बॉलीवूड ‘खान’दानातील एक असलेला आमीर खान सध्या मुलींच्या शोधात आहे. आगामी ‘दंगल’ या चित्रपटात आमीर तीन मुलींच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. तीन मुलींच्या भूमिकेसाठी आमीर मुलींचा शोध घेत आहे. तीनपैकी एका मुलीची निवड त्याने केली असून अन्य दोन मुलींची निवड अद्याप झालेली नाही.

आमीर खान हा बॉलीवूडमध्ये ‘मि. परफेक्शनिस्ट’म्हणून ओळखला जातो. आपल्या चित्रपटासाठी किंवा त्यातील भूमिकेसाठी तो विशेष मेहनत घेत असतो. ती भूमिका अधिक वास्तववादी होण्यासाठी त्याचे सर्व प्रयत्न असतात. आजवरच्या त्याच्या चित्रपटातून प्रेक्षकांना हे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये सध्या आमीर खानच्या ‘दंगल’ व या चित्रपटात त्यांच्या असलेल्या तीन मुलींच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे. ‘दंगल’ या चित्रपटासाठी आमीर खानने आपले वजनही वाढविले आहे. या चित्रपटात आमीर खान कुस्तीपटूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘दंगल’ चित्रपटात आमीर खान भारतीय कुस्तीपटू ‘महावीर फोगट’ यांची भूमिका करत आहे. फोगट यांच्या तीन मुली गीता, बबिता आणि संगीता याही कुस्तीपटू असून ‘दंगल’मध्ये याच तीन मुलींच्या भूमिकेसाठी आमीर मुलींचा शोध घेत आहे.
आतापर्यंत आमीरने हजारो मुली नाकारल्या असून यातून फक्त एका मुलीची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. हरियाणा राज्यात आमीरने सुमारे १५ हजार मुलींची ‘ऑडिशन टेस्ट’ घेतली होती. या तीन मुलींपैकी आमीरला एक मुलगी मिळाली असून अन्य दोन मुलींचा शोध सुरू आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात कुस्तीपटू महावीर फोगट यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. आमीरच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातही फोगट आणि त्यांच्या तीन मुलींनी आपली उपस्थिती लावली होती. यापूर्वी आमीरने ‘मंगल पांडे’ चित्रपटासाठी मिशी वाढविली होती, तर ‘गजनी’साठी टक्कल केले होते. आता ‘दंगल’मधील कुस्तीपटूच्या भूमिकेसाठी वजन वाढविले आहे.