सुपरस्टार आमीर खानचा भाऊ फैसल खान मोठ्या पडद्यावरील पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. ‘चिनार-दास्तान-ए-इश्क’ नावाचा त्याचा चित्रपट पूर्ण झाला असून, वितरक मिळताच चित्रपटाचे वितरण करण्यात येणार असल्याचे फैसलने म्हटले आहे. वितरकांना चित्रपट दाखवण्याचा विचार आम्ही करत आहोत. एखाद्या वितरकाकडून होकार मिळताच आम्ही लगेच हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या खास खेळादरम्यान फैसल म्हणाला. ‘बजरंगी भाईजान’च्या खास खेळासाठी आमीर खानसुद्धा उपस्थित होता. ‘झिल जलती है’ या कादंबरीवरून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेन्झु शहा यांनी केले आहे. चित्रपटात फैसल जमाल नावाच्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. जम्मू आणि काश्मिरमधील दहशतवाद आणि चकमक न दर्शविता सादर करण्यात येणारा गेल्या पंचवीस वर्षातील बॉलिवूडमधला हा पहिलाच चित्रपट असल्याचे चित्रपटकर्त्यांचे म्हणणे आहे. या आधी हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. सध्या आपले सर्व लक्ष अभिनयावर केंद्रित असल्याचे सांगत, देवाच्या कृपेने चित्रपट यशस्वी झाल्यास काही वर्षांसाठी आपण अभिनयावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे फैसल म्हणाला. भविष्यात आपल्याला दिग्दर्शन क्षेत्रात हात आजमावून पाहायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त करत त्याने चाहत्यांकडून शुभचिंतनाची कामना केली.