पावसाळ्याची सर्वच रूपं सर्वाना आवडतात. विशेषत: मालिकांमध्ये पावसाळा म्हणजे ‘आशयपूर्ण’ करण्याची मोठी संधीच मालिकाकर्त्यांना उपलब्ध होते. प्रणयदृश्यांपासून दुराव्यांच्या दुश्यांपर्यंत विविध प्रकारच्या सीन्ससाठी पाऊस ही उत्तम संधी असते. पण या पावसात चित्रीकरण करणं मात्र सोप्पं मुळीच नसतं. विशेषत: शुक्रवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने ही बाब पुन्हा समोर आली आहे. भर पावसात मुंबई वाहतूक कोंडीतून मार्ग काढत कसंबसं फिल्मसिटी किंवा मढमधील सेट गाठायचा, तेथे साचलेल्या चिखलातून कपडे, मेकअप सांभाळत चित्रीकरण करायचं हे सर्व करताना कलाकारांच्या नाकीनऊ येतात. पण पडद्यावर पावसाचे दृश्य साकारताना या सर्वाचा कुठलाही लवलेश प्रेक्षकांना अजिबात जाणवणार नाही, याची काळजीही त्यांना घ्यावी लागते. अर्थात, सोबत सेटवर खवय्यांच्या पाटर्य़ा चालू असतात. समोसे, कचोरी, भज्या, बटाटेवडे आणि सोबत गरमागरम चहा यांचं सेटवर येणं-जाणं ठरलेलं असतं. त्यामुळे या पावसाळ्यात कलाकारांची उडालेली तारांबळ आणि त्यांच्या गमतीजमती त्यांच्याच अनुभवातून..

Untitled-1नव्या गाडीला निमित्त पावसाचे
मुंबईचा पावसाळा हा माझ्या कारकीर्दीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या खूप आठवणी माझ्याकडे आहेत. वीस वर्षांपूर्वी कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पावसात भिजत चित्रीकरणासाठी जायचो. त्यानंतर गरज म्हणून रेनकोट घेतला. त्यानंतर केवळ पावसाळ्यात चित्रीकरणासाठी उशीर होऊ नये म्हणून बाईक विकत घेतली. माझी पहिली गाडी घेण्याचं निमित्त पण पाऊसच ठरलं. नंतर पावसाचाच विचार करून मोठी गाडी घेतली. त्यामुळे माझ्या गाडी घेण्यामागे ‘मुंबईचा पाऊस’ हे एकमेव कारण आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही. पावसाळ्यात मालिकांचं चित्रीकरण करणं अजिबात सोप्पं नसतं. बाहेर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वजण वेळेवर सेटवर येतील याची शाश्वती नसते. कित्येकदा घरातून बाहेर पडणं पण कठीण जातं. त्यामुळे चित्रीकरणाचा खोळंबा होतो. सेटवर एकदा आत गेलात की तुम्हाला बाहेरच्या परिस्थितीचा काहीच अंदाज येत नाही. मध्येच घरच्यांचा फोन आला की चर्चाना सुरुवात होते.  पुर्वी जुहू भागामध्ये चित्रीकरणाला जाताना आम्ही कमरेइतक्या पाण्यातून प्रवास करायचो. पण आता हे सेट मीरा रोड भागात स्थलांतरित झाल्यामुळे तेथे पाणी ही समस्या नसते.
अशोक लोखंडे , अभिनेता, दिया और बाती-स्टार प्लस

Untitled-1प्रवासासाठी वेगळा एक तास
पावसाळ्यात चित्रीकरणासाठी जायचं म्हणजे केवळ प्रवासासाठी एक तास वेगळा काढणं आलं. त्यानुसारच मी दिवसाची आखणी करते. खरं तर पावसाळा माझा आवडता मोसम आहे. या दिवसांमध्ये मी परत कॉलेजच्या आठवणींमध्ये पोहचते. पण चित्रीकरणाच्या वेळी मात्र हा पाऊस त्रास देतो. या दिवसांमध्ये शक्यतो इनडोअर चित्रीकरण होत असतं. त्यातही टपावर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाने चित्रीकरणामध्ये अडथळा येतो. पण त्याला पर्याय नसतो. सेटवर मात्र या दिवसांमध्ये आमची पार्टी चालू असते. रेशम टिपणीस मालिकेत माझ्या सासूची भूमिका करते आहे. आम्हाला दोघींना भिजायला खूप आवडतं. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात सेटवर सर्वाना घेऊन पावसात भिजायचं, असा संकल्प आम्ही केला आहे.
मुग्धा चाफेकर , सतरंगी ससुराल, झी टीव्ही

Untitled-1वातावरण आवडतं, पण..
मला पावसाळा ॠतू खूप आवडतो. त्यामुळे पावसाळ्यात काम करताना मला अजून मजा येते. पण गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिगमुळे आपल्याला ॠतूंचा अंदाजच येत नाही. कधी ऊन असतं तर कधी पाऊस पडतो. त्यामुळे आपल्याला तयारीलाही वेळ मिळत नाही आणि मग शुक्रवारसारखी परिस्थिती होते. मी विलेपाल्र्याला राहतो आणि सेट जोगेश्वरीला आहे. एरवी हे अंतर पार करायला मला पंधरा मिनिटं लागतात. पण शुक्रवारी दीड तास लागला. अध्र्या पाण्यात गाडी ढकलत मी सेटवर आलो. रस्त्यामधील खड्डय़ांचा यावेळी अंदाजच येत नाही. त्यामुळे पंचाईत होते. पण सेटवर हाफ पँटवर भिजून आलेली मंडळी पाहून मजा येते. आपण भिजलोय पण तरीही नाइलाजाने काम करावं लागणार, अशी भावना सर्वाच्या मनात असते. पाऊस दिसेल पण भिजणार नाही, असे स्पॉट आम्ही सेटवर शोधतो आणि तिथे ठाण मांडून असतो. मग फोटो, सेल्फी काढणं सुरू असतं. त्यातही मी हमखास आघाडीवर असतो.
सुयश टिळक, का रे दुरावा, झी मराठी

Untitled-1सुट्टीची वाट पाहतो
मला खरं सांगायचं तर पावसाळा खूप आवडतो. पावसात खूप फिरायला आवडतं. पण पावसाळ्यात कामाला जाणं तितकंच नकोसं वाटतं. त्यामुळे कामावरून कधी सुट्टी मिळेल याची वाट पाहात असतो. रोज चित्रीकरणासाठी जाताना मढ ते जोगेश्वरी या प्रवासात जाणारा वेळ हा नकोसा वाटतो. पण मुळात पाऊस आवडत असल्याने काम करताना माझ्यात सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे मगरळ वाटत नाही. माझ्या पहिल्या मालिकेत मी आणि माझी बायको एकत्र काम करत होतो. त्यावेळी मला काही केल्या सुट्टी मिळत नव्हती. एकदा पावसामुळे आमचं चित्रीकरण रद्द केलं आणि आम्ही थेट बाईक काढून लोणावळ्याला गेलो होतो.
अक्षर कोठारी, कमला, कलर्स मराठी

Untitled-1सेटवर ड्रायर हवाच
पावसात चित्रीकरण करणं खूप आव्हानात्मक असतं. शुक्रवारी तर सकाळी मला अंधेरी-ओशीवरा ते साकीनाका हे अंतर गाठण्यासाठी तब्बल अडीच तास लागले. चिखल साचलेल्या सेटवर आम्ही महागडे कपडे घालून चित्रीकरण करत असतो. त्यामुळे त्यांच्यावर चिखलाचे डाग पडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. सध्या सुरू असलेल्या मालिकेमध्ये माझ्या संगीताचा भाग चित्रित होत आहे. त्यामध्ये मी महागडा लहेंगा घातला होता. पण सेटपासून मेकअप रूम काही अतंरावर आहे. ते पार करेपर्यंत लेहेंगा खराब होऊ नये म्हणून मेकअप रूममध्ये जीन्स घालून बाहेर पडायचं आणि सेटवर जाऊन लहेंगा घालायचा ही कसरत मला करावी लागते आहे. त्यामुळे आमचे ओले होणारे कपडे, केस सुकविण्यासाठी सेटवर एक ड्रायर हवाच असं आम्ही निर्मात्यांना बजावून सांगितलंय.
मृणाल ठाकूर, कुमकुमभाग्य, झी टीव्ही

Untitled-1टायर पंक्चर..
पावसाळा आणि चित्रीकरण याबद्दल बोलायचं तर शुक्रवारचा प्रसंग आठवल्याशिवाय राहणार नाही. नेहमीप्रमाणे भाईंदरहून गोरेगावला सेटवर जाण्यासाठी सकाळी ६ वाजता मी घरातून निघाले. बाहेर पाऊस होताच. त्याच वेळी माझ्या गाडीचे दोन टायर पंक्चर झाले. भल्या पहाटे रस्त्यावर कोणीच टायर दुरुस्त करणारा नव्हता. शेवटी कांदिवलीपर्यंत मी गाडी कशीबशी ढकलली.  मालिकेचा दिग्दर्शकसुद्धा प्रवासातच अध्र्या रस्त्यापर्यंत आला होता. तो आला आणि आम्ही गाडी दुरुस्त करून घेतली. त्यानंतर मी नऊला सेटवर पोहोचले. मुख्य चित्रीकरणाच्या वेळीसुद्धा आदल्या सीननुसार आज तुमच्या कपडय़ांचा अवतार सांभाळावा लागतो. आमचं चित्रीकरण फिल्मसिटीला सुरू आहे. या दिवसात इथे लोणावळ्यासारखं दृश्य असतं. त्यामुळे सेल्फी काढणं, फोटोसेशन करणं असे आमचे उद्योगही चालू असतात.
रुपाली भोसले, बडी दूर से आये है, सब टीव्ही