बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन लवकरच बॉलीवूडमध्ये पदापर्ण करत असल्याच्या वृत्ताचा खुद्द शाहरुखने इन्कार केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या २१ व्या लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्याचे शाहरुखने सुत्रसंचलन केले. यावेळी रेडकार्पेटवर बोलताना शाहरुखने याबाबत माहिती दिली.
शाहरुख म्हणाला, “आर्यन सध्या शैक्षणिक अभ्यासक्रमात व्यस्त आहे. त्याचे शिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बॉलीवूडमध्ये सध्यातरी त्याच्या पदार्पणाची कोणतीही शक्यता नाही.”
अठरा वर्षीय आर्यन सध्या लंडनमधील विद्यालयात शिक्षण घेत आहे. शाहरुखने याआधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचे आणि आर्यनचे करिअर संबंधातील विचार जुळत असल्याचे वारंवार म्हटले आहे. तसेच आर्यनच्या मनात सुरू असलेल्या गोष्टींचीही माहिती आजवर शाहरुख ट्विटरवरून देत आला आहे. त्याच्या ट्विट्सवरून आर्यन देखील वडीलांचा कित्ता गिरवत बॉलीवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा बाळगून असल्याचे समोर आले होते.