जुन्या चित्रपटाची पुनर्निर्मिती अर्थात रिमेक म्हणजे आजच्या पिढीसमोर तो जुना चित्रपट येणे आणि त्याच वेळी रसिकांच्या एका पिढीला मागील आठवणीत जाण्याची अर्थात फ्लॅशबॅकची संधी मिळणे. ‘अश्विन वर्दे प्रॉडक्शन्स’च्या ‘द शौकिन्स’च्या निमित्ताने बत्तीस वर्षापूर्वीचा बासू चटर्जींचा ‘शौकिन’ आठवायलाच हवा. अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘द शौकिन्स’ला मूळ चित्रपटाची कितपत सर येते अथवा नाही हे ७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट पाहिल्यावर समजेलच. बासुदांची हिरवट विनोदाची फोडणी असलेला ‘शौकिन’ (१९८२) खुमासदार, मार्मिक, मिश्किल आणि मजेदार होता.
‘रजनीगंधा’, ‘छोटीसी बात’, ‘नितचोर’, ‘दिल्लगी’, ‘चक्रव्यूह’ आणि ‘खट्टा मिठ्ठा’ अशा मध्यमवर्गीय स्वच्छ मनोरंजक चित्रपटांमुळे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचा चित्रपट खेळकर असणार असा विश्वास निर्माण झाला होता. अशातच ‘शौकिन’ आला आणि रसिकांना हलकी फुलकी धमाल मेजवानी मिळाली. त्यावेळी दक्षिण मुंबईतील सेन्ट्रल (आताचे सेंन्ट्रल प्लाझा) ‘शौकिन’चे मुख्य चित्रपटगृह होते. तेथेच त्याने शंभर दिवसाचे यश संपादले.
तीन हिरवट म्हतारे एका युवतीच्या सुखद सहवासाने सुखावतात. तिचा आपल्यालाच जास्त सहवास मिळावा म्हणून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून होणारी विनेद निर्मिती म्हणजे ‘शौकिन’. हा सगळा चित्रपट गोव्यात घडतो. त्यामुळे तिकडील मोकळे वातावरण चित्रपटाला पोषक ठरले. चित्रपटाचे मध्यवर्ती कथासूत्र हे असे… दादामुनी अशोक कुमार, ए. के. हंगल आणि उत्पल दत्त हे ते तरूण म्हातारे होते. तिघानीही विनोदाची वेळ उत्तम साधली. तर त्याना रति अग्निहोत्रीचा सहवास लाभतो. तिचे लोभस रूप तिघानाही वयाचा विसर होऊ देते. तिच्या प्रियकराच्या भूमिकेतील मिथुन चक्रवर्ती मात्र बाजूला पडतो.
आता ‘द शौकिन्स’मध्ये अनुपम खेर (केडी), पियूष मिश्रा (पिंकी) आणि अन्नू कपूर (लाली) असे तिघे इब्लिश म्हातारे असून लिसा हेडनने अहानाची भूमिका साकारली आहे. अक्षय कुमारने तिचा प्रयकर साकारला आहे. मूळ चित्रपटात कुठेही सवंगपणा, वाह्यातपणा नव्हता. तसाच रंग आतादेखिल राहू देत. अशा विषयात शील/अश्लिलतेची सीमा अस्पष्ट असते आणि आता काळ खूपच पुढे सरकला आहे म्हणूनच हे म्हटलं. अशा विषयाला ‘शौकिन’ खूप आहेत.