आजूबाजूला सत्ताकारण आणि समाजकारण ढवळून निघत असताना चेहऱ्याला रंग लावून कॅमेऱ्यासमोर नेहमीप्रमाणे आपले संवाद म्हणायचे आणि चित्रीकरण संपल्यावर घरी निघून जायचं, असा नित्याचा कोरडाच कार्यक्रम करणे कलाकारांनाही भलतेच अवघड जात असावे. राज्यात निवडणुका होण्याआधीच इतक्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत की त्याच्या परिणामस्वरूप हाती काय लागणार आहे? सत्ताबदल, आघाडय़ांच्या समीकरणापासून मुक्ती की आणखीन वेगळे काही.. उत्तर काही तासांत आपल्यासमोर असणार आहे. त्यासाठी आजचा रविवारचा दिवस खास नोकरदार वर्गाने जसा दूरचित्रवाणी संचासमोर बसून काढायचा बेत केला आहे, तसंच कलाकारांनीही केलं आहे का? त्यांनाही निकालाची तेवढीच उत्सुकता आहे का? घडय़ाळाच्या काटय़ाबरोबर मतमोजणीचे आकडे बाहेर पडत राहतील, डोक्यातली विचारांची टिक टिक जेव्हा वाढत जाईल तेव्हा कलाकार मंडळी काय करणार आहेत..
मतदान आणि निकालाच्या तारखेची डायरीत नोंद
लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली की, मी माझ्या डायरीत पहिल्यांदा मतदान आणि rv02निकाल ज्या दिवशी असेल त्या दिवसांच्या तारखांची नोंद करून ठेवतो. म्हणजे हे दोन्ही दिवस मी आधीच पूर्णपणे मोकळे असतील, याची काळजी घेतो. दर पाच वर्षांतील हे दोनच दिवस असे असतात की मी ठाण मांडून दूरचित्रवाणी संचासमोर बसतो. राजकारण या विषयात ज्यांना रुची आहे, असे समान विचारांचे आम्ही सगळे मित्र रविवारी निकालाच्या दिवशी दूरचित्रवाणी संचासमोर बसणार आहोत. यात दिग्दर्शक सचिन कुंडलकर, कार्यकारी निर्माता निशित दधिच आदींचा समावेश आहे.निकाल सुरू असतानाच एकीकडे आमची निकालांवर चर्चा, मतप्रदर्शन करणे, निकालानंतरची होणारी सत्तास्थापनेची समीकरणे अशी सांगोपांग चर्चा क रणे सुरू असते.
अतुल कुलकर्णी

चित्रीकरणात असलो तरी बातम्यांमधून माहिती मिळवणार
सध्या चित्रीकरणामध्ये खूप व्यग्र असल्याने मला निवडणुकांच्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक बाबींची पुरेशी माहिती नाही; पण एकूणच भाजप आणि मोदींची जादू दिसून येते आहे. मला स्वत:ला एका पक्षाच्या हाती एकहाती सत्ता यावी असे वाटते. कारण गेल्या काही वर्षांमध्ये युतींमुळे एकूणच मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास फारसे rv03बदल झाल्याचे दिसून आले नाही. युतींमुळे ठाम निर्णय घेण्यात उशीर होतो, असे मला वाटते. आपण मेट्रो, मोनोच्या नावाने स्वत:ची पाठ थोपटून घेत असलो तरी आपल्या मूलभूत गरजा अजूनही पूर्ण झाल्या नसल्याचेच चित्र सध्या दिसते आहे आणि हे आपल्याला नाकारता येणार नाही. रविवारीही मी चित्रीकरणात गुंतलेलो असण्याची शक्यता आहे. पण तरीही दूरचित्रवाणीवरील बातम्यांच्या माध्यमातून निकालाबाबतची शक्य तितकी माहिती मिळवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
सुमित राघवन

निकालाची उत्सुकता असतेच
सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच मलाही निवडणूक निकालाची उत्सुकता असते. फक्त मी मतमोजणीच्या rv08दिवशी अगदी सकाळपासून दूरचित्रवाणी संचासमोर बसत नाही. साधारणपणे निकालाचे कल यायला सुरुवात झाली की मी निकाल पाहायला सुरुवात करतो.मतमोजणीचा जो काही निकाल लागेल त्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळावे, असे वाटते. एकहाती सत्ता मिळावी. म्हणजे मग सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार होणार नाही किंवा आयाराम-गयारामांची मदतही घ्यावी लागणार नाही. जे सरकार येईल, ते स्थिर असेल. या वेळी मतदानाच्या वेळी मतदान यंत्रावर ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता; पण हा पर्याय पुरेसा नाही. जर कोणीही योग्य उमेदवार नसेल तर मतदान न करणे, हे पवित्र कर्तव्य आहे, असे मला वाटते.
दिलीप प्रभावळकर

घरच्यांकडून मतमोजणीच्या घडामोडींची माहिती घेत राहणार  
या वेळच्या निवडणुकांच्या संदर्भात सांगायचं झाल्यास मी खूपच उत्सुक आहे. कारण पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणामध्ये मतदान केले जात आहे आणि त्यामुळे सत्तापरिवर्तनाची चिन्हेही दिसून येत आहेत. rv04गेली काही वर्षे राज्याची प्रगती कुठेतरी थांबल्यासारखी वाटत होती. पण या निवडणुकीनंतर चित्र पालटण्याची आशा आहे आणि म्हणूनच या वेळी मी निकाल ऐकण्यासाठी उत्सुक आहे. निवडणूक निकालांच्या बाबतीत कोणतीही माहिती मिळवण्यासाठी सकाळचं वर्तमानपत्र हे माझ्यासाठी खात्रीशीर साधन वाटत आले आहे आणि यंदाही मी त्याच्यावरच अवलंबून राहणार आहे. याशिवाय, रविवारी मी जरी कामात गुंतलेली असले तरी प्रत्येक महत्त्वाच्या बाबींसंबंधी मला वेळोवेळी सांगण्याबाबतच्या सूचनाही मी घरच्यांना दिल्या आहेत. हल्ली मोबाइलमुळे काही क्षणातच कुठूनही माहिती मिळवणे आपल्याला शक्य झाले आहे; पण निकालाच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरील बातम्यांवर मला फारसा विश्वास नसल्यामुळे त्यावर मी अवलंबून राहणार नाही.
निर्मिती सावंत

चित्रीकरणाला सुट्टी मिळाली तर संपूर्ण दिवस निकाल पाहण्यात घालवणार
मतदान आवर्जून केले पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे एकू णच लोकसंख्येचा विचार करता निवडणूक rv05प्रक्रियेचा मी छोटासा भाग असलो तरी त्याच्या परिणामांबाबत मी बराच उत्सुक आहे. फार पूर्वीपासून बातम्यांच्या बाबतीत वर्तमानपत्र हे मला खात्रीशीर माध्यम वाटत असले तरी तासातासाला घडणाऱ्या घटना आपल्यापर्यंत पोहोचवणारे दूरचित्रवाणीचे माध्यमही मला जवळचे वाटू लागले आहे. रविवारी आमच्या चित्रीकरणाला जर सुट्टी असेल तर संपूर्ण दिवस निवडणुकांचे निकाल पाहण्यात घालवण्याचा माझा विचार आहे. अन्यथा टीव्हीच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन.
संजय मोने

थेट निकालच जाणून घेणार
निवडणुकांच्या निकालाबाबत मला उत्सुकता आहेच. यंदाच्या निवडणूकोत्तर सर्वेक्षणांवरूनही नक्की चित्र rv06स्पष्ट होत नाही आहे. त्यामुळे मनात बऱ्याच शंका आहेत. सध्या मी चित्रीकरणामध्ये खूप व्यस्त आहे. त्यामुळे रात्री घरी आल्यावर दूरचित्रवाणीवरील बातम्यांच्या माध्यमातूनच दिवसभरातील घडामोडींची माहिती मिळवतो आहे. रविवारीसुद्धा चित्रीकरणासाठी मुंबईबाहेर असल्यामुळे मला दिवसभर माहिती मिळवणे कठीण आहे. तेव्हा निकालाच्या दिवशीही घरी परतल्यावरच थेट निकाल आणि मग त्यानंतरच्या घडामोडी पाहता येतील. मी घरी परतेपर्यंत निकालाचे अगदी स्पष्ट चित्र माझ्यासमोर असेल.
मिलिंद गुणाजी

दहावीच्या निकालांइतकीच उत्सुकता
कामानिमित्त कुठेही असलो तरी मतदानाला नेहमी उपस्थित राहणाऱ्यांपैकी मी एक आहे. आपल्याला दहावीच्या निकालाची जितकी उत्सुकता लागून राहिलेली असते, तितकीच उत्सुकता मला यंदाच्या rv07निवडणुकांच्या परिणामांची आहे. अमुक एक पक्ष सत्तेत यावा, असा आग्रह धरणारा मी नाही. पण जे सत्तेवर येतील त्यांनी लोकांची कामे केली पाहिजेत ही अपेक्षा आहे. गेली कित्येक वर्षे आपल्याला कितीतरी प्रश्न पडत आले आहेत. या निवडणुकीनंतर तरी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील, अशी आशा आहे. रविवारच्या निवडणुकांच्या परिणामांबद्दल बोलायचे झाल्यास चित्रीकरणामुळे निकालाच्या घडामोडींवर पूर्ण लक्ष ठेवणे मला शक्य होणार नाही; पण असे असले तरी दूरचित्रवाणी संच हल्ली सगळीकडे उपलब्ध असतो. त्यामुळे बातम्यांच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
कुशल बद्रिके

(संकलन – शेखर जोशी, मृणाल भगत)