आगामी ‘दंगल’ या चित्रपटासाठी अभिनेता आमीर खानचा ‘त्या’ तीन मुलींचा शोध अखेर पूर्ण झाल्याचे समजते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘दंगल’ चित्रपटात आमीर खानच्या मुलींच्या भूमिका साकारण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन मुलींचा शोध पूर्ण झाला असून यासाठी तब्बल २१,००० मुलींची ऑडिशन घेण्यात आली होती. यातील एका मुलीची निवड याआधीच करण्यात आली होती. यानंतर उर्वरित दोन मुलींचाही शोध पूर्ण झाला आहे.
आमीरच्या मुलींची भूमिका साकारण्यासाठी २१००० मुलींमध्ये ‘दंगल’
फातिमा शेख आणि सन्या मल्होत्रा या नवोदित कलाकारांना ‘दंगल’ चित्रपटासाठी आमीरच्या मुलींची भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे. फातिमा मुंबईत राहणारी असून याआधी तिने काही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तर, सन्या ही मूळची दिल्लीची असून ती प्रतिभावान बॅले डान्सर आहे.
‘दंगल’ चित्रपटात आमीर खान भारतीय कुस्तीपटू ‘महावीर फोगट’ यांची भूमिका करत आहे. फोगट यांच्या तीन मुली गीता, बबिता आणि संगीता याही कुस्तीपटू असून ‘दंगल’मध्ये याच तीन मुलींच्या भूमिकेसाठी आमीर मुलींचा शोध घेत होता.