रहस्यमय, गूढ, थरारपट, भयपट म्हटले की ज्या अपेक्षा प्रेक्षक करतो त्या नेहमीच पूर्ण होतात असे नाही. रामसे स्टाइलचा भयपट आणि अलीकडे विक्रम भटच्या भयपट, थरारपटांबद्दल असा अनुभव प्रेक्षकांना आला असेल. मराठीत बऱ्याच कालावधीनंतर रहस्यमय, गूढ, थरारपट म्हणून आलेला ‘अनवट’ या चित्रपटाकडून असलेल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा पुरेपूर पूर्ण करण्यात काहीसा अपयशी ठरला आहे.
घटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी मांडणी, धक्कातंत्र यातली गंमत प्रेक्षकाला आवडली तर तो चित्रपट यशस्वी ठरतो. अनवट या चित्रपटाच्या बाबतीत मात्र तसे झालेले नाही. सुरुवातीला भयपट किंवा थरारपट आहे हे दाखविण्यासाठी केलेली वातावरणनिर्मिती चांगली असली तरी नंतर श्रद्धा आणि अंधश्रद्धा, तार्किकता यात लेखक दिग्दर्शक अडकला आहे का असे वाटत राहते.
मधुरा-विनय हे नवपरिणीत तरुण जोडपे कोकणात एका अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरातील आडगावी राहायला येते. विनय व्यवसायाने डॉक्टर आहे तर मधुरा आर्किऑलॉजिस्ट आहे. डॉक्टर म्हणून आडगावात काम करण्याची विनयच्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी दोघे कोकणातल्या गावी येतात. गावातील सार्वजनिक दवाखान्याचे सदा कामत एका पुरातन वाडय़ात विनय-मधुराची राहण्याची व्यवस्था करतात. विनय-मधुराच्या इच्छेनुसारच अशा प्राचीन वाडय़ात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. बायजमा या वाडय़ाची देखभाल करणारी स्त्री आहे. वाडय़ात राहायला सुरुवात केल्यानंतर काहीच दिवसांत मधुराला अवचित पुरुषी स्पर्शाचे भास होतात, त्यामागची कहाणीही तिला समजते, पटते. त्यामुळे भेदरलेली मधुरा विनयला याबाबत काही सांगू पाहते, पण विनय शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारा असल्यामुळे भूतप्रेत, पिशाच्च असते यावर त्याचा विश्वास नसतो. दगडाचा देव करणाऱ्या लोकांच्या सगळ्या अंधश्रद्धा असतात असे त्याचे मत असते.
पुरातन वाडय़ाचे अप्रतिम लोकेशन गूढपटासाठी अतिशय समर्पक ठरले आहे. त्याचबरोबर कोकणातला पाऊस, निसर्गरम्य परिसराचे लोकेशन हा या कथानकातील अविभाज्य भाग अतिशय उत्कृष्ट छायालेखनाने व्यापलेला आहे. पाश्र्वसंगीताच्या माध्यमातून पुरातन वाडय़ात काहीतरी गूढ आहे हे सहजपणे दाखविले आहे. किंबहुना अशा प्रकारचे संगीत वाडय़ाचा मुख्य दरवाजा उघडताना, वीज गायब होणे, धुवांधार पाऊस अशा गोष्टी भयपटासाठी आवश्यक ठरतात. त्याचा पूरेपूर वापर दिग्दर्शकाने केला आहे. मधुरा ज्या ठिकाणचे फोटो काढते ते गावकऱ्यांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. मुंजाची पूजा इथे केली जाते. त्यावर विश्वास नसल्यामुळे विनय ते ठिकाण उद्ध्वस्त करतो. तेव्हा उपस्थित गावकरी त्याला अजिबात विरोध करीत नाहीत, हे खटकते. विनयचा तर्कसुसंगत शास्त्रीय दृष्टिकोनावर असलेला विश्वास आणि त्याविरुद्ध शास्त्रीय दृष्टिकोन बाळगूनही मधुराला आलेला अनुभव याचा संघर्ष दाखविला आहे. पण त्यामध्ये भयपटाची मजा, गूढाची उकल करण्यात कथानक गडबडले आहे. त्यामुळे गूढ-रहस्यमयपटाचा थरार अनुभवायला मिळत नाही. चित्रपटाची संकल्पना खूपच आकर्षक, चमकदार असली तरी ती मांडताना रंजक करण्यात चित्रपट कमी पडतो.
मकरंद अनासपुरेंनी साकारलेला सदा कामत हा सरस ठरलाय. मधुराच्या भूमिकेत ऊर्मिला कानेटकरने छान रंग भरले आहेत. आदिनाथ कोठारे मात्र विनय या डॉक्टरच्या भूमिकेसाठी थोडा लहान वाटतो. दोन अजरामर गाणी पुन्हा नव्याने संगीतबद्ध करून चित्रपटात दाखवली आहेत. दोन्ही गाणी अजरामर, लोकप्रिय असून त्याचे चित्रीकरण अतिशय उत्कृष्ट आहे. त्यामुळे ही गाणी पाहताना प्रेक्षक रमतो खरा. परंतु, या गाण्यांचा कथानकाशी काही संबंध नाही, त्यामुळे ती खटकतात. मकरंद अनासपुरेंचा गंभीर भूमिकेतील अभिनय पाहण्यासारखा नक्कीच आहे. उत्कृष्ट छायालेखन, ध्वनिसंयोजन, कोकणातील ७०-७५ सालचे गाव, वाडा उभे करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. परंतु, कोकणातील गावात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या विनयला गावकरी भेटत नाहीत, कोकणातील बोलीभाषा कोणत्याही गावातील व्यक्तीद्वारे दाखविलेली नाही. एकंदरीत हा गूढपट खिळवून ठेवण्यात अपयशी ठरतो.
पीएसजे एण्टरटेन्मेंट प्रस्तुत
अनवट
निर्माते – शेखर ज्योती, उर्मिला ज्योती
लेखक-दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे
छायालेखक – कृष्णा सोरेन
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीत संयोजक – शंकर-एहसान-लॉय, सचिन जांबेकर
ध्वनि संयोजक – विजय भोपे
पाश्र्वसंगीत – अमर मोहिले
संगीत – मकरंद अनासपुरे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर, किशोर कदम भार्गवी चिरमुले, विभवरी देशपांडे, अनुश्री जन्न्ोरकर, नयना मुके, सुभाष खुडे .