‘ह हा हि ही हु हू’च्या बाराखडीने प्रेक्षागृहात हास्याचे स्फोट घडविणाऱ्या प्रा. मधुकर तोरडमललिखित आणि दिग्दर्शित ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचा संयुक्त पाच हजारावा प्रयोग ५ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. रंगमंच-मुंबई, अमेय आणि सहरंग यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास अशोक सराफ-निवेदिता जोशी-सराफ आणि सचिन व सुप्रिया पिळगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आनंद सोहळ्यात या नाटकात पूर्वी काम केलेले कलाकार आणि अन्य मान्यवरांचाही सहभाग असेल. नाटकाच्या संयुक्त पाच हजाराव्या प्रयोगाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा तसेच स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी होणार असल्याचे दाते यांनी सांगितले. या वेळी प्रा. तोरडमल यांनी ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’च्या आठवणींना उजाळा दिला. प्रा. तोरडमल यांनी सांगितले, ‘‘प्रेमाच्या अभिव्यक्तीची पद्धत काळानुरूप बदलत गेली असली तरी आजही प्रत्येकजण कधी ना कधी प्रेमात पडतोच. वयोवृद्ध आणि तरुण या दोन्ही वयोगटांतील मंडळींचे हे नाटक आहे. सोहळ्याच्या सुरुवातीला ‘नटसम्राट’ या नाटकाची झलक सादर केली जाणार असून त्यानंतर सोळा कलाकारांच्या संचात ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’चा प्रयोग रंगणार आहे.