आशाताईंच्या सुमधूर गीतांचा नजराणा शेमारू एण्टरटेनमेन्टकडून प्रकाशित
गेली अनेक वर्षे रसिकांना असीम आनंद देणार्‍या आणि आपल्या सुरांच्या साहाय्याने जगभरातील रसिकमनावर अधिराज्य गाजवणारा आवाज म्हणजे ‘आशा भोसले’. ८ सप्टेंबरला ८२ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या आशाताईंना वाढदिवसाची खास भेट म्हणून शेमारू एण्टरटेनमेन्टने ‘१०१ आशा भोसले हिट्स’ डिव्हीडी बाजारात आणली आहे. युएस टूरला जाण्याआधी आशाताईंनी या डिव्हीडीचं अनावरण केलं. आशाताईंनी गायलेल्या प्रसिद्ध सोलो गीतांची मेजवानी या डिव्हीडीत असणार आहे.
या डिव्हीडीचं वैशिष्ट्य म्हणजे या डिव्हीडीतील प्रत्येक डिस्क ही थीमबेस असणार आहे. यातल्या पहिल्या डिस्कची थीम डान्स मस्ती असून यात आशा भोसले यांच्या मस्तीभऱ्या गीतांचा समावेश आहे. ज्यात ‘पिया तू अब तो आजा’, ‘जवानी जानेमन’, ते ‘घुंगरू तूट गये’, ‘डुबा डुबा नशे में’ अशा एकापेक्षा-एक सरस गीतांची सुरेल मेजवानीच आहे. दुसऱ्या डिस्कची थीम रोमँटिक/सेंटीमेंटल (भावस्पर्शी) गीतांची आहे. ज्यात ‘काली घटा छाये’, ‘देखने में भोला है’, ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जीना’, आणि ‘और इस दिल में’ सारख्या गीतांचा समावेश आहे. तिसऱ्या डिस्कची थीम विविध मूडच्या गाण्यांची आहे. ज्यात ‘क्यू मुझे इतनी ख़ुशी दे दी’, ‘जाऊँ तो कहाँ जाऊँ’, ‘कोमल हे कमजोर नही तू’ यांसारखी गीते आहेत.
अनोख्या संकल्पनेतून तयार झालेल्या या डिव्हीडीचे कौतुक खुद्द आशाताईंनी केलं असून ‘चरित्रहीन’, ‘बंदिनी’, ‘अनकही’ यातल्या गीतांमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. आशा भोसले यांची ही अविस्मरणीय गाणी प्रत्येक वयोगटातल्या श्रोत्यांना बघायला व ऐकायला नक्कीच आवडतील.
संगीत रसिकांनी हमखास संग्रही ठेवावी अशी ‘१०१ आशा भोसले हिट्स’ या ३ डिव्हीडी पॅकची किंमत २९९ रुपये आहे.