गाजलेल्या इंग्रजी कादंबरीवरील हिंदी सिनेमा म्हटल्यावर असलेली उत्सुकता ‘टू स्टेट्स’ या सिनेमाने संपवून टाकली आहे. अर्जुन कपूर आणि आलिया भट यांची जोडी चांगली असली तरी आलिया भटचा अभिनयाशी काहीच संबंध नसल्यामुळे लांबलचक सिनेमा अधिकच कंटाळवाणा ठरतो. चेतन भगत यांची गाजलेली कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर मांडण्याचा दिग्दर्शकाचा अट्टहास चित्रपट कंटाळवाणा करण्यास कारणीभूत ठरला आहे.
आंतरजातीय विवाह आजच्या काळात आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर सर्रास केले जात आहेत हे आपल्या मित्र परिवारात आणि आजुबाजूला पाहिले की सहजपणे लक्षात येते. चेतन भगत यांच्या गाजलेल्या ‘टू स्टेट्स’ या कादंबरीचा विषय कादंबरी प्रकाशित झाली आणि गाजली तेव्हा कदाचित ताजा असेलही. परंतु आजच्या काळात त्यावर चित्रपट बनविताना घटनाप्रसंग अधिक रंजक आणि खुसखुशीत करण्याची अजिबात काळजी चित्रपटकर्त्यांनी घेतलेली नाही. हिंदी सिनेमामध्ये अशा प्रकारची आंतरजातीय विवाहावरील कथानक फारसे न आल्यामुळे बहुधा हिंदी सिनेमावाल्यांना त्यात नावीन्य दिसत असावे. परंतु सरधोपट फिल्मी फॉम्र्यूलाच्या पलीकडे जाऊन जगभरात घडणाऱ्या घडामोडी, घटना याचा अंदाजच त्यांना लावता येत नसावा. म्हणून कादंबरीबरहुकूम सगळे प्रसंग, घटना घालून कांदबरीचा सिनेमा असे मिरविण्याची हौस दिग्दर्शक -निर्माते यांनी या चित्रपटाद्वारे केली आहे.
उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यांच्यात रोटीबेटी व्यवहार फारसा होत नाही. एकतर भाषेचा अडसर आणि भिन्न संस्कृती, विचार करण्याची भिन्न पद्धती यामुळे त्यांच्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत होते, आजही लागते. हे गृहीत धरले तरी अशी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या देशभरात आणि विविध महानगरांमध्ये प्रचंड वाढलेली असतानाही कल्पनादारिद्रय़ाचे प्रदर्शन चित्रपटकर्त्यांनी या चित्रपटाद्वारे केले आहे.
क्रिश मल्होत्रा हा पंजाबी तरुण आणि अनन्या स्वामिनाथन ही तामिळ तरुणी यांची आयआयएम अहमदाबादमध्ये एकत्र शिकत असल्यामुळे ओळख होते. लगेच प्रेमही जमते. त्यांची चुंबनदृश्ये, लाडिक प्रसंग यांची पखरण झाल्यानंतर लग्न करण्याचे ते ठरवितात. आपल्या दोघांची भिन्न संस्कृती असल्यामुळे आपले आई-वडील आपले लग्न होऊ देणार नाहीत हे माहीत असूनही पळून जाऊन लग्न न करता आपल्या आई-वडिलांची परवानगी घेऊन आणि दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याचा विचार क्रिश-अनन्या करतात. गोडीगुलाबीने सर्वाच्या संमतीने लग्न करण्याचा त्यांचा हा हट्ट मग दोन कुटुंबांमधील रागद्वेष, शाकाहारी-मांसाहारी लढा अशा ठरीव पद्धतीने प्रेक्षकांसमोर येतो.
अर्जुन कपूरने साकारलेला क्रिश मल्होत्रा त्यातला त्यात बरा म्हणायला हवा. परंतु दिसण्याच्या पलीकडे आणि चुंबनदृश्ये, मिठय़ा मारण्याच्या पलीकडे आपल्या चेहऱ्यावर एकही भावनिक रेषा उमटू न देण्याची काळजीच अनन्या स्वामीनाथनच्या भूमिकेद्वारे आलिया भटने घेतली आहे. आलिया भटच्या चेहऱ्यावर पडणारी खळी आणि एकंदरीत तिने दाक्षिणात्य साडय़ा नेसून साकारलेली अनन्या स्वामीनाथन केवळ दिसण्यापुरतीच आवडेल अशी आहे.
क्रिश मल्होत्राच्या आईची भूमिका अमृता सिंगने तद्दन पंजाबी मध्यमवर्गीय आईचा तोरा आपल्या अभिनयातून दाखविला आहे. चिकन आणि सांबार यांचा मेळ बसणे केवळ अशक्य हे म्हणण्यापासून ते आपल्या ‘गोऱ्यापान-साध्याभोळ्या’ मुलाला तामिळ मुलीने फसविले असे म्हणणारी पंजाबी आई चांगली दाखवली आहे. अतिशय पुराणमतवादी तद्दन तामिळ ब्राह्मण कुटुंब रेवती आणि शिवकुमार सुब्रमण्यम यांनी चांगले रंगविले आहे. शेवटचे विवाहाचे दृश्य दक्षिण भारतातील समुद्रकिनाऱ्यावरच्या मंदिराच्या सेटवर लागत असतानाचा नेत्रसुखद प्रसंग सोडला तर आलिया भटचा न-अभिनय आणि घिसापिटा आंतरजातीय विवाहाचा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट कंटाळवाणा ठरतो.
टू स्टेट्स
निर्माते – करण जोहर, साजिद नाडियादवाला
दिग्दर्शक – अभिषेक वर्मन
लेखक – चेतन भगत
संगीत – शंकर एहसान लॉय
छायालेखन – बिनोद प्रधान
कलावंत – अर्जुन कपूर, आलिया भट, अमृता सिंग, रोनित रॉय, रेवती, शिवकुमार सुब्रमण्यम्, बालकलाकार शारंग नटराजन, अंचित कौर, अंकित चित्राल.