तुम्हाला ठाऊक आहे का? ‘आशिकी’ चित्रपट दिग्दर्शक महेश भट आणि त्यांच्या पहिल्या पत्नीच्या आयुष्यावर बेतलेला होता किंवा शाहरूख खानचे खरे नाव अब्दुल रेहमान आहे. तुमच्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यातील अशाच काही आठवणी तुम्हाला त्यांच्याच जबानी ऐकायला मिळणार आहेत. अनुपम खेर त्यांच्या आगामी ‘कुछ भी हो सकता है’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नामवंत सेलेब्रिटीजना बोलते करण्याचा प्रयत्न करणार आहे. यानिमित्ताने अनुपम खेर यांच्याशी ‘रविवार वृत्तान्त’ने संपर्क साधला असता, त्यांनी हा कार्यक्रम, त्याची संकल्पना आणि सेलेब्रिटीजना बोलते करण्यासाठी त्यांना करावे लागलेले प्रयत्न याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या.
गप्पांच्या सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या मांडणीबद्दल सांगताना अनुपम खेर म्हणाले, ‘‘माझा जन्म काश्मीर खोऱ्यातला. माझा जन्म झाला त्याच दिवशी तिथे उपस्थित नर्सने माझ्या आईला, ‘‘मी तुमच्या मुलाला दत्तक घेऊ का?’’ असे विचारले होते. थोडक्यात जन्माला आल्यापासूनच माझी मागणी वाढली होती, असे म्हणायला काहीच हरकत नाही. अर्थात, हे जरी आपण विनोदाने सांगत असलो तरी प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा आपण ज्या कलाकारांना सेलेब्रिटीज म्हणून ओळखतो त्यांनाही प्रसिद्धीचे वलय जन्मजात मिळालेले नसते. त्यामागे त्यांचे अथक प्रयत्न असतात. प्रत्येकाच्या आयुष्याची अशीच खास कथा असते. आपल्या आयुष्यातील याच कथा हे सेलेब्रिटीज या मंचावर मांडणार आहेत आणि या कथांच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रवास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे खेर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाची मूळ कल्पना ‘कुछ भी हो सकता है’ या नावाच्या नाटकावर आधारित असल्याचे अनुपम यांनी स्पष्ट केले. या नाटकाच्या माध्यमातून मी लोकांसमोर माझ्या आयुष्यातील गुजगोष्टी मांडत होतो. ज्याप्रमाणे माझ्या आयुष्याबद्दल लोकांना सांगण्यासारखे खूप काही आहे त्याचप्रमाणे इतर लोकांच्याही कथा असू शकतील. त्यातूनच मला या कार्यक्रमाची कल्पना सुचली आणि म्हणून या कार्यक्रमाची निर्मिती केली असल्याचे खेर यांनी यावेळी सांगितले. आपण सतत अपयशाला घाबरत असतो पण, ज्याक्षणी आपल्या आयुष्यातील अपयशांबद्दल ठामपणे बोलण्याची तयारी आपण दाखवतो. त्याच वेळी आयुष्यातील पुढील कठीण प्रसंगांना तोंड द्यायला आपण सज्ज होतो, या उक्तीवर आपला ठाम विश्वास असल्याचेही अनुपम यांनी यावेळी बोलताना सांगितले. ‘‘मी माझ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरा गेलो आहे. एक काळ असा होता जेव्हा मी पूर्णपणे कर्जबाजारी झालो होतो. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी कर्ज घेतले होते. त्या प्रसंगांनी मला लढायला शिकवले आहे. या कार्यक्रमातील कथांच्या माध्यमातून लोकांनाही हीच प्रेरणा मिळावी हा माझा प्रयत्न असेल,’’ असे ते पुढे म्हणाले.
 ६ जुलैपासून प्रदर्शित होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुपम यांनी मालिकांच्या निर्मितीक्षेत्रातही पाऊल टाकले आहे. बारा भागांच्या या कार्यक्रमाची सुरुवात शाहरूख खानपासून होणार असून त्यानंतर अक्षय कुमार, युवराज सिंग, आदित्य रॉय कपूर – परिणिती चोप्रा, महेश भट- आलिया भट, विद्या बालन, कंगना रणावत अशा काही निवडक सेलेब्रिटीज यात सहभागी होणार आहेत. पाहुण्याच्या निवडीबद्दल सांगताना अनुपम यांनी सांगितले, ‘‘मला सलग पंचवीस दिवसांमध्ये कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण करायचे होते. त्यानुसार मी माझ्या काही मित्रांशी संपर्क साधला. त्यातील ज्यांना वेळ काढता येणे शक्य होते त्यांचा समावेश या पर्वात करण्यात येणार आहे. उरलेल्यांसाठी आम्ही दुसऱ्या पर्वाचा विचार करत आहोत.’’ या पर्वात तारखांअभावी कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ न शकणाऱ्यांमध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान यांचा समावेश आहे.
 इतर वेळी गप्प राहणाऱ्या सेलेब्रिटीजना बोलतं करणं, हे काम म्हणावं तितकं सोप्पं नाही. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलेब्रिटीज त्यांच्या आयुष्यातील कित्येक गुपितं प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवणार आहेत. त्यामुळे ही जबाबदारी कशी पार पाडली याबद्दल सांगताना अनुपम यांनी सांगितले, ‘‘विश्वास हा आमच्यातील मोठा दुवा असणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कार्यक्रमादरम्यान माझ्या एकाही पाहुण्याने ‘मला अमुकच प्रश्न विचार’ किंवा ‘मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही’ असे अजिबात सांगितले नाही. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्वजण माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता की मी त्यांना पेचात टाकणारा कोणताही प्रश्न विचारणार नाही.’’
या कार्यक्रमासाठी ‘कलर्स’ वाहिनीच का निवडली, याचेही गमतीदार उत्तर अनुपम यांनी दिले. ‘‘माझ्या आईला ‘कलर्स’ वाहिनी खूप आवडते. रात्री आठ ते अकरा आमच्याकडे हीच एक वाहिनी पाहिली जाते. त्यामुळे वाहिनीची निवड करणे माझ्यासाठी सोप्पे होते.’’ पण त्याच वेळी या कार्यक्रमासाठी ‘कलर्स’च्या संपूर्ण टीमने आपल्याला सहकार्य केल्याचे अनुपम यांनी सांगितले. माझ्या संपूर्ण टीमने सेलेब्रिटीजबद्दल बित्तंबातमी काढली होती. प्रत्येक वेळी मी सेटवर आल्यावर ते मला या बातम्या सांगत असत. त्यावरून मी कार्यक्रम पुढे नेत असे. संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण कुठेही पटकथेची मदत घेतली नाही. त्याला कारण आपल्या टीमने केलेला सखोल अभ्यास होता, असे अनुपम यांनी स्पष्ट केले.