बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमीर खानने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्यास नकार दिला. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी आमीर खानशी संपर्क साधला होता. परंतु, आमीरला या चित्रपटातील खलनायकाची भूमिका भावली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमीरला चित्रपटाची कथा ज्यावेळी ऐकविण्यात आली, तेव्हा ती त्याला आवडलीदेखील होती. परंतु, त्याने ‘धूम-३’ चित्रपटात काम करण्यास पसंती दिली. ‘व्योमकेश बक्षी’चा दिग्दर्शक दिबाकरच्या म्हणण्यानुसार चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याची आमीर खानशी बोलणीदेखील झाली होती, परंतु, ‘धूम-३’ चित्रपट पहिल्यापासूनच आमीरच्या शेड्यूलमध्ये होता. या कारणामुळेच आमीर खान ‘व्योमकेश बक्षी’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका स्वीकारू शकला नाही.