अक्षय कुमारचा चित्रपट म्हटला  की जी अपेक्षा सर्वसामान्य प्रेक्षकाला असते, त्याच्यापेक्षाही वाईट आणि भडक रंगांचा, बाष्कळ विनोदांनी भरलेला खिलाडी मालिकेतला हा चित्रपट आहे. दैनंदिन जगण्याच्या ताणातून दोन घटका करमणूक प्रेक्षकांना देणे हाच अक्षयकुमारच्या चित्रपटाचा हेतू असतो. मात्र या हेतूलाच हरताळ फासून बनविलेला हा चित्रपट आहे. विनोदी हाणामारीपट प्रकारचा चित्रपट दाखवायचा असल्यामुळे अतिरंजित भंपक आणि भडकपणा हा या चित्रपटाचा अपरिहार्य भाग ठरलेला दिसतो.
बिनकामाचा म्हणून शिक्का बसलेला मनसुख आपल्या वडिलांच्या विवाह जुळवून देण्याच्या व्यवसायात असतो, परंतु वडील त्याला घराबाहेर काढतात. मग तो आता आपणही विवाह जुळवून देण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवितो. त्यात त्याला बहात्तर सिंग (अक्षय कुमार) हा पंजाबच्या सिंग कुटुंबातील तरुण. सत्तर सिंग (राज बब्बर), एकाहत्तर सिंग (मुकेश ऋषी) अशा सिंग कुटुंबाचा पिढीजात उद्योग म्हणजे बनावट पोलीस बनून तस्करी पकडून द्यायची आणि पोलिसांना मदत केली म्हणून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. बहात्तर सिंग आपल्या हाणामारीच्या कौशल्यावर या कामात माहीर आहे. त्यात त्याचा मित्र जीवनलाल प्राणलाल डिकॉस्टा (संजय मिश्रा) मदत करतो. तात्या तुकाराम तेंडुलकर अर्थात टीटी (मिथुन चक्रवर्ती) या गुंडाची मस्तवाल कन्या इंदू (असीन) हिचा विवाह तो बहात्तर सिंगशी जुळवून देतो. दोन्ही कुटुंब गुंड प्रवृत्तीची असूनही पोलीस असल्याचे भासवतात आणि गोंधळ उडतो.
‘मॅड कॉमेडी’पट म्हटले की सगळे काही अतिरंजित करायचे असते, असे दिग्दर्शकाला वाटत असावे. ‘बलमा’ या एका गाण्यावर चित्रपटगृहात प्रेक्षक खिळून राहतो. हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकाचे सरासरी वय सात ते बारा असते असे पूर्वी म्हटले जायचे. अजूनही हिंदी चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शक-लेखकांनी प्रेक्षकाचे वय तेच गृहीत धरले आहे हे चित्रपट पाहताना जाणवते. शीर्षकामध्ये ‘७८६’ म्हटलेय त्याचा संबंध फक्त बहात्तर सिंगच्या हातावर ‘७८६’चा आकार आहे एवढाच आहे.
मुकेश ऋषी, राज बब्बर यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते हास्यास्पद ठरेल याची ग्वाही हा चित्रपट देतो हे नक्की. ‘आता माझी सटकली’ असे म्हणत मराठी तरुणी साकारण्याचा प्रयत्न असीनने केला असला तरी मुळात चित्रपटाचा भर अतिरंजित करण्यावर असल्यामुळे असीनने मराठी तरुणीची व्यक्तिरेखा साकारली असे म्हणण्यासारखे काहीच नाही.
खिलाडी ७८६
निर्माते – ट्विंकल खन्ना, हिमेश रेशमिया, सुनील लुल्ला
दिग्दर्शक – आशीष आर मोहन
कथा, संगीत – हिमेश रेशमिया
कलावंत – हिमेश रेशमिया, अक्षय कुमार, परेश रावल, असीन थोटुकमल, राज बब्बर, मुकेश ऋषी, मिथुन चक्रवर्ती, राहुल सिंग, संजय मिश्रा, राजेश खत्तर, भारती सिंग, जॉनी लिव्हर, गुरप्रीत घुग्गी व अन्य.