मराठी चित्रपटांमध्ये सध्या वेगवेगळे विषय हाताळले जात असतानाच चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठीही वेगवेगळे मार्ग अवलंबिले जात आहेत. २ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सलाम’ या चित्रपटासाठीही असाच एक वेगळा प्रयोग करण्यात येत आहे. या चित्रपटातील एक गाणे ३० गायकांनी गायले आहे.
‘आपले छोटे आयुष्य मोठे करणाऱ्या प्रत्येकाला सलाम’ ही मुख्य संकल्पना असलेल्या या चित्रपटातील ‘त्या दृष्टीला सलाम, त्या वृत्तीला सलाम, त्या जगण्याला सलाम’ हे गाणे दत्तप्रसाद रानडे, दीपिका जोग, संदीप उबाळे, अमेय जोग, अजित विसपुते, शंतनू खेर, मेधा परांजपे आदी ३० गायकांनी गायले आहे. हे गीत वैभव जोशी यांनी लिहिले असून संगीत नरेंद्र भिडे यांचे आहे.
चित्रपटाच्या प्रसिद्धीचे आणखी एक वैशिष्टय़  म्हणजे मराठीतील काही नामवंत कलाकारांनी आपल्या आयुष्यात घडलेले महत्त्वाचे प्रसंग, आयुष्यावर प्रभाव पडलेल्या व्यक्ती यांना ‘सलाम’ केला असून त्याचे व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत.
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी याचाही उपयोग केला जाणार आहे. यात मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, रिमा, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, प्रिया बापट, उमेश कामत आदींचा समावेश आहे. या मंडळींनी आपले आयुष्य घडविणाऱ्या व्यक्तिंना, प्रसंगांना यात ‘सलाम’ केला आहे. किरण यज्ञोपवित यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.