बॉलीवूडचा ‘अॅक्शन स्टार’ अक्षय कुमारच्या दमदार सादरीकरणातून ‘वर्ल्ड कबड्डी लीग’ची सुरूवात होणार आहे. येत्या ९ ऑगस्ट पासून सुरू होणाऱया ‘वर्ल्ड कबड्डी लीग’च्या लंडनमध्ये होणाऱया उदघाटन सोहळ्यात अक्षय कुमार ‘पॉवरपॅक’ सादरीकरण करणार आहे.
मान्यतेचे सोपस्कार न करताच ‘वर्ल्ड कबड्डी लीग’ मैदानावर
विशेष म्हणजे, भारताबाहेर खेळविली जाणारी ‘वर्ल्ड कबड्डी लीग’ ही पहिली आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा ठरणार आहे. यामध्ये विजेतेपदासाठी आठ संघांमध्ये चुरस पहायला मिळेल. नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी अक्षय कुमार या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात आपल्या चित्रपटातील काही नेमक्या गाण्यांवर ठेका धरताना दिसेल. हे सादरीकरण पूर्णपणे कबड्डीच्या असंख्य चाहत्यांना समर्पित असल्याचे अक्षयने म्हटले आहे.
१० आंतरराष्ट्रीय संघ, ९४ सामने यांच्यासह चार खंडांतील सात देशांमध्ये ‘वर्ल्ड कबड्डी लीग’ ही सर्कल कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये अक्षय कुमार देखील ‘खालसा वॉरियर्स’ संघाचा संघमालक आहे. तसेच सोनाक्षी सिन्हा आणि यो यो हनी सिंग यांनीही संघ खरेदी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.