‘मला राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी विचारणा झाली तर त्याबद्दल नक्कीच विचार करेन’, असं बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान म्हणाला. इंडिया टुडे ग्रुपने आयोजित केलेल्या ‘पंचायत आज तक’ या कार्यक्रमाला आमिर बोलत होता.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखाप्रमाणे तुला राज्यसभेचा सदस्य व्हायला आवडेल का? असे आमिरला विचारले असता तो म्हणाला की, सचिन, रेखा हे माझे मित्र आहेत त्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची नाही. पण, जर मला खासदार होण्याची संधी मिळाली तर त्यावेळी मी समाजासाठी किती चांगले योगदान देऊ शकतो यावरून खासदारकीचा विचार करेन.
हिंदी चित्रपटसृष्टीत महिलांच्या प्रतिमेबाबत त्याला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, हो मी मान्य करतो की आजवर महिलांची प्रतिमा दाखवताना हिंदी चित्रपट बेजबाबदार वागत आले आहेत.
‘तू चीज बडी है मस्त मस्त’ आणि ‘खंबे जैसी खडी है’ यांसारख्या गाण्यांमुळे देखील समाजात चुकीचा संदेश जातो. आपण नेहमी महिलांच्या भावनांचा आदर केला पाहिजे आणि यात माझा देखील समावेश आहे हे मी मान्य करतो. पण यापुढे माझ्याकडून असं होणार नाही याची मी काळजी घेईन. माझ्या मित्रांसोबत देखील या विषयावर चर्चा करेन आणि यापुढे महिलांबद्दल संवेदनशील राहिन.