हिंदी चित्रपटांतील विनोदी चित्रपटांची यादी केली तर ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट पहिल्या दहांमध्ये येईल याबाबत काहीच शंका नाही. आमीर खान, सलमान खान, रविना, करिष्मा, शक्ती कपूर आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना तितकचं खळखळून हसवतो. २१ वर्षांपूर्वी केलेल्या या चित्रपटाची भुरळ आमीरवरही अद्याप कायम असल्याचे दिसते. कारण, नुकताचं आमीर मुंबईच्या एका स्टुडिओमध्ये दिसला. त्यावेळी त्याने शक्ती कपूरने भूमिका साकारलेल्या क्राइम मास्टर गोगोचा चेहरा असलेले टीशर्ट परिधान केले होते. त्यामुळे चित्रपटांतील इतर भूमिकांपेक्षा आमीरला क्राइम मास्टरने जास्तचं वेड लावलेले दिसते.
राजकुमार संतोषीचे दिग्दर्शन असलेल्या ‘अंदाज अपना अपना’चे काम तब्बल तीन वर्ष अडकले होते. चित्रपटातील कलाकार त्यांच्या इतर प्रोजेक्टमध्ये अडकल्यामुळे त्यांना या चित्रपटाला वेळ देता येत नव्हता. पण आमीरने या सर्वांना एकत्र आणले आणि अखेर १९९४मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘४०व्या फिल्मफेअर पुरस्कारा’त या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट (विनय कुमार सिन्हा), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (राजकुमार संतोषी), सर्वोत्कृष्ट अभिनेता (आमीर खान) आणि सर्वोत्कृष्ट विनोद कलाकार (शक्ती कपूर) या विभागांमध्ये नामांकने मिळाली होती.