‘बिग बॉस’च्या आठव्या पर्वाला सुरवात होऊन काही दिवसच झाले असतील पण आतापासूनच घरातील वातावरण गरम झालेले आहे. आता या स्पर्धकांना काही मोलाचे धडे देण्यासाठी मागच्या पर्वातील व्हीजे अँडी आणि कामिया पंजाबी घरामध्ये दाखल होणार आहेत.
‘बिग बॉस’च्या आठव्या पर्वामध्ये स्पर्धकांची रवानगी थेट अपघातग्रस्त विमानामध्ये झाली होती. तेही पुरेसे नव्हते म्हणून त्यानंतर त्यांच्यावर राज्य करायला सिक्रेट सोसायटीची स्थापना झाली होती. आतापर्यंतची कसरत पार करत स्पर्धक त्यांच्या घरामध्ये स्थिरस्थावर झाले असले तरी, त्यांच्यामध्ये विस्तव पेटायला सुरवात झाली आहे.
त्यामुळे या स्पर्धकांच्या कानावर ‘मोलाचे चार शब्द’ पडावेत म्हणून मागच्या पर्वात गाजलेले दोन स्पर्धक म्हणजेच कामिया पंजाबी आणि व्हीजे अँडी येत्या शनिवारी कार्यक्रमामध्ये दाखल होणार आहेत. यावेळी यंदाचे स्पर्धक आणि एकूणच घरातील परिस्थिती याबद्दल थोडासा अंदाज घेऊन, स्पर्धकांना या कार्यक्रमामध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी खास सल्ले ते देणार आहेत. त्याचबरोबर यंदाचे पर्व आणि मागील पर्व यामध्ये काय फरक होता हे जाणून घेऊन या स्पर्धकांची पुढची वाट किती खडतर असेल याबद्दलही अंदाज बांधणार आहेत. यंदाच्या पर्वाची घोषणा करताना कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान याच्यासोबत अँडीही उपस्थित होता. त्यावेळी त्याने आपल्याला यंदाही बिग बॉसच्या घरात जायचे असल्याची इच्छा सलमानकडे व्यक्त केली होती.
पण मुळात एकदा घरातून बाहेर गेलेला स्पर्धक पुन्हा घरात आलेला सलमानलाच पसंत नसल्याने त्याने अँडीच्या या मागणीला साफ नकार दिला होता. पण आता या संधीचा फायदा घेत अँडी घरात चिकटून राहतो की पुन्हा घराबाहेर येतो, हे मात्र शनिवारचा भाग पहावा लागेल.