रणबीर कपूर आपल्या कारकीर्दीबद्दल महत्त्वाकांक्षी आहे आणि म्हणूनच प्रत्येक चित्रपट, त्याचा दिग्दर्शक आणि त्याच्या चित्रपटाची नायिका याची तो जाणीवपूर्वक निवड करतो. दिग्दर्शक म्हणून इम्तियाज अलीच्या प्रेमात असलेल्या रणबीरने ‘हाय वे’ चित्रपटात आपल्याला भूमिका मिळावी म्हणून त्याच्या मागे लकडा लावला होता. पण, तेव्हा त्याला या चित्रपटात कुठलीच भूमिका नव्हती. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर इम्तियाज आणि अलियाबरोबर होता. तेव्हाच आपल्याला अलियाबरोबर काम करायचे आहे, हे त्याने जाहीर बोलून दाखवले होते. आता त्यांना एकत्र आणायचे काम दिग्दर्शक करण जोहरने केले आहे.
अलियाबरोबर काम करायच्या इच्छेने रणबीर इतका झपाटला आहे की जेव्हा जिथे संधी मिळेल तिथे त्याने सतत हे बोलून दाखवण्याचा सपाटा लावला होता. अगदी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीतही कतरिना समोर असताना रणबीर अलियाशी जास्तीत जास्त बोलता यावे यासाठी तिच्या पाठी फिरत होता. रणबीरची ही इच्छा करण जोहरने पूर्ण करायची ठरवली असून या दोघांबरोबर किंबहुना या अगदी नवीन आणि हटके जोडीबरोबर आपण आगामी चित्रपट करत असल्याची घोषणा करणने ट्विटरवर केली आहे.
रणबीरचा ‘धर्मा प्रॉडक्शन’बरोबर हा दुसरा चित्रपट आहे. मात्र, करणच्या दिग्दर्शनाखाली रणबीरचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. तर अलियाचा धर्माबरोबर तिसरा आणि करणबरोबर दुसरा चित्रपट असणार आहे.
ज्या तऱ्हेने करणने ट्विटरवर या चित्रपटाची घोषणा केली आहे ते पाहता रणबीरसारखाच खुद्द करणही आपल्या या जोडीवर बेहद्द खुश असल्याचे दिसून येते. अलिया रणबीरपेक्षा वयाने लहान आहे. पण, ‘हाय वे’ आणि ‘२ स्टेट्स’ सारख्या चित्रपटांमुळे तद्दन मसाला आणि वेगळया विषयावरचे चित्रपट या दोन्हीत तिने यश मिळवले आहे. त्यामुळे साहजिकच यह जोडी रंग लाएगी.. असा विचार इंडस्ट्रीत कित्येकांच्या मनात घोळतो आहे. मात्र, या जोडीसाठी चटकन पटकथा शोधून पटकन त्यांना ‘धर्मा’ प्रॉडक्शनशी बांधून घेण्यात करण जोहरने बाजी मारली आहे. करणच्या प्रयत्नांमुळे रणबीरचीही इच्छा पूर्ण होणार आहे. मात्र, या सगळयाबद्दल अलियाला काय वाटतं आहे हे अजून कळलेले नाही.