मोहन सैगल यांच्या ‘सावन भादो’द्वारे नवीन निश्चल आणि रेखा यांच्यासोबत कारकीर्द सुरू करणारे अभिनेते रणजीत आता कारकीर्दिच्या एका वेगळ्याच टप्प्यावर येवून पोहोचले आहेत. सध्या ते कला-दिग्दर्शक देवदास भंडारे यांच्याकडे चित्रकलेचे धडे गिरवत आहे.
मोठ्या पडद्यावरील क्रूरकर्मा खलनायक म्हणून रणजीत विख्यात आहेत. ‘विश्वनाथ’, ‘लूटमार’, ‘छैला बाबू’, ‘व्हिक्टोरिया नं. २०३’ अशा किती तरी चित्रपटातून त्याने खलपुरूष साकारला. ‘कारनामा’, ‘गजब’ आणि ‘तमाशा’ अशा चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही रणजीत यांनी केले.
कला-दिग्दर्शक देवदास भंडारे हे सहायक म्हणून कार्यरत असताना रणजीतशी त्यांचा परिचय झाला आणि आज ते रणजीत यांना चित्रकला शिकवत आहेत. रणजीत त्यामध्ये विशेष रस घेत असल्याचे भंडारे सांगतात. ‘रेवती’ या चित्रपटापासून देवदास भंडारे कला-दिग्दर्शनात उतरले. ‘अंगरक्षक’, ‘तप्तपदी’ इत्यादी मराठी आणि हिंदी चित्रपटांचे कला-दिग्दर्शन करणारे देवदास भंडारे सध्या ‘कंगना’ या राजस्थानी चित्रपटाचे कला-दिग्दर्शन करत आहेत. काही टेलिफिल्म, दूरदर्शन मालिका याचेही त्यानी कला-दिग्दर्शन केले आहे.