‘तो चलिए देवीयों ओर सज्जनो, हम और आप मिलके खेलते है कौन बनेगा करोडपती.’ अमिताभ बच्चन यांच्या या वाक्यावर हॉटसीटवर बसलेला स्पर्धकच नाही, तर प्रेक्षकसुद्धा दंग होऊन जातो. बऱ्याचदा त्या स्पर्धकापेक्षा आपणच हॉटसीटवर असतो, तर आतापर्यंत करोडपती झालो असतो, अशी स्वप्नं रंगवली जातात. टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ची मोहिनी आज आठव्या पर्वातसुद्धा कायम आहे.        
या मोहिनीमागची खरी गंमत, कार्यक्रमामधील अमिताभ बच्चन यांचा सहजसुलभ वावर हा आहेच, पण त्याचबरोबर कार्यक्रम सुरू होण्याआधीपासून त्याची होणारी मोर्चेबांधणी यावरही अवलंबून आहे. ‘केबीसी’च्या चौथ्या पर्वापासून कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वासाठी एका नवीन ‘टॅगलाइन’च्या जोडीने नवीन विचारसरणीचा पुरस्कार करण्यावर भर दिला गेला आहे. यंदाच्या आठव्या पर्वासाठी ‘यहाँ पे पैसेही नहीं, दिल भी जिते जाते है’ या टॅगलाइन ठरविण्यात आली आहे. आतापर्यंत केबीसीचा खेळ केवळ हॉटसीटवर बसलेला स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यापर्यंतच मर्यादित होता. पण आता या खेळाला आम्हाला व्यापक रूप द्यायचे असल्याचे सोनी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड नचिकेत पंतवैद्य यांनी सांगितले.  हा खेळ अनुभवणारा प्रत्येक प्रेक्षकसुद्धा कोणत्या ना कोणत्या मार्गाने या खेळाचा भाग होऊन जातो. त्यामुळे यंदा केबीसीच्या निमित्ताने तुम्ही केवळ पैसेच नाही, तर मनंही जिंकून जाता हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
या टॅगलाइनला अनुसरून बनवण्यात आलेल्या तीन जाहिरातींपैकी पहिल्या जाहिरातीमध्ये ईशान्येकडील राज्यांना देण्यात येणाऱ्या सापत्न वागणुकीचा मुद्दा उचलण्यात आला होता, तर दुसरी जाहिरात हिंदू-मुसलमान ऐक्यावर आधारित होती. या मालिकेतील तिसरी जाहिरात त्यामानाने थोडी हलक्याफुलक्या थीमची असून त्यात केवळ अमिताभ बच्चन यांचा फोन आला म्हणून आनंदित झालेली गल्ली असे वातावरण चित्रित करण्यात आले आहे. ‘सध्या आपण आर्थिक स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यामुळे अशा वेळी केवळ पैसे जिंकणे इतके लक्ष्य न ठेवता, यंदा आम्ही केबीसीच्या माध्यमातून समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पंतवैद्य यांनी सांगितले.  यातील दुसऱ्या जाहिरातीबाबत ते म्हणाले की,  ‘आम्हाला हिंदू-मुसलमान हा मुद्दा दाखवायचा होताच, पण तो दरवेळीच्या साचेबद्ध पद्धतीने चित्रित करायचा नव्हता. ही जाहिरात एकाच वेळी हिंदू-मुसलमान ऐक्य, दोन पिढय़ांमधील नात्यांवरही भाष्य करते. केबीसीमध्ये जाणारा मुलगा घरातला धाकटा आणि थोडासा मवाळ दिसतो. पण शेवटी तोच दोन्ही कुटुंबांना जोडणारा दुवा होतो. यात ‘खुदा तुम्हे सलामत रखे, बेटा’ या उत्तरामधून मुसलमान घरातील चाचा त्याला बरोबर उत्तरच सांगत नाही, तर आशीर्वादही देतोय, असे जाहिरातींचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सांगितले. अर्थात जाहिराती इतक्या प्रभावी बनवण्यामध्ये अमिताभ बच्चन यांचेही तितकेच योगदान असल्याचे ते सांगतात. सध्या या तीन जाहिराती प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असून आणखी तीन जाहिरातींचा विचार चालू असून त्यातील एक एड्सच्या रुग्णांवर तर दुसरी तरुणांना राजकारणाच्या दिशेने वळवण्यासंदर्भातील असेल, असेही त्यांनी सांगितले.