दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधील काही लोकप्रिय ‘चेहरे’ सध्या मराठी रंगभूमीवर सुरू असलेल्या नाटकांमधून भूमिका करीत आहेत. मालिकांमधील या कलाकारांच्या लोकप्रियतेचा फायदा नाटकांना करून घेण्यासाठी याचा उपयोग होत आहे. या लोकप्रिय चेहऱ्यांमुळे नाटकाला चांगली गर्दी होत आहे.
रंगभूमीवर सध्या ज्या नाटकांचे बुकिंग चांगले आहे त्यात ‘गोष्ट तशी गमतीची’, आई तुला मी कुठे ठेवू’, ‘वाडा चिरेबंदी’, या नाटकांचा समावेश आहे. मुंबई आणि ठाण्याच्या नाटय़गृहातील बुकिंग क्लार्ककडूनही त्याला दुजोरा मिळालेला आहे. या नाटकातील एक समान धागा म्हणजे या नाटकात मालिकांमधील लोकप्रिय ‘चेहरे’च आहेत.
‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकात ‘होणार सून मी हय़ा घरची’ या लोकप्रिय मालिकेतील ‘श्री’ अर्थाच शशांक केतकर आहेच पण त्याच्याबरोबरच याच मालिकेत त्याची ‘छोटी आई’ साकारणाऱ्या लीना भागवतही आहेत. त्यामुळे सध्या हे नाटक चांगले चालले आहे. महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांचा मोठा प्रेक्षकवर्ग या नाटकाला मिळाला आहे. ‘आई तुला मी कुठे ठेवू’ या नाटकात ‘होणार सून मी हय़ा घरची’ मालिकेतील ‘मोठी आई’ अर्थातच ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी काम करीत आहेत.
‘वाडा चिरेबंदी’ मध्ये प्रसाद ओक आणि वैभव मांगले हे कलाकार असून हे नाटकही चांगले चालले आहे. शरद पोंक्षे यांच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग पुन्हा रंगभूमीवर सुरू झाले आहेत. शरद पोंक्षे यांची मुख्य भूमिका असलेले ‘त्या तिघांची गोष्ट’ हे नवे नाटक रंगभूमीवर सादर होत असून याचा पहिला प्रयोग २९ नोव्हेंबर रोजी आहे. ‘जस्ट हलकं फुलकं’ या नाटकात ‘चला हवा येऊ द्या’ या सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमातील भारत हरणखुरे व सागर कारंडे ही विनोदी अभिनेत्यांची लोकप्रिय जोडी आहे.
मालिकेतील लोकप्रिय चेहऱ्यांची अन्य नाटके
सुनील तावडे (बीपी) ऐश्वर्या नारकर (आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे) भूषण कडू (सर्किट हाऊस), चिन्मय मांडलेकर (मिस्टर अॅण्ड मिसेस)

कलाकारांचे ‘ग्लॅमर’
दूरचित्रवाहिनीच्या छोटय़ा पडद्यावर दिसणारे हे कलाकार प्रत्यक्षात कसे दिसतात, कसे काम करतात हे पाहण्यासाठी आणि नाटक संपल्यानंतर या कलाकारांना भेटता येत असल्याने या नाटकांना प्रेक्षकांची गर्दी होत आहे. ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘आई तुला मी कुठे ठेवू’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांना सध्या चांगले बुकिंग आहे. मराठी कलाकारांच्या ‘ग्लॅमर’चा फायदा नाटकांना होत आहे.
हरी पाटणकर
बुकिंग क्लार्क-शिवाजी मंदिर