भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी त्यांच्या जीवनावरील आत्मचरित्रपटाच्या निर्मितीस प्राथमिक होकार दिल्याचे दिग्दर्शक शशांक उदपुरकर यांनी म्हटले आहे. या विषयी बोलताना शशांक म्हणाले, अण्णांच्या आयुष्यावर आधारित कथा लिहीण्यासाठी मला बराच कालावधी लागला. अंतिम टप्प्यावर पोहोचेपर्यंत मी सात कथा लिहिल्या. चळवळ आणि आंदोलनाचा ७५ वर्षांचा दीर्घ प्रवास असलेले अण्णांचे आयुष्य अडीच तासांच्या चित्रपटात बसवायचे होते. अनिरुद्ध गायकर निर्माता असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण राळेगणसिद्धी, मुंबई, दिल्ली, काश्मिर, लडाख, राजस्थान आणि अन्य ठिकाणी करण्यात येणार आहे. हा चित्रपट केवळ भारतीयांनाच प्रेरणा देणारा न ठरता जागतिक पातळीवर सर्वांना प्रेरणादायी ठरावा, अशी माझी इच्छा आहे. साधा, तत्वनिष्ठ, देशप्रेम आणि मानवतेने ओतप्रोत भरलेला, एका छोट्याशा खेडेगावातून आलेला हा माणूस कसा संपूर्ण देशाचा हिरो बनतो याची जाणिव त्यांना करून द्यायची असल्याचे शशांक म्हणाले. याआधी शशांकने शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांच्या जीवनावरचा आत्मचरित्रपट तयार केला आहे, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे.