रोज फिरायला येणारे शरदराव भेटले. वय वर्षे ७५. त्यांच्या कॉलनीतल्या एका कार्यक्रमाचे त्यांनी निमंत्रण दिले. दरवर्षीप्रमाणे ते ‘जागतिक वार्धक्य दिवस’ साजरा करणार होते. या वेळेस त्यांनी खेळांच्या स्पर्धा आणि गाण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. बक्षीस समारंभाला एका समाजसेवी कार्यकर्त्यांला बोलावून त्याचा सत्कार करायचा अशी त्यांची योजना होती. त्यांचा उत्साह पाहून मी थक्क झाले.

म्हातारपणाच्या सर्वसाधारण कल्पनेला छेद देणारे असे अनेक जण आज आपल्याला भेटतात. म्हातारपण म्हटले की विविध आजारपणे! उच्च रक्तदाब (बी. पी.), मधुमेह, संधिवात, अर्धागवायूचा झटका असे अनेक विकार.. म्हातारपणातही अनेक घटनांना सामोरे जावे लागते. मुख्य म्हणजे आपल्या नोकरीव्यवसायातून सेवानिवृत्त व्हावे लागते. त्याचबरोबर आजीआजोबा बनण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कधी कधी मुले दूर राहात असल्यामुळे वृद्ध पतीपत्नीला एकटेच राहावे लागते, तर दूर राहणाऱ्या मुलाबरोबर राहायचे तर म्हातारपणी नवीन ठिकाणी पुन: एकदा नव्याने आयुष्य सुरू करावे लागते. सगळ्यात कठीण म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूचे दु:ख सोसावे लागते. एकटेपणा, परावलंबित्व, आजारपणे यामुळे म्हातारपणातही ताणतणाव निर्माण होतो आणि कधी कधी निद्रानाश, निराशा, उदासीनता, अतिचिंता असे मानसिक विकार होऊ शकतात. ह्य पाश्र्वभूमीवर जेव्हा शरदरावांसारखे ‘तरुण’ वृद्ध भेटतात, तेव्हा त्यांच्या उत्साहाची आणि आनंदाची गुरुकिल्ली काय अशी उत्सुकता निर्माण होते.

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

शरदरावांना विचारले तर ते म्हणतात, ‘‘तरुणपणी वयात येताना जसे आपण आपल्या सौंदर्याची काळजी घेतो, तशीच काळजी आपल्या शारीरिक आणि मानसिक सौंदर्याची म्हातारपणीही घ्यावी लागते. त्याविषयी जागरूक असावे लागते.’’ विविध क्रीम, लोशन लावून, केसाला रंग लावूनच आपले सौंदर्य वाढत नाही; तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक ठरते. अतिस्थूलपणा असेल तर वजन आटोक्यात आणणे, ज्या योगे संधिवाताचा त्रास कमी होईल, डायबिटीस असेल तर योग्य पथ्यपाणी करणे, अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हातारपणी काही होणारच नाही असा फाजील विश्वास न बाळगता जी आजारपणे होऊ शकतात त्यांचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणे आणि काही आजारपण आले तर ते स्वीकारून त्यावर योग्य आणि लवकर उपाय करणे महत्त्वाचे.

तरुणपणी महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण योजना करतो. वृद्धापकाळ सुखात जाण्यासाठीही अशी योजना आवश्यक ठरते. आर्थिक परावलंबित्व खूप अवघड वाटते. आपली आजारपणे, औषधे यांचा खर्च मुलांना करावा लागला की आपण त्यांच्यावर ओझे बनलो आहोत असे वाटते आणि निराशा येते. आपल्या नियोजनातून आपणच आपली व्यवस्था करून ठेवलेली असली की मनात अपराधीपणाची भावना निर्माण होत नाही. आर्थिक नियोजनामुळे आपल्या आवडीच्या अनेक गोष्टी करता येतात. एक निवृत्त शिक्षिका दरवर्षी जगभरातल्या विविध सफरींना जातात. एकटय़ाच जातात, पण परतताना अनेक नवीन मित्रमैत्रिणी मिळवतात.

आपले हास्य, उत्साह यातून मनाचे सौंदर्य म्हणजेच मनातला आनंद प्रतीत होतो. निवृत्तीनंतर आपले छंद जोपासणारे अनेक जण असतात. कुणी नव्याने गाणे शिकू लागते तर कुणी चित्रकला व हस्तकला शिकू लागते. नवीन छंद जोपासताना पुन्हा एकदा मित्रमैत्रिणींचा गट तयार होतो. वयाचे बंधन नसलेली ही मैत्री आबालवृद्धांना एकत्र आणते आणि जगण्याचा उत्साह निर्माण करते.

म्हातारपणी रिकामपण खायला उठते असे म्हणतात. एक विशिष्ट दिनक्रम ठरवून घेतला तर असा रिकामा वेळच उरत नाही. वृद्धांवर नातवंडांना सांभाळणे, शाळेत नेआण करणे, घरातली कामे करणे अशा अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या असतातच. याशिवाय फिरणे, योग, व्यायाम अशा गोष्टींसाठी वेळ दिला तर आरोग्य टिकून राहते. दिवसाच्या शेवटी आपल्या व्यस्त दिनक्रमानेच मन समाधानी होते. एका कॉलोनीत राहणारे वृद्ध, एकत्र फिरायला जाणारे पेन्शनर, कट्टय़ावर बसून गप्पा मारणाऱ्या वृद्धांचा घोळका यातून एकमेकांची सुखदु:खे वाटली जातात, कठीण प्रसंगामध्ये एकमेकांना मानसिक आधारही मिळतो. सामूहिकतेतून नवीन नातेसंबंध निर्माण होतात.

मानसिक संघर्षांचे या काळातील प्रमुख कारण असते दोन पिढय़ांमधील वाढते अंतर, विचारांची भिन्नता. पुढच्या पिढीशी संवाद साधणे, त्यांचे विचार समजून घेणे, त्यांचा जीवनसंघर्ष जाणून घेणे, यातून एकमेकांची नाती अधिक पक्की होतात. ‘अमच्या वेळेस नव्हते बुवा असे काही!’, किंवा ‘आजकालच्या मंडळींना काही जबाबदाऱ्या नकोत’ अशी विधाने मग मागे पडतात. तरुण पिढीही आधारासाठी आधीच्या पिढीकडे येते.

आपल्या आयुष्यातील जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या, आता आपण समाजाचे काही देणे लागतो ही आयुष्यभर जपून ठेवलेली भावना पुन: एकदा जागृत होते आणि अनेक वयस्क मंडळी वेगवेगळी समाजोपयोगी कामे करताना दिसतात. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध संघटना आज कार्यरत आहेत. त्यांच्या तर्फेसुद्धा अनेक उपक्रम राबवले जातात. आपल्या स्वत:च्या राहत्या वस्तीपासून ते खेडय़ापाडय़ातल्या गरजूंपर्यंत अनेक ठिकाणी हे ज्येष्ठ नागरिक आपले योगदान पैसा, वेळ, आपले कौशल्य या स्वरूपात देताना दिसतात.

काही जण अधिक अंतर्मुख होतात आणि त्यांच्यातील आध्यात्मिक वृत्ती वाढते. पंढरपूरची वारी असेल, कीर्तनकाराचे प्रशिक्षण असेल, एखाद्या भजनी मंडळात सामील होणे असेल किंवा एकत्र जमून काही धार्मिक वाचनविवेचन असेल अशा वेगवेगळ्या पद्धतींनी अनेक जण मन:शांती मिळवतात.

लांबच्या प्रवासाला जायचे असले की जास्त तयारी करावी लागते. आता आयुर्मान वाढत चालले आहे. म्हणजेच लांबचा पल्ला गाठायची संधी अनेकांना मिळते. त्यासाठी तसेच नियोजन करणेही महत्त्वाचे ठरते. आपल्या वृद्धापकाळाची तयारी आत्तापासून केली तर स्वस्थ, समाधानी वार्धक्य सहज आपल्या हातात आहे हे लक्षात येईल. यशस्वी जीवनाचा शेवटचा टप्पा म्हणजे अशा प्रकारे यशस्वीपणे वार्धक्य व्यतीत करणे!