या ठोकताळ्यांच्या मार्फत व्हायला लागतो आणि तिथेच तिच्या कार्यक्षमतेवर आपण बंधनं घालायला लागतो. स्त्रियांच्या दिसण्यावरून त्यांच्या कार्यक्षमतेविषयी साचेबद्ध ठोकताळ्यांच्या साहाय्याने विचार करणारे समाजातले फक्त पुरुष आहेत असं नाही. एक स्त्रीदेखील दुसऱ्या स्त्रीला अशाच ठोकताळ्यांमधून जोखत असते. त्याला कंटाळून काही जणी पेहरावातून, राहणीमानातून बंडखोरी दाखवतात. कम्फर्ट, सवय, मोकळेपणा यापेक्षा पेहरावाला जास्त महत्त्व नसावं खरं तर; पण ते अशा वेळी येतं आणि त्यातून त्या ‘बंडखोर’ काही तरी सांगायचा प्रयत्न करतात. कदाचित या अशा बंडखोरीमुळे समाजाच्या मनातले स्टीरीओटाइप पुसले जावेत, अशी त्यांची अपेक्षा असेल, पण हे स्टीरीओटाइप पुसले जाण्यासाठी एवढय़ा अवघडलेपणाची, या बंडखोरीची का गरज असावी, ते नैसर्गिकपणे का होऊ नये? तिच्या कार्यक्षमतेचा विचार तिच्या दिसण्यावरून करू नये, एवढा साधा विचार, विवेक, एवढी प्रगल्भता आपल्या समाजात येणार का? ती पाहताच बाला, समाज निष्कर्षांपर्यंत आला.. हे थांबणार कधी?
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter -aru001