अध्यात्म- ‘अधि आत्म’- म्हणजे स्वतकडे पाहणे. अर्थातच स्वतकडे पाहण्यात आत्मपरीक्षण येते. त्यातूनच आपल्या जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ काय, याचा विचार सुरू होतो आणि मग एक ‘पूर्णत्वा’ची आस निर्माण होते. आपल्या दैनंदिन आयुष्यापेक्षा, त्यातल्या अनेक ऐहिक गोष्टींपेक्षा मोठे काहीतरी, परिपूर्ण असलेले, खोलवर अर्थ प्राप्त करून देणारे आयुष्यात काही आहे याची जाणीव निर्माण होते. आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे, त्याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय, कार्य काय, हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. ही प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता.
अध्यात्म आणि धर्म या गोष्टी समान नाहीत. अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव, अशी शक्ती किंवा असे ‘कोणीतरी’, असते हे आध्यात्मिक माणूस मानतो अथवा नाही मानत. आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. पण खूप वेळा धार्मिकता ही रूढी-परंपरा, परमेश्वरस्तुती, पूजा-अर्चा, प्रार्थना यातून व्यक्त होते. याउलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले तरी धार्मिकता, धर्मश्रद्धा आणि आध्यात्मिकता हातात हात घालून चालतात.
अध्यात्माकडे ओढा असलेले अनेकदा धार्मिकसुद्धा असतात. धार्मिक ग्रंथांचे वाचन, निरूपण करणे, त्यांच्या अर्थाविषयी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभाग घेणे, जप, नामस्मरण यातून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मनशक्ती वाढवणे अशा वेगवेगळ्या पद्धतींनी ‘स्व’चा शोध घेतला जातो.
ही सगळी चर्चा करण्याचे कारण असे की, आजच्या संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. मनात निर्माण होणाऱ्या चिंता, विषाद, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वाचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो. आत्तापर्यंतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून हे लक्षात आले आहे.
एखादे संकट आले की परिस्थितीला दोष देत बसले की मन निराश होते, पण ‘देवाला बहुधा या प्रसंगातून मला काही तरी शिकवायचे आहे’ किंवा ‘देव जे करतो ते भल्याकरताच’ असे म्हणणाऱ्या व्यक्तीला पटकन निराशा येत नाही. अध्यात्माकडे कल असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील मज्जातंतूंच्या जाळ्यात बदल होतात. अंत:स्राव करणाऱ्या संस्था आणि प्रतिकारशक्ती यांमध्ये अनुकूल बदल घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे रोगांपासून, शारीरिक आणि मानसिक संरक्षण होते. वर्धाक्यामध्ये येणाऱ्या विषादाच्या मनोविकाराचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सामना केला (ूस्र््रल्लॠ २३१ं३ीॠ८), तर उदासपणा कमी होतो. ‘माझ्या कुठल्या तरी चुकीची किंवा पापाची मला शिक्षा मिळते आहे’ किंवा ‘माझे निरोगी असणे माझ्या हातात नाही, तर काही दुष्ट शक्तींच्या हातात आहे’ असे मानणाऱ्याला जास्त निराश वाटते. याउलट आयुष्यात समाधानी असलेला आणि ‘आपल्या जीवनात काही शुद्ध हेतू आहे’ असे मानणारा कमी निराश होतो.
कॅन्सरसारख्या विकाराचा सामना करताना किंवा हृदयरोग स्वीकारताना किंवा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतून बरे होताना जी अति चिंता निर्माण होते ती नियंत्रणात आणण्यासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग होतो. आपत्तीनंतरच्या काळात आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांच्या उपदेश- प्रवचनांचा अतिशय सकारात्मक उपयोग होतो हे आपल्याकडच्या लातूरच्या, कच्छच्या भूकंपानंतर अनुभवायला आले आहे. या प्रक्रियेत सामूहिकतेची भावना आणि एकमेकांना मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. मानसिक विकारांची रुग्णाकडून माहिती घेताना त्याचा धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोन समजून घेणे दिवसेंदिवस महत्त्वाचे बनले आहे. मानसिक उपचारांमध्येदेखील आध्यात्मिकतेचा उपयोग केला जाऊ लागला आहे.
देऊळ, देवळातले वातावरण, भजन-कीर्तन, नामस्मरण, चर्च- मशिदीतील वातावरण या सगळ्याचा आध्यात्मिकता वाढण्यासाठी उपयोग होतो. योग, प्राणायाम आणि ध्यान केल्यामुळे चिंता, उदासपणा, हृदयरोग, अतिरक्तदाब अशा अनेक विकारांमध्ये उपयोग होतो. स्वतकडे ‘बघण्याची’ सवय होते. लक्ष केंद्रित करता येते. वर्तमानात जगण्याची शिकवण मिळते. अशा गोष्टींमुळे मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते.
आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते. नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कालाविष्कारांतूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. निसर्गाच्या सान्निध्यातही एक अवर्णनीय मानसिक शांती प्राप्त होते.
प्रार्थनेतही अंतर्मुख करण्याची, लीनता निर्माण करण्याची, विनम्र भाव निर्माण करण्याची शक्ती असते. मोठय़ाने उच्चारलेले मंत्रोच्चारण, एखादे ठेक्यात आणि तालात एकत्र म्हटलेले भजन, चर्चमध्ये गायली जाणारी ईशस्तुती, प्रवचन या सगळ्यातून अमाप मनशांती आणि समाधान मिळते.
आपल्याकडे संतसाहित्यही आध्यात्मिकतेतून मनाचा विचार मांडताना दिसते.
समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’च लिहिले. आपले दुख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वतपलीकडचा व्यापक विचार करण्याचा ते सल्ला देतात. म्हणून ते म्हणतात,
मना मानसी दुख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी
विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी
संत ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात,
‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले
अवघेची जाले देह ब्रह्म’ तेव्हा येणारी अनुभूती स्वतचा शोध घ्यायला लावणारी असते.
अशी अनुभूती मनाला उभारी देते, भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते आणि अर्थातच मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरते.
(समाप्त)
डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…