सुपरस्टार अमिताभ बच्चन छोटय़ा पडद्यावर उतरल्यापासून अवघ्या हिंदी चित्रपटसृष्टीची नजर मालिकानिर्मिती आणि एकूणच छोटय़ा पडद्यावरच्या उलाढालीवर पडली आहे. त्यामुळे एकेक करून सगळे मोठे तारे छोटय़ा पडद्यावर उतरत आहेत. अमिताभ, अनुपम खेर यांच्यानंतर आता एकेकाळी ‘फिअर फॅक्टर’सारख्या रिअ‍ॅलिटी शोचा सूत्रसंचालक म्हणून यशस्वी ठरलेल्या अक्षय कुमारनेही मालिका निर्मितीत उतरायचे ठरवले आहे. अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांच्या ‘ग्रेझिंग गोट प्रॉडक्शन’च्या बॅनरखाली नवी मालिका झी वाहिनीवर येऊ घातली आहे.
‘ग्रेझिंग गोट’ने हिंदीत ‘ओह माय गॉड’ आणि ‘फ गली’सारखे चित्रपट केले. या दोन्ही चित्रपटांबरोबरच प्रादेशिक चित्रपटनिर्मितीतही आघाडी घेतलेली असतानाच या दोघांनी मालिका निर्मितीत उतरायचे ठरवले आहे. ‘कलर्स’सारख्या वाहिनीचे नेतृत्व केलेल्या अश्विनीला छोटय़ा पडद्याचा चांगलाच अनुभव असल्याने मालिका निर्मितीचा निर्णय घेतला असला तरी पहिल्याच मालिकेसाठी त्यांनी ‘सागर पिक्चर्स’चे सहकार्य घेतले आहे.
अक्षयने मालिका निर्मितीतही वेगळेपणा आणताना सासू-सूनांना दूर ठेवले आहे. ‘ग्रेझिंग गोट’च्या पहिल्याचा मालिकेचे नाव ‘जमाई राजा’ असे आहे. स्वत: उत्तम हॉटेल व्यावसायिक असणारा मालिकेचा नायक सिद्धार्थ आपल्या पत्नीचे तिच्या आईशी असलेले तणावपूर्ण नाते पूर्ववत करण्याची मोहीम हाती घेतो, असे या मालिकेचे कथानक आहे.
‘झी’ वाहिनीवर ही मालिका येणार असून यात रवी दुबे आणि निया शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय, टेलिविश्वाची जुनी अभिनेत्री अंचित कौर या मालिकेच्या निमित्ताने सासूच्या भूमिकेत परतणार आहे. अपरा मेहता, देलनाझ पॉल आणि श्रुती उल्फत यांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिको आहेत.