बिबट्याच्या संचारामुळे आरे कॉलनीत दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, बिबट्याच्या दहशतीमुळे अकोले परिसरात संचारबंदी यासारख्या बातम्या आपण सगळेच वर्तमानपत्रांतून सतत वाचत असतो. वाढतं शहरीकरण, जंगलांची नासधूस अशी अनेक कारणे प्राणी- मनुष्य संघर्ष होण्यामागे दिली जातात. त्यावरील उपाय मात्र अभावानेच सुचविले जातात. शिवाय आपण जे ऐकतो-वाचतो, त्यातले किती खरं आणि किती खोटं, जंगलातून बिबटे खरंच गावांकडे आले आहेत का? माणसांवर होणाऱ्या रोजच्या हल्ल्यांमुळे बिबट्यांची शिकार करण्याशिवाय पर्याय नाही का? असे प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात. या प्रश्नांचा वेध घेत बिबट्यांचे जीवन अधिक चांगल्या रितीने समजून घेण्यासाठी रुपेरी पडद्यावर येऊ घातलाय सुजय डहाके दिग्दर्शित आजोबा हा बहुचर्चित मराठी चित्रपट. एल.व्हि.शिंदे ग्रुप व सुप्रिम मोशन पिक्चर्स प्रा. लि. ची निर्मिती असलेला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमाचे आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आजोबा या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला असून उर्मिला यांनी पूर्वा राव या वन्यजीव अभ्यासिकेची भूमिका वठविली आहे.
आजोबा ची कथा पुण्यात टाकळी-ढोकेश्वर येथे घडलेल्या एका सत्यघटनेवर बेतलेली आहे. कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला वनविभागाच्या कर्मचारयांनी तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढलं. विद्या अत्रे या वन्यजीव अभ्यासिकेने या बिबट्याच्या अंगावर एक चीप बसवून जीपीएस च्या सहाय्याने त्याचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न केला. त्या चीपवर नाव दिलं गेलं ते म्हणजे… आजोबा. पुढे माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं. पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत हा आजोबा निघाला मुंबईच्या दिशेने. माळशेज घाट ते मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उदयान हे अंतर या आजोबा ने जवळपास साडेतीन आठवड्यात १२० किलोमीटर चालत पार केलं. बिबट्या कुठल्या दिवशी कुठे गेला, हे त्याला बसवलेल्या चीपमुळे अगदी अचूक नोंद होत गेलं. आजोबाचा हा रोमांचित करणारा धाडसी प्रवास आणि जीपीएस तंत्रज्ञांचा आधार घेत वन्य अभ्यासिकेला बिबट्याचा पाठलाग करताना आलेला थ्रिलिंग अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येणार आहे. ही कथा गौरी बापट यांनी लिहिली आहे. वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाला साकेत कानेटकर यांनी संगीत दिले असून ध्वनी संयोजन निमिश छेडा, अविनाश सोनावणे यांनी केले आहे.
उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, हिंदी अभिनेता यशपाल शर्मा, ऋषिकेश जोशी, श्रीकांत यादव, ओम भुटकर, नेहा महाजन, गणेश मयेकर, शशांक शेंडे, अनिता दाते, चिन्मय कुलकर्णी, विराट मडके, अनुया काळसेकर यांच्या आजोबा मध्ये भूमिका आहेत. सुजय डहाके दिग्दर्शित आजोबा ९ मे ला राज्यभरातील विविध चित्रपटगृहातून आपल्या भेटीस येतोय.