क्रिकेट आणि फुटबॉल यांना असलेल्या ‘ग्लॅमर’च्या वलयामुळे या खेळांच्या ‘लीग’ स्पर्धामध्ये शाहरूख खानपासून सलमान खान पर्यंतच्या अनेक बॉलीवुड तारेतारकांनी संघखरेदी केली आहे. परंतु ‘बिग बी’ पुत्र अभिषेक बच्चनने मात्र प्रचलित वाटांऐवजी कबड्डीची वेगळी वाट निवडली आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या ‘प्रो-कबड्डी’ लीग स्पध्रेसाठी त्याने जयपूर हा संघ खरेदी केल्याची नुकतीच घोषणा केली. जो खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडतो आहे, त्या खेळात अभिषेक करत असलेली आर्थिक गुंतवणूक कितपत फायद्याची अशी चर्चा सुरू आहे. मात्र, देशातील युवकांमध्ये कबड्डीची ‘धूम’ निर्माण करण्याच्या ध्येयानेच या मैदानात झेपावल्याचे अभिषेकचे म्हणणे आहे.
‘प्रो-कबड्डी’ संदर्भातील अर्थकारण मांडताना अभिषकने सांगितले की, ‘‘आम्ही चित्रपट बनवतो. वितरक ते सिनेमागृहात प्रदर्शित करतात, मग प्रेक्षक तो पाहतात आणि उत्पन्न मिळते. ही ‘व्यावसायिक कला’ आहे. याच अर्थकारणाचा आपण खेळाच्या बाबतीत विचार करू. ‘प्रो-कबड्डी’साठी आम्ही विचारपूर्वक वाटचाल करतो आहोत. ‘स्टार-स्पोर्ट्स’शी आमचा दहा वर्षांचा करार आहे. सुरुवातीची काही वष्रे खेळाचा प्रसार करण्यात आणि स्थिरावण्यातच जातील. एका रात्रीत यश मिळणार नाही, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. परंतु आम्हाला मेहनतीने हा खेळ रुजवायचा आहे आणि दोन-तीन वर्षांत तिला यशस्वी स्पर्धा म्हणून सिद्ध करायचे आहे.’’
आयपीएलसारख्या स्पध्रेतील लिलावात खेळाडूंना कोटय़वधी रुपयांचे भाव लागताना दिसतात. ‘प्रो-कबड्डी’चा लिलाव जून महिन्यात होणार आहे. कबड्डी खेळाडूला कितपत आर्थिक फायदा होईल, याविषयी एक संघमालक म्हणून अभिषेक यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘‘कबड्डीपटूची क्रिकेटपटूशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. कारण दोन्ही खेळांच्या लीगचे अर्थकारण वेगळे आहे. क्रिकेटमध्ये सध्या कायमस्वरूपी आर्थिक स्त्रोत सुरू आहे, ते चित्र कबड्डीत दिसत नाही. युवराज सिंगला यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये १४ कोटी रुपयांचा भाव मिळाला. तेवढा भाव कबड्डीपटूला मिळेल का, या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. परंतु आम्ही त्यांना न्याय मिळेल इतका भाव नक्की देऊ. पण मी आशावादी आहे.’’    

विषय चांगला असेल तर चित्रपट चालतात, हेच सूत्र मला महत्त्वाचे वाटते. कबड्डीला चार हजार वर्षांचा इतिहास गाठीशी आहे. आम्ही हा खेळ अत्याधुनिक मनोरंजनात्मक पद्धतीने लोकांसमोर सादर करणार आहोत. युवकांमध्ये हा खेळ लोकप्रिय करायचा आहे. अभिषेक बच्चन</strong>