हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगावर प्रतिभेची मोहोर उमटवलेल्या कलाकारांमधील प्रमुख नाव म्हणजे मोहम्मद रफी. गोड, पहाडी आवाजाच्या व ऋजू स्वभावाच्या या गायकाचे निधन होऊन तब्बल ३४ वर्षे उलटली असली तरी त्यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेमध्ये वाढच होताना दिसते. या महान गायकाला आदरांजली अर्पण करण्यासाठी ३० जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान ‘फिर रफी’ या सांगीतिक कार्यक्रमाचे पाच ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. लोकसत्ता प्रस्तुत करत असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती जीवनगाणी संस्थेने केली आहे.
वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी रफी गेले. ३१ जुलै हा त्यांचा स्मृतिदिन. या महान गायकाला आदरांजली वाहण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू असतात. मात्र गेली सहा वर्षे सुरू असलेला दिमाखदार व नेटक्या आयोजनाचा ‘फिर रफी’ हा कार्यक्रम आगळावेगळा ठरला आहे. मोहम्मद रफी यांच्या आवाजाची आठवण करून देणारा नव्या दमाचा गायक श्रीकांत नारायण या कार्यक्रमात रफी यांची सदाबहार ३० गाणी सादर करणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ३० जुलै रोजी विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात होईल. ३१ जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन, १ ऑगस्ट रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, २ ऑगस्ट रोजी मुलुंडमधील कालीदास नाटय़गृह व ३ ऑगस्ट रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़गृहात पुढील कार्यक्रम होतील. या कार्यक्रमातील युगुलगीतांत गायिका सरिता राजेश साथ देणार आहेत. वाद्यवृंद संयोजक आनंद सहस्रबुद्धे या कार्यक्रमातील संगीताची आघाडी सांभाळणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करतील.

दरवर्षी वाढता प्रतिसाद
जुन्या जाणत्या रसिकांचे रफीवरील प्रेम वादातीत आहे, पण नव्या पिढीलाही रफी समजावेत या हेतूने गेली सहा वर्षे सुरू असलेल्या ‘फिर रफी’ या कार्यक्रमाला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादातून रफी यांचे मोठेपणच अधोरेखित होत आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे अखेरच्या सत्रात आम्ही रसिकांच्या फर्माइशीनुसार गाणी सादर करतो, अशी माहिती ‘जीवनगाणी’चे प्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक प्रसाद महाडकर यांनी दिली.